Maval Loksabha Result
Maval Loksabha Resultsakal

Maval Loksabha Result : शिवसेनेसह भाजप, राष्ट्रवादीला ‘धडा’;मावळात श्रीरंग बारणेंची हॅटट्रिक, पण मताधिक्य घटले

मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी हॅटट्रिक साधली. मात्र, २०१९ च्या तुलनेत त्यांचे मताधिक्य एक लाख २१ हजारांनी घटलं आहे.

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी हॅटट्रिक साधली. मात्र, २०१९ च्या तुलनेत त्यांचे मताधिक्य एक लाख २१ हजारांनी घटलं आहे. शिवाय, उरण आणि कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे यांना तब्बल ३० हजार ९१० मते अधिक मिळाली आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मते मागितलेल्या भारतीय जनता पक्षासह शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला कामगिरी सुधारण्याचा ‘धडा’ मावळच्या मतदारांनी दाखवला आहे.

उरण, कर्जतची वाघेरेंना साथ
जेएनपीटी, घारापुरी बेटावर वीज पोहोचवली, तुंगीसारख्या गावात रस्ता व वीज पोहोचवली, माथेरानची रेल्वे सुरू केली, आंतरराष्ट्रीय विमानतळ, अशी विकासकामे केल्याचे श्रीरंग बारणे सांगतात. ही कामे असलेल्या उरण व कर्जत विधानसभा मतदारसंघांमध्येच संजोग वाघेरे यांना अनुक्रमे १३ हजार २५० आणि १७ हजार ६६० इतके मताधिक्य मिळाले आहे. शिवाय, या दोन्ही मतदारसंघात सर्वाधिक अर्थात अनुक्रमे ६७.०७ टक्के आणि ६१.३९ टक्के मतदान झाले होते. हे वाढीव मतदानच वाघेरे यांच्या पारड्यात पडलेले दिसते. कारण, २०१९ मध्येही या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये अनुक्रमे ६७.२१ आणि ६७.७६ टक्के मतदान झाले होते. त्यावेळी उरणने बारणे यांना साथ दिली होती. तर, कर्जतमध्ये केवळ अठराशे मते पार्थ पवार यांना मिळाली होती.

लोकसभेची २०१९ ची निवडणूक भारतीय जनता पक्ष-शिवसेनेने युती म्हणून लढली होती. त्यात मावळची जागा शिवसेनेच्या वाट्याला होती. त्यात बाजी मारून श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा खासदार झाले होते. राष्ट्रवादीचे उमेदवार तथा अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा त्यांनी पराभव केला होता. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यावरून युती संपुष्टात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी करून सरकार स्थापन केले होते.

मात्र, अवघ्या अडीच वर्षात शिवसेनेत फूट पडून सरकार पडले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जवळपास ४० आमदारांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले. त्यावेळी श्रीरंग बारणे यांनीही ठाकरे यांच्याऐवजी शिंदे यांना साथ दिली. पाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही फूट पडून अजित पवार भाजपसोबत पर्यायाने शिंदे यांच्यासोबत आले. त्याच शिंदेंनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिलेले बारणे यांचा प्रचार करण्याची वेळ पवार यांच्यावर आली होती. त्यामुळे मुलाच्या पराभवाचे शल्य विसरून पवार व त्यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते बारणेंचे ‘काम’ करतील का? अशी शंका होती. ती काही अंशी, काही ठिकाणी खरी ठरल्याचे बारणे व वाघेरे यांना मिळालेल्या मतांच्या आकडेवारीवरून दिसते. शिवाय, पंतप्रधान मोदी यांच्यासाठी बारणे यांना मताधिक्य मिळवून देऊ, असे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते म्हणत होते. त्यामुळे आणि ‘गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांमुळे आपणच एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येऊ’, असा आत्मविश्वास बारणे यांना होता. मात्र, तो काही अंशी आत्मघातकी ठरल्याचे मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांत बारणे यांना मिळालेल्या मतांवरून दिसते.

पनवेलने कसर भरून काढली
पनवेल विधानसभा मतदारसंघातून बारणे यांना ३१ हजारांचे मताधिक्य आहे. म्हणजेच, उरण व कर्जत मतदारसंघांत त्यांचे घटलेले ३० हजार ९१० मताधिक्य पनवेलमुळे भरून निघाले आहे. शिवाय, मतदानाच्या दिवशी पाऊस पडल्याने कर्जतमध्ये फेर मतदानाची मागणी बारणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. याच दिवशी पनवेलमध्येही पाऊस झाला होता. मात्र, पनवेलच्या तुलनेने कर्जतमध्ये जवळपास सहा टक्के मतदान अधिक झाले आहे. याच तालुक्यात बारणेंच्या पक्षाचे अर्थात शिवसेनेचेच आमदार महेंद्र थोरवे आहेत. तरीही मताधिक्य घटले आहे. त्यामुळे कर्जतचे मतदान शिवसेनेला विचार करायला लावणारे आहे. तर, पनवेल भाजपचा बालेकिल्ला मानला जात असून, त्यांनी बारणे यांना साथ दिल्याचे दिसते.

मावळमध्ये मताधिक्य घटले
मावळ विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. भाजपचे सुनील शेळके यांना फोडून अजित पवार यांनी त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली होती. त्यात भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे पराभूत झाले होते. त्यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत मावळ विधानसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांच्याविरुद्ध बारणे यांनी २१ हजार ८२७ मतं अधिक घेतली होती. त्यावेळी शेळके व भेगडे एकत्र होते. आताच्या निवडणुकीतही महायुतीचे घटक म्हणून दोन्ही एकत्रच होते. मात्र, बारणे यांना केवळ चार हजार ९३५ मते अधिक मिळाली आहेत. येथे वाघेरे यांच्या नात्या-गोत्याचा फायदा झाल्याचे दिसते आहे. मात्र, मावळमध्ये कमी मिळालेल्या मतांचा महायुती आणि भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी वैयक्तिक स्तरावर विचार करायला हवा.

पिंपरी, चिंचवडचा सिंहाचा वाटा
बारणे यांना २०१९ मध्ये दोन लाख १५ हजार ९१३ इतके मताधिक्य होते. आता ते केवळ ९६ हजार ६१५ इतके झाले आहे. त्यातही पिंपरीतील १६ हजार ७२१ आणि चिंचवडमधील तब्बल ७४ हजार ७६५ आहे. दोन्ही मिळून हा आकडा ९१,४८६ आहे. म्हणजेच बारणे यांच्या विजयात चिंचवडचा मोठा हात असल्याचे स्पष्ट होते. याच चिंचवडने २०१९ च्या निवडणुकीतही बारणे यांना ९६ हजार ७५८ आणि पिंपरीने ४१ हजार २९४ इतके मताधिक्य दिले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार शहरासह मतदारसंघाच्या बाहेरील होते. यावेळी मात्र बारणे यांचे प्रतिस्पर्धी संजोग वाघेरे पिंपरीतील होते. त्यामुळे बारणेंचे मताधिक्य कमी होणे साहजिक असले तरी, ते गेल्या वेळपेक्षा अधिक कमी होणे, बारणे व शिवसेनेसह मित्रपक्षांना विचार करायला लावणारे आहे.

लोकसभेचे आकडे बोलतात
विधानसभानिहाय २०१९ मध्ये मिळालेली मते
विधानसभा / महायुती / आघाडी / वंचित / नोटा
पनवेल / १,६०,३८५ / १,०५,७२७ / १५,९२६ / ४,६४३
कर्जत / ८३,९९६ / ८५,८४६ / ७,९४१ / १,७४६
उरण / ८९,५८७ / ८६,६९९ / ५,११२ / ३,३८०
मावळ / १,०५,२७२ / ८३,४४५ / ११,७३१ / १,३७३
चिंचवड / १,७६,४७५ / ७९,७१७ / १७,२०९ / २,८८२
पिंपरी / १,०३,२३५ / ६१,९४१/ १७,७९४ / १,७२३
पोस्टल / १,७१३ / १,३७५ / १९१ / ३२ /
एकूण / ७,२०,६६३ / ५,०४,७५० / ७५,९०४ / १५,७७९

विधानसभानिहाय २०२४ मध्ये मिळालेली मते
विधानसभा / महायुती / आघाडी / वंचित / नोटा
पनवेल / १,५०,९२४ / १,१९,८८६ / ४,६६९ / ४,४०१
कर्जत / ७५,५३४ / ९३,१९४ / ३,८९७ / १,६१९
उरण / ९१,२८५ / १,०४,५३५ / १,७४८ / २,७२८
मावळ / ९४,६०० / ८९,८६५ / ५,४०२ / १,५८६
चिंचवड / १,८६,२३५ / १,११,४७० / ५,७९५ / ४,२९८
पिंपरी / ९३,३२३ / ७६,५९२/ ६,२३४ / २,०९५
पोस्टल / ७३१ / ६७५ / २३ / ३१ /
एकूण / ६,९२,८३२ / ५,९६,२१७ / २७,७६८ / १६,७६०

विधानसभानिहाय टक्केवारी
विधानसभा / श्रीरंग बारणे / संजोग वाघेरे
पनवेल / ५१.७६ / ४१.१७
कर्जत / ४०.१२ / ४९.५०
उरण / ४३.२८ / ४९.५७
मावळ / ४६.१६ / ४३.७५
चिंचवड / ५८.४९ / ३५.००
पिंपरी / ४९.९८ / ४१.०२
पोस्टल / ४०.८६ / ३७.७३
एकूण / ४७.२३ / ४२.५३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com