पोलिसांवर चारही मतदारसंघांचा भार

पोलिसांवर चारही मतदारसंघांचा भार

मंगेश पांडे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३० : पिंपरी-चिंचवड पोलिस पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मावळ, शिरूर, बारामती व पुणे अशा चार लोकसभा मतदारसंघांचे क्षेत्र येते. निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी सर्वच भागावर पोलिसांची करडी नजर आहे. कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला जात असून, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. अगोदरच अपुरे मनुष्यबळ अशातच दैनंदिन घटना घडामोडी, व्हीआयपी दौरे, सभा यासह तब्बल चार लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेचा पोलिसांवर भार आहे. अशातही आगामी लोकसभा निवडणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस दल सज्ज आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची जोरदार तयार झाली आहे. कायदा सुव्यवस्था कायम राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनीही कंबर कसली आहे. वेगवेगळ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत रूटमार्च, कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. गुन्हेगारांवर मोका, स्थानबद्ध, तडीपार या सारख्या कारवाया करण्यासह प्रतिबंधात्मक कारवाईचाही धडाका सुरू आहे. गस्त वाढविण्यासह शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य मार्गांसह ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. येथे वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

दरम्यान, आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील चार लोकसभा मतदारसंघांपैकी बारामती मतदारसंघासाठीची मतदान प्रक्रिया सात मे रोजी होत आहे. या मतदारसंघात हिंजवडी व वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिंजवडी, माण, मारुंजी, सूस, ताथवडे आदी गावांचा समावेश आहे. येथील बंदोबस्तासाठी पोलिस आयुक्तालयाचेच मनुष्यबळ असेल. तर, मावळ, शिरूर, पुणे या मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान होत असून, येथील बंदोबस्तासाठी पोलिस आयुक्तालयातील मनुष्यबळासह बाहेरूनही अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला आहे. यामध्ये सहा केंद्रीय सशस्त्र पोलिस बलाच्या तुकड्यांचाही समावेश आहे.


पुणे मतदारसंघाचा काहीसा भाग
पुणे लोकसभा मतदारसंघात दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोपखेल परिसराचा काही भाग येत आहे. येथेही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

मतदार संघ व त्या अंतर्गत येणारे पोलिस ठाणे
मतदार संघ ः पोलिस ठाणे
मावळ : चिंचवड, रावेत, देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, शिरगाव, पिंपरी, सांगवी, वाकड, निगडी
शिरूर : भोसरी, भोसरी एमआयडीसी, चिखली, निगडी, देहूरोड, पिंपरी, आळंदी, चाकण, दिघी
बारामती : हिंजवडी, वाकड
पुणे : दिघी
----------------
‘‘लोकसभा निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार योग्य नियोजन केले जात आहे. सात मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी सर्व आयुक्तालयाचाच बंदोबस्त असेल. मात्र, १३ मे रोजीच्या मतदान प्रक्रियेसाठी आपल्या बंदोबस्तासह बाहेरचा अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात येणार आहे. सर्वत्र कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे.
- संदीप डोईफोडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड
----------------

पोलिस आयुक्तालयातील सध्याचे मनुष्यबळ

पोलिस आयुक्त - १
अतिरिक्त आयुक्त -१
पोलिस उपायुक्त -६
सहायक पोलिस आयुक्त - ११
पोलिस निरीक्षक - ६४
सहायक पोलिस निरीक्षक - ७१
उपनिरीक्षक -१७१
अंमलदार - -----
------------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com