क्राइम
गुन्हे वृत्त
-------------
बांधकाम व्यावसायिकाला
मारहाण; एकास अटक
पिंपरी ः एका बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (२६ ऑगस्ट) सकाळी सहाच्या सुमारास हनुमाननगर, ताम्हाणे वस्ती, चिखली येथे घडली.
याप्रकरणी शरद प्रभाकर ताम्हाणे (३१, हनुमान नगर, ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निखिल दिलीप भागवत (३२, आकुर्डी, पुणे) याला अटक करण्यात आली असून, त्याच्यासह काजल नावाच्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखिल भागवतने स्वतःला ‘रावण गँग’चा सदस्य असल्याचे सांगत फिर्यादीकडे बांधकाम व्यवसायासाठी महिन्याला एक लाख रुपये हप्ता देण्याची मागणी केली. फिर्यादीने नकार दिल्यावर आरोपीने शिवीगाळ करत त्यांना दगडाने मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू
पिंपरी ः हिंजवडी येथे एका बांधकाम व्यावसायिकाचा लिफ्टच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना चार एप्रिल २०२५ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास लक्ष्मी चौक, हिंजवडी येथील मिस्त्रीलाल देवासी यांच्या इमारतीत घडली. या प्रकरणी रेहाना बेगम मुश्ताक अली (वय ४५, बुचडेवस्ती, मारुंजी, पुणे) यांनी २६ ऑगस्ट रोजी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये सोमनाथ जिजाबा शितोळे (वय ३६, हिंजवडी, पुणे) आणि मिस्त्रीलाल पेमाजी देवासी (वय ४७, शिंदेवस्ती, मारुंजी, पुणे) यांचा समावेश आहे. बांधकाम व्यावसायिक सोमनाथ शितोळे यांनी फिर्यादीच्या पती मुश्ताक अली यांना लिफ्ट खराब असूनही लिफ्टने खाली जाण्यास सांगितले. इमारतीचे मालक मिस्त्रीलाल देवासी यांनी लिफ्टजवळ पुरेशी लाइट किंवा कोणतीही सुरक्षा जाळी लावली नव्हती. लिफ्टचा सेन्सर खराब असतानाही मुश्ताक अली लिफ्टमध्ये गेले आणि पाचव्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर थांबलेल्या लिफ्टवर पडले, ज्यात ते गंभीर जखमी झाले आणि १४ एप्रिल रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दोन्ही आरोपींच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
भोसरीत विवाहितेची आत्महत्या
पिंपरी ः भोसरी येथे हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्यामुळे एका विवाहितेने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना २५ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास शितलबाग, भोसरी येथे घडली. या प्रकरणी संजय पुजाराम देवरे (वय ५९, अमृतधाम, पंचवटी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अभिजित मुरलीधर शेळके (वय ३१, शितलबाग, भोसरी, पुणे), त्याचे वडील मुरलीधर दगडू शेळके (वय ६०), आणि दोन महिला आरोपी, एक सासू आणि दुसरी नणंद, अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तडीपार आरोपीकडून शस्त्रसाठा जप्त
पिंपरी ः तडीपार केलेल्या आरोपीला बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही घटना २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास निराधार नगर, पिंपरी येथील रेल्वे लाइनजवळ घडली. या प्रकरणात पोलिस हवालदार देवा राऊत यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश ऊर्फ मॅड गण्या भुंगा कांबळे (वय २४, निराधार नगर, पिंपरी) याला अटक करण्यात आली आहे.
तरुणास पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक
तळेगाव दाभाडे येथे एका तरुणाला बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही घटना २६ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास स्नेहल सोसायटीसमोर घडली. या प्रकरणी सुधाकर विश्वनाथ केंद्रे (पोलिस अंमलदार, तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी मुस्तकीम मोहसीन गदवाल (वय १९, एक्झिलबीया सोसायटी, जांभुळगाव, मावळ, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला
ताब्यात घेतले असता त्याच्याकडे बेकायदा ३५ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. आरोपीकडे हे शस्त्र बाळगण्याची कोणतीही कायदेशीर परवानगी नव्हती.
बसमधून चोरट्याने पळविला मोबाईल
पिंपरी ः भोसरी येथे बसमध्ये चढत असताना एका प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळवून नेल्याची घटना घडली. ही घटना २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी सातच्या सुमारास भोसरी पीएमपीएल बस थांब्यावर घडली. या प्रकरणात श्यामसुंदर साळुंखे यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हरीषसिंग श्रीनंदनसिंग बिस्ट (वय ३०, सविधांन चौक, भोसरी, पुणे) याला अटक केली आहे. फिर्यादी बसमध्ये चढत असताना एका अनोळखी चोरट्याने त्यांच्या उजव्या हातातील ३५ हजार रुपये किमतीचा एप्पल कंपनीचा आयफोन जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि पळून गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.