गुन्हे वृत्त
गुंतवणुकीच्या नावाखाली
६७ लाख ७२ हजारांची फसवणूक
पिंपरी : गुंतवणुकीच्या नावाखाली एकाची ६७ लाख ७२ हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार चऱ्होली बुद्रुक येथे घडला. या प्रकरणी चऱ्होली येथील ३४ वर्षीय व्यक्तीने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्याद यांना एका गुंतवणुकीच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यावर रक्कम भरण्यास भाग पडले. त्यानंतर ती रक्कम काढण्यासाठी वेगवेगळ्या टॅक्सच्या नावाखाली मिळून बँक खात्यावर ७ लाख ७२ लाख रुपये भरण्यास भाग पाडून फिर्यादीची फसवणूक केली.
बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला चिखली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई कृष्णानगर, चिंचवड येथे करण्यात आली. या प्रकरणी अर्जुन नागू गायकवाड (रा. मोरे वस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गायकवाड यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एक पिस्तूल, एक जिवंत काडतूस व एक मोटार असा एकूण पाच लाख ३० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा
पिंपरी : शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली. ही घटना पिंपरीतील नेहरूनगर येथे घडली. या प्रकरणी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाने संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सूर्यकांत रतन मुरगुंड (रा. नेहरूनगर, पिंपरी) व एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याचे राग मनात धरून आरोपींनी त्याला लोखंडी पट्टी व बटणे बेदम मारहाण केली.
जुन्या भांडणातून तिघांना बेदम मारहाण
पिंपरी : जुन्या भांडणाच्या रागातून तिघांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी देहूरोडमधील बापदेवनगर येथील ३४ वर्षीय व्यक्तीने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सूर्या मुर्गन, आकाश मुर्गन, अजितकुमार कल्लीमूर्ती, अजित स्वामी (सर्व रा. एम, बी. कॅम्प, देहूरोड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला त्यांच्या पत्नीला व पुतण्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ दमदाटी करीत त्यांच्या घरावर दगडफेक केली.