अजमेरा-मासुळकर कॉलनी रस्ता ‘खड्ड्यात’

अजमेरा-मासुळकर कॉलनी रस्ता ‘खड्ड्यात’

पिंपरी, ता. १० ः मागील साडेतीन महिन्यांपासून अजमेरा - मासुळकर कॉलनी परिसरात ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली खोदकाम सुरू आहे. कधी पदपथ, कधी पावसाळी गटारे; तर कधी जलनिस्सारण वाहिनीसाठी वास्तु उद्योग ते रसरंग चौकापर्यंत रस्ता खोदण्यात येतो आणि बुजविण्यात येतो. सततच्या खोदकामांमुळे नऊ फुटांचा रस्ता सात फुटांवर आला आहे.
प्रभाग क्रमांक नऊमधील अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी, वास्तु उद्योग वसाहत ते रसरंग चौक या मार्गावर जलवाहिन्या, जलनिस्सारण वाहिन्या, पदपथ तयार करण्यासाठी खोदकाम केले जात आहे. खोदकाम सुरू असल्‍याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांना रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे.

अर्धा रस्ता खोदकामाने व्‍यापला
गेल्या साडेतीन महिन्यांपासून या रस्त्यावर खोदकाम सुरू आहे. खोदकामात अर्धा रस्ता व्‍यापल्याने नागरिक त्रस्त आहेत. हा रस्‍ता एका बाजूने खोदून ठेवला असून मोठ्या प्रमाणावर राडारोडा पडलेला आहे. अत्‍यंत वर्दळीचा हा रस्ता आहे. खोदकामाबरोबरच वाहने उभी केली जात असल्यामुळे रस्ता अधिकच अरुंद झालेला दिसून येत आहे.

किरकोळ अपघात आणि वाद
या मार्गावर खासगी दवाखाने, औषधे, भाजीपाला तसेच इतरही दुकाने आहेत. खोदकामामुळे वाहतूक कोंडी होत असून किरकोळ वाद, भांडणे आणि अपघात देखील घडत आहेत. अशाच एका वादातून शनिवारी (ता.८) एका मोटार चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याच्या मोटारीची काच फोडण्यात आली.

खोदकाम नेमके कसले ?
काही महिन्यांपूर्वी जलनिस्सारण वाहिनीसाठी खोदकाम करण्यात आले. ते काही दिवसांनी बुजविण्यात आले. त्यानंतर, पदपथ आणि जलनिस्सारण वाहिनीसाठी पुन्हा ठिकठिकाणी खोदण्यात आले आहे. त्यामुळे, नागरिक वैतागले आहेत. खोदकामाच्या जागेजवळ पालिकेने कोणताही फलक लावलेला नाही. खोदकाम नेमके कसले ? व किती दिवस चालेल ? याची माहिती नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे, संबंधितांनी या समस्‍येकडे लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी अशी मागणी होत आहे.

राडारोडा रस्त्यावरच
खोदकाम झाल्यावर रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ केली जात नाही. माती अक्षरशः रस्त्यावर पसरलेली आहे. रस्त्याची डागडुजी व्यवस्थित केली नाही. माती पडल्यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. हे लक्षात घेऊन रस्ता त्वरित दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

‘‘सध्या पावसाळी गटारे, जलनिस्सारण वाहिनी आणि पदपथ तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सूचना देण्यात येतील.’’
- सुदर्शन वहीकर, उपअभियंता, ‘क’ प्रभाग कार्यालय, पिंपरी-चिंचवड महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com