अधिकारी, कर्मचारी हीच महापालिकेची खरी ताकद
पिंपरी, ता. १२ : ‘‘प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येक गुणवंत कर्मचाऱ्याचा सन्मान हा संपूर्ण संस्थेचा सन्मान आहे. सेवाभाव, कार्यतत्परता आणि नागरिकाभिमुख दृष्टिकोन या गुणांमुळेच पिंपरी चिंचवड महापालिका सातत्याने प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे,’’ असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ४३व्या वर्धापन दिनानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित गुणवंत अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळ्यात अतिरिक्त आयुक्त जांभळे-पाटील बोलत होते. महापालिकेच्या सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ३६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना जांभळे-पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी सहआयुक्त मनोज लोणकर, सहशहर अभियंता मनोज सेठीया, उपायुक्त पंकज पाटील, सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते.
उपायुक्त अण्णा बोदडे म्हणाले, ‘‘महापालिकेतील सहकाऱ्यांच्या टीमवर्कमुळे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळेच ही कामगिरी शक्य झाली. या सन्मानामुळे पुढील काळातही अधिक उत्साहाने, पारदर्शकतेने आणि जनहिताच्या भावनेने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.
पुरस्कारप्राप्त अधिकारी व कर्मचारी
देवन्ना गट्टुवार (सहशहर अभियंता), अण्णा बोदडे (उपायुक्त), डॉ. किशोरी नलवडे (सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी), सत्वशील शितोळे (उपअभियंता), विजय कांबळे (उपअभियंता), ज्ञानेश्वर ढवळे (प्रशासन अधिकारी), सुधीर मरळ (कार्यालय अधीक्षक), किशोर काटे (कार्यालय अधिक्षक), विद्या किनेकर (फार्मासिस्ट), सचिन लोणे (कनिष्ठ अभियंता), सुनील पोटे (प्रयोगशाळा सहाय्यक), गौतम इंगवले (उपअग्निशमन अधिकारी), अनंत चुटके (कॉम्प्युटर ऑपरेटर), श्रीनिवास बेलसरे (मुख्य लिपिक), नंदकुमार शिखरे (वाहन चालक), सज्जाद शेख (वाहन चालक), शरद देवकर (मेंटेनन्स हेल्पर), बापूराव कांबळे (शिपाई), लक्ष्मण मानमोडे (मजूर), किशोर आवटे (शिपाई), शंकर तांदळे (वॉर्डबॉय), मदन फंड (मजूर), बाबूराव कायंदे (रखवालदार), सुभाष कोकणे (रखवालदार), दीपक रसाळ (वॉर्डबॉय), सुलोचना गवारी (वॉर्डआया), सुधाकर गरूड (मजूर), कुंडलिक कुटे (शिपाई), संजय वडमारे (सफाई कामगार), आत्माराम ठाकूर (आरोग्य मुकादम), भीमा असवले (सफाई कामगार), अमित कोष्टी (स्प्रे कुली), अनंता भालचिम (कचरा कुली), किशोर मकासरे (सफाई कामगार), कमलेश गायकवाड (सफाई कामगार), उमेश जाधव (स्प्रे कुली)