सुरवातीपासूनच श्रीरंग बारणे यांना आघाडी, मताधिक्य शेवटपर्यंत कायम

सुरवातीपासूनच श्रीरंग बारणे यांना आघाडी, मताधिक्य शेवटपर्यंत कायम

पिंपरी, ता. ४ : मावळ लोकसभा मतदार संघात महायुतीतील शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी संजोग वाघेरे यांचा पराभव करत आपली विजयाची हॅटट्रिक केली. पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर राहिलेल्या बारणे यांचे मताधिक्य शेवटपर्यंत कायम राहिले व ९६ हजार मतांनी त्यांनी विजयश्री खेचून आणली.
दहाव्या फेरीनंतर बारणे यांनी ४० हजारांहून अधिक मतांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष केला. दुपारी दोनच्या सुमारास श्रीरंग बारणे मतमोजणीच्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी भगवा रंग उधळून कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील वेटलिफ्टिंग हॉल येथे सकाळी आठ वाजता मावळ लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सुरवात झाली. या संपूर्ण परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी सहा वाजल्यापासूनच मतमोजणीच्या परिसरात पक्ष प्रतिनिधी, मतमोजणी अधिकारी, कार्यकर्ते यांची गर्दी होऊ लागली होती. संपूर्ण तपासणीनंतरच ओळखपत्र असलेल्यांना मतमोजणीच्या ठिकाणी सोडण्यात येत होते. मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल व अन्य इलेक्ट्रिक वस्तूंना नेण्यास मनाई करण्यात आली होती. सकाळी आठला मतमोजणीला सुरवात झाली. मात्र, ती अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याने पहिल्या फेरीचा कल हातात येण्यास तब्बल अर्धा तास तर; पहिल्या फेरीचा निकाल जवळपास तासाभराचा अवधी लागला.
पहिल्या फेरीतच बारणे यांनी ५७३१ मतांची आघाडी घेतली. तर; दुसऱ्या फेरीत त्यांना तब्बल ८ हजार मतांची आघाडी मिळाली. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदार संघात पहिल्यापासूनच बारणे यांना चांगले मताधिक्य मिळाले. येथे पहिल्या फेरीपासूनच बारणे पुढे राहिले. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील स्थानिक उमेदवार असलेल्या संजोग वाघेरे यांना तेथील मतदारांचा पाठिंबा मिळाला नाही. सुरवातीच्या दहा फेऱ्यांमध्ये बहुतांश वेळा पिंपरीमध्येही बारणेच आघाडीवर राहिले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बारणे यांना पनवेल विधानसभा मतदार संघातही मोठे मताधिक्य मिळाले होते. मात्र, यावेळी वाघेरे यांनी या ठिकाणी त्यांना तगडी लढत दिली. उरण, कर्जत, मावळ या विधानसभा मतदार संघात कधी बारणे तर कधी वाघेरे पुढे राहिले. मात्र, इतर ठिकाणी मिळालेल्या मताधिक्याचा फायदा श्रीरंग बारणे यांना झाला व फेरी गणिक त्यांचे लीड वाढतच गेले.

मतमोजणीचा सावळा गोंधळ
मतमोजणी सुरू होण्यास झालेला उशीर, उशिरा जाहीर केल्या जाणाऱ्या फेऱ्या, दहाव्या फेरीनंतर मतांची पडताळणी करण्याच्या ॲपमध्ये झालेला तांत्रिक बिघाड, त्यामुळे तब्बल दोन तास निकालास झालेला उशीर. असा सावळा गोंधळ मावळ लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर दिसून आला. काही विधानसभा मतदार संघांच्या फेऱ्यांना उशीर होत असल्याने फेरीनिहाय आकडेवारी येण्यास उशीर लागत होता. आकडेवारी देण्यासाठी माध्यम प्रतिनिधींच्या कक्षात कोणतीही सोय करण्यात आलेली नव्हती. अतिरिक्त कर्मचाऱ्यांना मोठ्या संख्येने बोलविण्यात आल्याने माध्यमांसाठी नेमून दिलेल्या कक्षात कर्मचारी व पक्ष प्रतिनिधींचीच गर्दी अधिक होती.

क्षणचित्रे...

- मुख्य रस्त्यापासून ते बालेवाडी क्रीडा संकुलापर्यंत पोलिसांचे बॅरेकेडिंग
- दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची पहाटेपासूनच उपस्थिती व निकालाची उत्सुकता
- महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी माहिती देण्याची व्यवस्था
- मतमोजणी केंद्रात अनेक गैरसोयी, पुरेसे दिवे व फॅनची व्यवस्था नसल्याने कर्मचारी हैराण
- विजय स्पष्ट होताच श्रीरंग बारणे मतमोजणी केंद्रावर, भाजपच्या नेत्यांची मात्र अनुपस्थिती
- मतमोजणी केंद्राच्या आवारात खाद्यपदार्थांच्या स्टॉलला परवानगी दिल्याने आश्‍चर्य
- तांत्रिक बिघाडामुळे विधानसभानिहाय आकडेवारी येण्यास उशीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com