दिवाळीनिमित्त एसटीच्या ५८९ जादा गाड्या
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ११ ः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) दिवाळीनिमित्त पुणे विभागातून ५८९ जादा गाड्या सोडणार आहे. १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान या गाड्या सोडण्यात येतील.
वल्लभनगर आगारातून सर्वाधिक ३९६ गाड्या सोडण्यात येतील. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील प्रवाशांची सोय झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातून शिक्षण, व्यवसाय आणि कामानिमित्त अनेक जण पिंपरी चिंचवड, पुण्यात स्थायिक झाले आहेत. दिवाळीत शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे नागरिक हमखास गावी जातात. सुरक्षित पर्याय म्हणून एसटी बसला प्राधान्य दिले जाते.
दिवाळीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता पुणे विभागातील वल्लभनगर आगारातून ३९६, स्वारगेट आगारातून ११३, तर शिवाजीनगर आगारातून ८० गाडा सोडण्यात येतील. पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतही गाड्या सोडण्यात येतील. यंदा खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाऐवजी पिंपरी चिंचवड शहरातील एच.ए. मैदानात पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल. या गाड्या पिंपरी चिंचवड आगारातून सुटतील.
आरक्षण सुरू
एसटी महामंडळाच्या लालपरी, शिवशाही, शिवनेरी, शिवाई अशा विविध आरामदायी बस प्रवाशांच्या सेवेत असल्यामुळे नागरिकांचा एसटी बसने प्रवास करण्याकडे कल वाढत चालला आहे. दिवाळीनिमित्त सोडण्यात येणाऱ्या जादा बसचे आरक्षण सुरु झाले आहे. एसटीच्या बसस्थानकांवर, अधिकृत खासगी आरक्षण केंद्रावर आणि ऑनलाइन www.msrtc.gov.in आणि www.msrtcors.co.in या संकेतस्थळावर आरक्षणाची सुविधा उपलब्ध करुण देण्यात आली आहे.
-------
कोणाला किती तिकीट?
एसटी महामंडळाच्या विविध योजनांद्वारे नागरिकांना तिकीट दरात सवलत दिली आहे. चार वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना तिकीट नाही. १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना अर्ध तिकीट आहे. तसेच १२ ते ६० वर्षांपर्यंत सर्वांना पूर्ण तिकीट आहे. ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अर्धे तिकीट आहे. तर ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे. महिलांना अर्धे तिकीट आहे.
-----
पुणे विभागातून यंदा ५८९ जादा बस सोडण्यात येणार आहेत. यापैकी ३९६ बस पिंपरी चिंचवड आगारातून सोडण्यात येणार आहे. एचए मैदानात एसटी बसच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक
-----