कोकणातील विजयाचे वातावरण

कोकणातील विजयाचे वातावरण

घाटाखाली ‘कही खुशी कही गम’

कर्जत, उरण, पनवेलमधील स्थिती; कुठे शुकशुकाट तर कुठे फटाक्यांची आतषबाजी


कर्जत, उरण, पनवेल, ता. ४ ः लोकसभेच्या मावळ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात लढत झाली. त्याचा निकाल मंगळवारी (ता. ४) जाहीर झाला. त्याच्या विजयात काट्याची टक्कर होईल असे वाटत असताना
श्रीरंग बारणे यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. त्यामुळे घाटाखालील कर्जत,उरण, पनवेल या मतदारसंघात ‘कही खुशी, कही गम’ असे वातावरण होते. कुठे शुकशुकाट होता तर तर कुठे फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा झाला.

फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष
नेरळ ः मावळ लोकसभा मतदारसंघात निकालाच्या पहिल्या फेरीपासून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी ते शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी कायम राखली. १९ व्या फेरीमध्ये बारणे यांचे मताधिक्य एक लाखांच्या घरात गेल्यानंतर कर्जत मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि एकमेकांना पेठे भरवीत आनंदोत्सव साजरा केला.
मावळ लोकसभा मतदारसंघाची लढत निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात चुरशीची झाली होती. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाबाबत उत्सुकता होती. मात्र, प्रत्यक्ष सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच श्रीरंग बारणे यांनी आघाडी घेतली. ती शेवटपर्यंत टिकून राहिली.
सकाळपासून कर्जत नेरळसारख्या मोठ्या शहरांच्या बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत होता. तर नेरळ येथे महावीर पेठेत भाजपकडून निकालाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. कर्जतमध्ये सर्व पक्षांच्या कार्यालयामध्ये निकाल पाहण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी होती. तर नागरिकही निकाल पाहण्यात गुंतले होते. दरम्यान महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी निकालावेळी घेतलेली आघाडी कुठेच कमी न झाल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याने दुपारी एक वाजता कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला. शिवसेना कार्यकर्त्यांनी कर्जत येथील बाळासाहेब भवन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालय तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी केली. तर एकमेकांना पेढे भरवत हा जल्लोष साजरा केला.

उरणमध्ये जाहीर जल्लोष नाही
उरण ः मावळ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयाने उरण विधानसभा मतदारसंघात बहुंताश ठिकाणी उत्साहाचे वातावरण दिसत नव्हते.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. गेल्या दोन पंचवार्षिकमध्ये बारणे हेच येथील खासदार होते. यावेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून संजोग वाघेरे यांच्याबाबत मतदारसंघात चांगले वातावरण झाले होते. मात्र, पहिल्या फेरीपासून बारणे यांचे वर्चस्व राहिले. त्यामुळे कुठेही जल्लोषाचे वातावरण दिसून आले नाही. कार्यकर्त्यांमध्ये शेवटपर्यंत आकडेवारी पाहत होते. निकालाबाबत कमालीची उत्सुकता होती. कार्यकर्त्यांनी केवळ शाब्दिक आनंद व्यक्त केला. राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या आघाडी जास्त जागा घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या हक्काची खासदारकीची जागा हातातून निसटून गेल्याने उरण मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण दिसत होते. मतदारसंघात निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, चोख बंदोबस्त ठेवला होता.

PNE24U23938

पनवेलमधून बारणेंना ३१ हजारांचे मताधिक्य
पनवेलः पनवेलमधून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना १,५०,९२४ तर महाविकास आघाडीचे उमेदवार वाघेरे यांना १,१९,८८६ मते मिळाली. पनवेलमधून बारणे यांना ३१ हजार ३८ इतके मताधिक्य मिळाले. राज्यात महायुतीचा धुव्वा उडाल्याने महायुतीच्या पनवेलच्या पदाधिकाऱ्यांनी बारणे यांच्या विजयाचा जल्लोष सायंकाळपर्यंत साजरा करण्याचे टाळले.
शिवसेनेचे पनवेलमधील मध्यवर्ती कार्यालय कळंबोली वसाहतीमध्ये आहे. शिवसेनेचे पनवेल जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे यांनी मध्यवर्ती कार्यालयासमोर डीजे लावून गुलालाच्या उधळणीत पेढे वाटून आनंद साजरा केला. महायुतीच्या अनेक उमेदवारांचा झालेल्या पराभवामुळे पनवेल भाजपने सुद्धा सावध पवित्रा घेत कोणताही जल्लोष सायंकाळी साडेसहावाजेपर्यंत तरी साजरा केला नव्हता. लोकसभा निवडणुकीचा निकाल टिव्हीवर जसजसा जाहीर झाला. राज्यात व देशात महायुतीच्या अपेक्षित यश न आल्याच्या बातम्या समजल्याने पनवेलमधील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष टाळल्याचे चित्र होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com