श्रवण यंत्राची प्रतीक्षा

श्रवण यंत्राची प्रतीक्षा

कर्णबधिरांचा ‘आवाज’ अधिकाऱ्यांपर्यंत पोचेना!

वर्षानुवर्षे श्रवणयंत्राची प्रतीक्षा; तरतूद असूनही दिले जाते निवडणुकीचे कारण

आशा साळवी ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३० ः ‘‘मला महापालिकेने श्रवणयंत्रासाठी ९९ हजार ९०० मंजूर केले आहेत. यंत्रासाठी ऑगस्ट २०२३ मध्ये ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाकडे अर्ज केला होता. अनुदान मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. पण आता तरतूद असूनही निवडणूक असल्याने देता येत नाही, असे कारण दिले जात आहे. महापालिकेच्या समाज विकास विभागात कर्मचारी असूनही दिव्यांगांना आवश्यक त्या सेवा मिळत नाहीत. तेथे ‘आंधळा’ कारभार असल्याने वर्षांपासून श्रवणयंत्राच्या प्रतीक्षेत आहे, अशी कैफियत ज्येष्ठ नागरिक श्रीकृष्ण फिरके यांनी मांडली. या प्रमाणे ९० जणांची प्रकरणे वर्षानुवर्षे ‘वेटींग’वर असल्याची माहिती समोर आली आहे. अनुदानाअभावी श्रवणयंत्रांचे होणारे वाटपही रखडले असून, गरजू रुग्णांच्या अडचणीत भर पडली आहे.
जन्मत: येणारा किंवा इतर विविध कारणांनी येणारा कर्णबधिरपणामुळे अनेक रूग्ण शहरात आढळतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेनुसार जागतिक लोकसंख्येच्या ६.१ टक्के नागरिकांना कर्णबधिरपणाचा आजार जडलेला आहे. या रुग्णांची संख्या शहरातही कमी नाही. महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये झालेली तपासणी आणि शिबिरांमधून हजारो रुग्णांना कर्णबधिरपणा आढळून येत आहे. ‘दिव्यांग कल्याणकारी’ योजनेअर्तंगत ९० प्रकरणे श्रवणयंत्रासाठी आली आहेत. दुसरीकडे, महापालिकेच्या ‘दिव्यांग कल्याणकारी’ योजनेतून किती जणांना श्रवणयंत्र वाटप झाले, याची माहिती देता येत नाही. हे श्रवणयंत्र घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना उपयुक्त साधन घेण्यासाठी अर्थसाहाय्य करण्याची तरतूद आहे.

श्रवणयंत्र वाटप रखडलेले
महापालिका रुग्णालयातील तपासणीनंतर एखाद्याला श्रवणयंत्राची गरज असेल तर त्याला ‘दिव्यांग कल्याणकारी’ योजनेतून अर्ज करण्यास पाठविले जात असे. तेथे शिधापत्रिका कार्ड, आधारकार्डसह महत्त्वाची कागदपत्रे दिल्यानंतर रुग्णांना मोफत श्रवणयंत्र मिळते. मात्र, गत काही महिन्यांपासून अनुदानाअभावी श्रवणयंत्र वाटप होणेही बंद झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील कर्णबधिरांना हजारो रुपये खर्च करून श्रवणयंत्र खरेदी करावे लागत आहे. कर्णबधिरांची होणारी गैरसोय पाहता महापालिका आयुक्तांनी महापालिका योजनेतून पूर्वीप्रमाणे श्रवणयंत्रांचे वाटप करावे, अशी मागणी होत आहे.

आमच्याकडे अशा योजनाच नाही
महापालिकेच्या ‘दिव्यांग कल्याणकारी’ योजनेतून श्रवणयंत्र वाटप करणाऱ्याविषयी माहिती विचारल्यावर आमच्याकडे अशा योजनाच नाही, अशी माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहे. श्रवणयंत्र वाटप का बंद करण्यात आले, या प्रश्‍नाचे उत्तर मात्र समाज विकास विभागातील अधिकाऱ्यांकडे शोधूनही मिळत नाही. त्यामुळे महापालिका योजनेतून श्रवणयंत्र वाटपास का टाळाटाळ बंद कोणत्या कारणाने करण्यात येते, याचाही शोध घेण्याची गरज असल्याची मागणी रुग्णांसह नातेवाइकांमधून केली जात आहे.

‘‘माझ्या दोन्ही कानांची समस्या आहे. अनुदान मंजूर करूनही मला देण्यास टाळाटाळ केली जात आहे. पण आता तरतूद असूनही निवडणूक असल्याने देत आहेत.’’
- श्रीकृष्ण फिरके, कर्णबधिर रूग्ण काशीद पार्क

‘‘काही प्रकरणे चार वर्षांपासूनचे आहेत. अनेकवेळा कर्णबधिर रुग्णांकडून कागदपत्रे वेळेवर दिली जात नाही. कधी कधी कागदपत्रांच्या त्रुटीमुळे प्रकरणे प्रलंबित राहतात.’’
- उमाकांत दांगट, दिव्यांग अधिकारी समाज विकास विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com