थांबा असूनही बस सुसाट

थांबा असूनही बस सुसाट

पिंपरी, ता. ९ : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसचा थांबा आहे, त्याबाबतचा फलकही आहे. मात्र, या थांब्यावर असलेल्या प्रवाशाने बसला हात दाखविल्यानंतरही बस न थांबता सुसाट निघून जाते. यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, दुसऱ्या बसची वाट पाहत पुन्हा ताटकळत उभे राहण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. असा कटू अनुभव शहरातील बहुतांश थांब्यांवर प्रवाशांना येत आहे.

ज्या ठिकाणी पीएमपीचा थांबा आहे, त्याठिकाणी प्रवासी घेण्यासाठी व सोडण्यासाठी बस थांबवणे अनिवार्य आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी थांबे असून, त्याबाबतचे फलकही उभारलेले आहेत. त्यामुळे प्रवासी येथे थांबून बसची वाट पाहतात. प्रवाशाने हात दाखविल्यानंतर चालकाने बस थांबवणे आवश्यक आहे. मात्र, काही थांब्यावर हात दाखवूनही बस थांबवली जात नाही. थांब्यावर प्रवासी थांबलेले आहेत. याकडे पाहूनही दुर्लक्ष करून चालकांकडून बस सरळ पुढे दामटली जाते. असे प्रकार शहरातील काळभोरनगर, एम्पायर इस्टेट, जयश्री टॉकीज, खराळवाडी आदी थांब्यावर घडतात. यामुळे प्रवाशाला मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबत प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जातो. तरी पीएमपी प्रशासनाने याची गंभीर दखल घेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

प्रवाशांना मनस्ताप
कामावर पोहोचण्यासाठी अथवा कामावरून सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी प्रवाशाने वेळेचे नियोजन केलेले असते. ठरलेल्या वेळेनुसार बस आल्यानंतर वेळेत संबंधित ठिकाणी पोहोचणे प्रवाशाला शक्य होते. मात्र, थांब्यावर बसच न थांबल्यास प्रवाशाचे सर्व नियोजन कोलमडते.

या क्रमांकावर करा तक्रार
०२०-२४५४५४५४
९८८१४९५५८९

‘‘प्रत्येक थांब्यावर प्रवासी घेण्यासाठी बस थांबविण्याबाबत चालकांना वेळोवेळी सूचना दिल्या जातात. तरीही प्रवासी न घेता बस पुढे नेत असल्यास याबाबतची माहिती घेतली जाईल. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल.’’
- सतीश गव्हाणे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

‘‘कामावरून सुटल्यानंतर चिंचवड स्टेशन येथील थांब्यावर रात्री बसची वाट पाहत असतो. मात्र, अनेकदा याठिकाणी हात दाखवूनही बस न थांबता पुढे निघून जाते. एखादी जरी बस चुकली तरी पुढे घरी पोहोचण्यास उशीर होतो. तरी प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक थांब्यावर बस थांबवावी.’’
- केशव दिसले, प्रवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com