पनवेल विश्लेषण

पनवेल विश्लेषण

पनवेलने बारणे यांना तारले!

वसंत जाधव
पनवेल ः शहरी बहुल असलेल्या पनवेलमधील मतदाराने पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यांना कौल दिला. पर्यायाने भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे पनवेलकर उभे राहिल्याचे दिसून आले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी महायुतीचा धर्म पाळत शिवसेनेचा विजय स्वीकार केला. घाटाखालील तीन मतदारसंघांपैकी केवळ पनवेललाच बारणे यांना आघाडी मिळाली.
पनवेल विधानसभा मतदारसंघ हा मिश्र लोकवस्तीचा आहे. या ठिकाणी महानगरपालिका क्षेत्र असून, कॉस्मोपॉलिटन मतदारांची संख्या जास्त आहे. या ठिकाणी माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि त्यानंतर प्रशांत ठाकूर यांचा गेल्या वीस वर्षांपासून प्रभाव राहिलेला आहे. एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या पनवेलचा गड पंधरा वर्षांपूर्वी ढासळला. या ठिकाणी काँग्रेस आणि त्यानंतर आता भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत झाला आहे. पनवेल महापालिकासुद्धा भाजपने ताब्यात घेतली. त्याचबरोबर आमदार ठाकूर गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत पनवेलने विजयी उमेदवाराला मताधिक्य दिले आहे. यात श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांच्यामध्ये सामना झाला. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही आमदार या सहाही मतदारसंघांमध्ये नव्हता. तरीसुद्धा संजोग वाघेरे यांनी कडवी झुंज दिल्याचे दिसून आले. उरण आणि कर्जत विधानसभा मतदारसंघात वाघेरे यांना मताधिक्य मिळाले. परंतु पनवेलने बारणे यांना पसंती दिली. परंतु मागील निवडणुकीच्या तुलनेत या मतदारसंघात त्यांचे मताधिक्य घटले. त्यांना पनवेलमध्ये तीस हजारांचे मताधिक्य मिळाल्याने विजय बऱ्याच अंशी सुखकर झाला. या विधानसभा मतदारसंघात विशेष करून मुस्लिम बहुल ठिकाणी महाविकास आघाडीला म्हणजेच वाघेरे यांना पसंती मिळाली. तर भाजपची वोट बँक बारणे यांच्याकडे वळाल्याची दिसून आले.
या विधानसभा मतदारसंघांमध्ये सुमारे चार हजार मतदारांनी नोटाला मतदान करून दोन्ही उमेदवारांना नाकारले. ही बाब महायुती आणि महाविकास आघाडीसाठी आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे

दलित मुस्लिम फॅक्टरचा ‘मविआ’ला साथ!
पनवेल विधानसभा मतदारसंघात मुस्लिम आणि दलित समाजाने महाविकास आघाडीला पसंती दिल्याचे एकूण निकालावरून दिसत आहे. मागील निवडणुकीत पार्थ अजित पवार यांना एक लाख पाच हजार मतदान झाले होते. तर यावेळी संजोग वाघेरे यांना एक लाख १९ हजार इतक्या मतदारांनी पसंती दिली. तर ओबीसी त्याचबरोबर ब्राह्मण उत्तर भारतीयांनी श्रीरंग बारणे म्हणजेच महायुतीला मतदान केल्याचे दिसून आले.

मालमत्ताकराचा मोठा प्रश्न
पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये दुहेरी आणि पूर्वलक्षी मालमत्ताकराचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून निर्माण झाला आहे. सिडको वसाहत येथील रहिवाशांनी याला विरोध केला आहे. महाविकास आघाडीचासुद्धा मालमत्ताकराला विरोध आहे. लोकसभा निवडणुकीतही त्याचा काहीसा परिणाम दिसून आला. आगामी विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची शक्यता दिसून येत आहे.


मताधिक्य घटल्यामुळे विधानसभेला चिंता!
पनवेल विधानसभा मतदारसंघांमध्ये मागील निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांचा मोठ्या फरकाने विजय झाला होता. त्यांचे मताधिक्य जवळपास एक लाखाच्या आसपास पोहचले होते. तर श्रीरंग बारणे यांना ५० हजारांचे मताधिक्य या मतदारसंघांमध्ये मिळाले होते. या वेळीसुद्धा बारणे यांना किमान तितके मताधिक्य मिळेल, असा अंदाज महायुतीने वर्तवला होता. परंतु तो फोल ठरला आणि मताधिक्य ३० हजारांवर आले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला विशेष तयारी करावी लागणार आहे.

श्रीरंग बारणे ः १,५०, ९२४
संजोग वाघेरे ः १,१९,८८६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com