द्रुतगती मार्गालगत कचरा, दुर्गंधी
सोमाटणे, ता. १२ : द्रुतगती मार्गालगत गहुंजे ते उर्से गावाजवळ कचरा टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. त्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचा त्रास स्थानिकांसह प्रवाशांना होत आहे.
उर्से येथील काही उद्योगांतील टाकाऊ पदार्थ, प्लॉस्टिक, थर्माकोल, कागदाचे तुकडे यासह उर्से ते गहुंजे या मार्गावरील हॉटेलमधील टाकाऊ पदार्थ, फळे, उरलेल्या भाज्या द्रुतगती मार्गालगत टाकण्याचे प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून वाढले आहेत. त्यातच द्रुतगती मार्गाने प्रवास करणारे काही नागरिक वाहने थांबवून कचरा रस्त्यालगत टाकतात. यामुळे प्रदूषणात भर पडली आहे. पावसामुळे हा कचरा कुजला असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. या कचऱ्यावर कीटक वाढले आहेत. ते परिसरातील घरांमध्ये शिरकाव करत आहेत. शिवाय, या कचऱ्यातील अन्नाच्या शोधात काही भटके प्राणी येत आहेत. त्यांच्याही आरोग्याला अपाय होण्याची भीती आहे. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांवर
आयआरबी टोल कंपनी, राज्य रस्ते विकास महामंडळाने कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी विशाल जाधव आणि अशोक चौधरी यांनी केली आहे.
PNE25V59382