एक लाख रिक्षा, टॅक्सीचालकांचे होणार ‘कल्याण’ विविध योजनांच्या लाभासाठी नोंदणी करण्याचे ‘आरटीओ’चे आवाहन

एक लाख रिक्षा, टॅक्सीचालकांचे होणार ‘कल्याण’
विविध योजनांच्या लाभासाठी नोंदणी करण्याचे ‘आरटीओ’चे आवाहन
Published on

पिंपरी, ता. १५ : राज्य सरकारने धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा मीटर टॅक्सी, टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे.
या मंडळाकडून केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत याबाबतची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्‍यास कार्यालयामार्फत समाविष्ट असणाऱ्या सुमारे एक लाख रिक्षा चालक- मालकांना त्‍याचा लाभ मिळणार आहे.
मंडळाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी रिक्षा चालक मालकांनी आरटीओ कार्यालयामध्ये अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक अर्ज जिल्हास्तरीय समितीकडून त्यांना दिलेल्या निकषानुसार पात्रतेसाठी तपासले जातील. मंजूर लाभ राज्यस्तरीय मंडळाने व जिल्हास्तरीय समितीने वेळोवेळी विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार वितरित केले जाणार आहे. ऑटो-रिक्षा परवानाधारक, ऑटो रिक्षा, मिटर टॅक्सी चालकांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील परिवहन कार्यालयामार्फत याबाबतची नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नोंदणीकृत चालकांना लाभासाठी मंडळाच्या संबंधित जिल्ह्यातील कार्यालयाकडून ओळखपत्र देण्यात येईल.

पिंपरी चिंचवड परिवहन कार्यालयांतर्गत (आरटीओ) ४० हजार परमिटधारक रिक्षांची नोंद आहे. परमीट असणारे आणि रिक्षा चालक या दोन्हींसाठी या मंडळामार्फत लाभ घेता येणार आहे. असे एकूण मिळून सुमारे एक लाख लोकांना याचा फायदा होणार आहे. मात्र, सभासदत्‍व घेणाऱ्यांनाच याचा लाभ होणार असल्‍याची माहिती ‘आरटीओ’ने दिली.

या योजनांचा होणार लाभ
जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्य विषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास ५० हजारांपर्यंत अर्थसाहाय्य योजना, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्यवृद्धी योजना, ६५ वर्षावरील ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी परवानाधारक यांना निवृत्ती सन्मान योजने अंतर्गत सानुग्रह अनुदान, नवीन ऑटोरिक्षा तथा मीटर टॅक्सी खरेदी, गृह खरेदीसाठी घेण्यात येणारे कर्ज, राज्यस्तरीय मंडळाने वेळोवेळी मान्यता दिलेल्या इतर कल्याणकारी योजना, शासनाने निर्देशित केलेल्या इतर कल्याणकारी योजना, या व्यतिरिक्त शासनाने घोषित केलेल्या आनुषंगिक योजनांचा लाभ या मंडळाकडून दिला जाणार आहे. सर्व योजनांसंबंधात नियम, अटी व मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाकडून निर्गमित करण्यात येणार आहेत.

‘‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा मीटर टॅक्सी, टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळासाठी जे नोंदणी करतील, त्‍यांनाच लाभ घेता येणार आहे. आपल्‍या कार्यालयांतर्गत परमीट असणारे आणि चालक असणारे सुमारे ८० हजार ते एक लाख लाभार्थी आहेत. यासाठी जास्‍तीत जास्‍त लोकांनी नोंदणी करावी.
राहुल जाधव, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com