गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

Published on

चिंचवडमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला

पिंपरी : बॅनर लावण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणावर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना चिंचवडमधील रामनगर येथे घडली. समीर जाधव असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांच्या आईने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी समीर उर्फ सम्या उत्तम गवळी (रा. काळेवाडी), मोन्या उर्फ शशांक अनंत लांडगे (रा. मस्के गस्ती, रावेत), शिवा बाबासाहेब बनसोडे (रा. थरमॅक्स चौक) यांना अटक केली असून अक्षय राजू कापसे (रा. मोहननगर, चिंचवड) व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांचा मुलगा समीर जाधव याचे आरोपींबरोबर काही दिवसांपूर्वी बॅनर लावण्यावरून बाचाबाची झाली. त्यावेळी आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली होती.

सुसगाव येथे पत्नी, मुलीला बेदम मारहाण
पिंपरी : किरकोळ कारणावरून पत्नी व मुलीला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सुसगाव येथील महादेवनगर येथे घडली. या प्रकरणी महिलेने बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संतोष राजू कांबळे (रा. महादेवनगर, सुसगाव, मूळ - धाराशिव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी या त्यांच्या आरोपी पतीला तुमचा डबा घेऊन जा, असे म्हटल्याच्या रागातून आरोपीने पत्नीवर धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. दरम्यान, त्यांची मुलगी भांडण सोडविण्यासाठी आली असता तिलाही आरोपीने मारहाण करून शिवीगाळ केली.

किवळेत पादचाऱ्याचा मृत्यू
पिंपरी : भरधाव वाहनाने धडक दिल्याने पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना किवळे येथील एका महाविद्यालयाजवळ घडली. भगवान सिंग असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गौरव गडरिया यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचा मित्र भगवान हे रस्त्याने पायी जात असताना लघुशंकेसाठी रस्त्याच्या बाजूला गेले. दरम्यान, अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.


अजंठानगरमध्ये वाहनांची तोडफोड
पिंपरी : वाहनांची तोडफोड करून दहशत माजविल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना चिंचवडमधील अजंठानगर येथे घडली. या प्रकरणी संजय धेंडे (रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनिश उर्फ काळ्या मुकेश राऊत (रा. अजंठानगर, चिंचवड) याला अटक केली आहे. आरोपीने कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादीकडील रोकड लुटली. याबाबत फिर्यादीने त्यांना विचारणा केली असता त्याने कोयत्याने फिर्यादीसह तीन वाहनांची तोडफोड केली. फिर्यादीच्या चुलत भावासह आणखी एकाने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने कोयता हवेत फिरवून शिवीगाळ करीत दहशत निर्माण केली.


चिखलीतील तरुणाला पाच लाखांचा गंडा
पिंपरी : एका तरुणाच्या बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात परस्पर पैसे जमा झाले. त्यामध्ये तरुणाची पाच लाखांची ऑनलाइनद्वारे फसवणूक झाली. या प्रकरणी चिखलीतील शरदनगर येथील तरुणाने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या बँक खात्यातून झालेल्या व्यवहारांबाबत ते थरमॅक्स चौकातील बँकेत चौकशीसाठी गेले असता त्यांचे पैसे परस्पर दुसऱ्या खात्यावर वळते झाल्याचे समोर आले. यामध्ये फिर्यादीची एकूण पाच लाख ११ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com