ऑनलाइन खंडणी मागणारी टोळी गजाआड

ऑनलाइन खंडणी मागणारी टोळी गजाआड

पिंपरी, ता. ११ : कॉलगर्लच्या नावाने गुगलवर खोटे मोबाईल क्रमांक अपलोड करून ऑनलाइन खंडणी मागणाऱ्या पश्चिम बंगालमधील कोलकता येथील टोळीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. कॉल सेंटरवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सहा आरोपींकडून ४ लाख ८४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सूरजकुमार जगदीश सिंग (वय २७), नवीनकुमार महेश राम (वय २३), सागर महेंद्र राम (वय २३), मुरली हिरालाल केवट (वय २४), अमरकुमार राजेंद्र राम (वय १९), धीरनकुमार राजकुमार पांडे (वय २५, सर्व रा. दुर्गाबती कॉलनी, कोलकता, पश्चिम बंगाल, मूळ - झारखंड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
डुडुळगाव येथे १५ मे रोजी एका तरुणाने ऑनलाइन पैसे मागितल्याच्या कारणावरून राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचा खंडणी विरोधी पथकामार्फत देखील समांतर तपास सुरू होता. मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर पथकाने कोलकता येथील नगेर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका फ्लॅटवर छापा टाकून या टोळीला जेरबंद केले.
त्यांच्याकडून १५ स्मार्ट मोबाईल, ७ व्हाइसचेंज मोबाईल, ४० सिमकार्ड, १४ पेमेंट डेबिट कार्ड, ८ आधार कार्ड, पॅनकार्ड, ८ नोटबुक असा मुद्देमाल जप्त केला.

बदनामीच्या भीतीने आत्महत्या !
आरोपी सूरजकुमार व त्याच्या साथीदारांनी डुडुळगाव येथील तरुणाच्या मोबाईलवर संपर्क करून त्याच्या व्हॉटसअ‍ॅपवरील डीपीच्या छायाचित्रात छेडछाड केली. चित्रविचित्र अवस्थेत छायाचित्र बनवून तरुणाला वारंवार फोनवरून पैसे मागितले. पैसे न दिल्यास सर्व छायाचित्रे गुगलवर टाकून बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे, तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले.

असे करायचे गुन्हे...
नवीन सिमकार्ड विकत घेऊन आरोपी जी-मेल वर बनावट नावाने खाते तयार करायचे. त्याआधारे गुगलवर वेगवेगळ्या शहरांतील कॉलगर्लच्या नावाने मोबाईल क्रमांक अपलोड करायचे. त्यावर, फोन आल्यावर कॉलगर्ल पुरवण्याच्या नावाखाली स्वतः:च्या खात्यावर पैसे स्वीकारत असत. व्हाइसचेंज मोबाईलद्वारे महिलेच्या आवाजात बोलणी करून सोशल मिडीयावरुन संबंधितांची छायाचित्रे प्राप्त करून घेत असत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com