गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

चिखली : बेकायदेशीरित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी आदित्य कालिदास थोरात (वय २२, रा. चिंचेचा मळा, ताम्हाणे वस्ती, चिखली, मूळ - चांडवली, ता. आंबेगाव, पुणे) याला अटक केली. तर एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई चिखलीतील पाटीलनगर येथील मुख्य रस्त्यावर करण्यात आली. या कारवाईत आरोपीकडून २५ हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त करण्यात आले.

तरुणाची साडेनऊ लाखांची फसवणूक
पिंपरी : कामाचे टास्क पूर्ण केल्यानंतर कमिशन देण्याच्या बहाण्याने पैसे भरण्यास सांगून तरुणाची साडेनऊ लाखांची फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी चिखलीमधील ताम्हाणे वस्तीतील हनुमाननगर येथील ३७ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, विवेक नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादी यांना ‘तुम्हाला काही पार्ट टाइम काम पाहिजे का’, असे म्हणून त्यांना एका एजंटच्या इंस्टाग्रामची माहिती दिली. फिर्यादीचा विश्वास संपादन केल्यावर त्यांना वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून ९ लाख ५६ हजार ८६८ रुपये भरण्यास सांगितले.

बेकायदेशीररीत्या डिझेल विक्री; चौघांना अटक
वाकड : बेकायदेशीररीत्या धोकादायक पद्धतीने डिझेल विक्री केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी चौघांना अटक केली. ही कारवाई वाकडमधील भूमकर चौक येथे करण्यात आली.
टँकरचालक बाळासाहेब दत्तराव पोळ (वय २०, रा. मु. पो. येलवाडी, सांगुर्डी फाटा, देहूगाव), मनोजकुमार पांडे (वय ४९, रा. एम पी. धारावी, मुंबई), सुभाषचंद्र रामदीन गौतम (वय ४३, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई), आकाश रंगनाथ पोळ (वय २४, रा. बनकर वस्ती, मोशी) अशी अटक केलेल्यांची नावे असून शब्बीर नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. शब्बीर याने टँकरमध्ये साडेचार लाख रुपये किमतीचे पाच हजार लिटर डिझेल भरून आणले. या डिझेलचा साठा केला. कोणतेही कायदेशीर परवाने न बाळगता डिझेल विक्री करताना आरोपी आढळून आले.

गांजा प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा
भोसरी : बेकायदेशीररीत्या गांजा बाळगल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दोन महिलांवर कारवाई केली. या कारवाईत दीड किलो गांजा जप्त करण्यात आला.
संगीता निवृत्ती जेधे (वय ५०, रा. पाटीलनगर, मोईगाव, मूळ शिरूर) व शितोळे असे आरोपी महिलांची नावे आहेत. जेधे हिच्याकडे एक हजार ५७२ ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी बाळगताना आढळून आला. तो गांजा शितोळे हिच्याकडून घेतला.


पती-पत्नीसह मुलीला मारहाण
पिंपरी, ता. २ : भांडणे सोडविण्यास मध्यस्थी केल्याच्या रागातून पती-पत्नीसह त्यांच्या मुलीला बेदम मारहाण केल्याची घटना निगडीतील ओटास्किम येथे घडली.
याप्रकरणी राजनगर, ओटास्किम, निगडी येथील व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार विक्की लष्करे, करण लष्करे, अवी लष्करे, दुर्गादास लष्करे, अभि तांबे, संजय देवकर, दीपक देवकर, मलया देवकर (सर्व रा. राजनगर, ओटास्किम, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांची पत्नी व मुलीसह घरासमोर बसले असताना आरोपी तेथे आले. आसिफ यांच्याबरोबर झालेली भांडणे सोडविण्यास मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून आरोपींनी काठीने, लाथाबुक्क्यांनी व हातातील कड्याने फिर्यादीसह त्यांच्या पत्नीला व मुलीला मारहाण केली. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com