गणपती
आले रे आले...गणपती आले.......!!!
किंवा
सुखकर्त्याच्या आगमनासह वातावरण मंगलमय
वाजतगाजत मिरवणुका काढत थाटामाटात प्राणप्रतिष्ठा
पिंपरी, ता. २७ ः गणरायाला घरी आणण्यासाठी उत्साहात निघालेले चिमुकले...विक्रेत्याकडे आपली गणेशमूर्ती घेण्यासाठी सकाळी सहकुटुंब आलेले भाविक, एका ठिकाणची पूजा करून दुसरीकडे जाण्यासाठी लगबगीने निघालेले गुरुजी, घराघरांत उमटणारे आरतीचे सूर..रस्तोरस्ती, गल्लोगल्ली होणारा मंगलमूर्ती मोरयाचा गजर.. अशा भारलेल्या वातावरणात उद्योगनगरीत सुखकर्त्या गणपतीचे आगमन झाले.
मधूनच येणारा पाऊस अंगावर झेलत चालू ढोल-ताशा पथकांनी जोशात वादन केले. या पथकांपाठोपाठ सोसायटी, सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका पाहण्यासाठी शेकडो भाविक रस्त्याच्या दुतर्फा उपस्थित होते. मंडळांचे कार्यकर्ते प्राणप्रतिष्ठेत गर्क होते. फुलांनी सजवलेल्या रथात स्थानापन्न झालेली गणरायाची मूर्ती डोळ्यांचे पारणे फेडत होती. पारंपारिक वेशभूषा करून मिरवणुकीत सहभागी झालेले कार्यकर्ते, महिला आणि चिमुकले अशा गर्दीने रस्ते बहरले होते.
सकाळी दुचाकी, चारचाकी, रिक्षा, टेम्पोतून वाजतगाजत गणेशमूर्ती घरी नेण्यात आली. असंख्य भाविक पायी गणेशमूर्ती घेऊन जात होते. ऐनवेळी पूजा साहित्य खरेदीसाठीही घेण्यासाठी बाजारात गर्दी झाली होती. काही जणांनी मंगळवारी (ता. २६) रात्रीच मूर्ती घरी आणल्याने त्यांनी सकाळी लवकरच गणपतीची पूजा केली.
आधी आरक्षित केलेली मूर्ती घेण्यासाठी सकाळपासूनच शहरातील ठिकठिकाणच्या स्टॉलवर नागरिक सहकुटुंब आले होते. दुसरीकडे सकाळी मूर्ती व त्यानंतर बाजारात जाऊन पूजा साहित्याची खरेदी करतानाही अनेकजण दिसले. नऊवारी तसेच पारंपारिक वेशभूषा केलेल्या महिला व मुले, कुर्ता व टोपी घातलेले पुरुष असे चित्र उत्साहवर्धक होते. आपला लाडका गणपती घरी घेऊन जाताना चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याजोगा होता.
गणपती येणार म्हणून घराबाहेर रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. सजवलेल्या मखरांमध्ये गणराय दिमाखात विराजमान झाले. आपल्या घरात आरती करून मंडळात जाण्यासाठी तरुणांची धावपळ सुरू होती. पूजेचा मुहूर्त गाठण्यासाठी महिलांची तयारी अखंड सुरू होती. कुठे मोदक, कुठे खिरापत तर कुठे खिरीचा प्रसाद, आरती व मंत्रपुष्पांजलीचे स्वर असे चित्र शहरातील सर्वच घरात दिसत होते. पुढील दहा दिवसांमध्ये गणपती देखावे पाहायला कधी जायचे, कोणते गणपती पहायचे याचे नियोजनही आखले जात होते.
सोसायटी व गणेश मंडळांच्या मिरवणुकांचा थाट
शहरातील सर्वच उपनगरांमध्ये मोठ्या सोसायट्यांची संख्या वाढत आहे. या सोसायट्यांमध्येही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच सोसायटीच्या गणपतीचीही मोठ्या दिमाखात मिरवणूक काढली जाते. असेच चित्र बुधवारीही (ता. २७) दिसून आले. शहरातील सर्वच उपनगरांमध्ये विविध सोसायट्यांनी आपल्या आवारात गणपतीची मिरवणूक काढली. तर शहर व उपनगरांतील लहान - मोठ्या मंडळांनीही मिरवणूक काढून सकाळी व सायंकाळी आपल्या गणपतीचे स्वागत केले. या मिरवणुकांमध्ये ढोल - ताशा पथके, लेझीम पथक, ध्वज पथक यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. मिरवणुकीपुढे रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या, अबालवृद्ध मोठ्या उत्साहात या मिरवणुकीत सहभागी झाले होते. गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आपल्या देखाव्याची सज्जता करताना मंडळांचे कार्यकर्ते दिसून आले.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.