पादचाऱ्यांनो ! तुमची पावले टाका जपून...
अमोल शित्रे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १ ः पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर पादचारी जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडत असल्याचे चित्र दिवसेंदिवस गडद होत आहे. काही ठिकाणी उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग उपलब्ध असले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते; तर अनेक ठिकाणी अशा सोयींचा अभाव असल्याने नागरिकांना वेगवान वाहनांचा अंदाज घेतच महामार्ग पार करावा लागत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार ?, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू, पुणे-नाशिक आणि पुणे-मुंबई या राष्ट्रीय महामार्गांवर दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढत आहे. या महामार्गांवरील वाकड फाटा ते किवळे हा पट्टा शहराच्या हद्दीत येतो. मात्र, या भागांत पादचाऱ्यांसाठी सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्याची सुविधा अत्यंत मर्यादित आहे. भूमकर चौकातील एकमेव भुयारी मार्ग वगळता इतरत्र कुठेही पादचारी मार्ग अथवा भुयारी सुविधा नाही. त्यामुळे कामगार, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना महामार्ग ओलांडताना जीव मुठीत घेऊनच पाऊल टाकावे लागते. भूमकर चौकात भुयारी मार्ग असून देखील त्याचा वापर कमी प्रमाणात केला जातो. कारण, चौकातून काही अंतर चालत जावे लागत असल्याने नागरिक थेट महामार्ग ओलांडणे पसंत करतात. या भागात यापूर्वी अनेकदा अपघात घडले असून नागरिकांना आपला जीव धोक्यात घालावा लागल्याची उदाहरणे आहेत.
मुंबई - बंगळुरू महामार्ग
- केवळ भूमकर चौकात भुयारी मार्ग, मात्र पादचाऱ्यांकडून कमी वापर
- ताथवडे चौक, पुनावळे चौक आणि किवळे येथे भुयारी मार्ग किंवा पादचारी पुलाचा अभाव
- वाकड फाटा उड्डाणपुलाखाली हिंजवडीकडे जाण्यासाठी थेट महामार्ग ओलांडण्याचे प्रकार
भोसरीत मोजके पादचारी पूल
पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर काही ठिकाणी पादचारी पूल असले तरी बहुसंख्य ठिकाणी नागरिकांना थेट वाहनांच्या वेगाचा अंदाज घेतच रस्ता ओलांडावा लागतो. सध्या भोसरी आणि मोशी येथील चौकांमध्ये दररोज शेकडो कामगार, विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक आणि ज्येष्ठ नागरिक घाईगडबडीत थेट रस्ता ओलांडतात. या मार्गावर महिन्यातून सरासरी एक ते दोन अपघात घडत असून त्यात पादचाऱ्यांना जीव गमवावा लागतो किंवा गंभीर दुखापती सहन कराव्या लागतात. त्यामुळे आवश्यक चौकांमध्ये पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग किंवा पादचारी पूल उभारण्याची मागणी वेगाने होत आहे.
पुणे-नाशिक महामार्ग
- भोसरीतील शीतल बाग, मोशी, टोलनाका चौक येथे पूल उपलब्ध
- नाशिक फाटा ते लांडेवाडी दरम्यान रस्ता ओलांडण्याचा कोणताही पर्यायी मार्ग
- धावडे वस्तीतील पीएमपीएमएल डेपो चौक, गणेश साम्राज्य चौक, भारत माता चौक आणि मोशी चौक येथे पादचारी पूल अथवा भुयारी मार्गाची तातडीने गरज
पादचारी भुयारी मार्ग, पुलांचा वापर कमी
पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या पुणे - मुंबई महामार्गावर अनेक ठिकाणी पादचारी पूल आणि भुयारी मार्ग उपलब्ध आहेत. मात्र, पादचाऱ्यांकडून त्यांचा अपेक्षित वापर होत नाही. दापोडी, फुगेवाडी आणि कासारवाडी परिसरात महामार्गाच्या एका बाजूला सीएमई क्षेत्र असल्याने रस्ता ओलांडणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. परंतु, नाशिक फाटा ते निगडी दरम्यानची परिस्थिती वेगळी आहे. या मार्गावर पादचारी पूल आणि भुयारी सुविधा असतानाही मोठ्या संख्येने नागरिक भरधाव वाहनांच्या मधून जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडतात. वल्लभनगर येथे समतल विलगक मार्ग असूनही पादचारी तो थेट ओलांडतात. खराळवाडीत पादचारी पूल उपलब्ध असतानाही नागरिक रस्ता ओलांडण्याची जोखीम उचलतात. तसेच चिंचवड येथील मदर तेरेसा उड्डाणपूल, चिंचवड स्टेशन चौक, काळभोरनगर आणि निगडीतील मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळ पादचारी सुविधा असूनदेखील नागरिक थेट ग्रेड सेपरेटरमधून रस्ता ओलांडण्यासाठी जीव धोक्यात घालतात.
महामार्गांवर अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेने अनेक ठिकाणी पादचारी पूल आणि भुयारी मार्ग उभारले आहेत. मात्र, काही पादचारी या सुविधांचा वापर करत नाहीत. रस्ता पटकन ओलांडून पलीकडे जाण्याची घाई आणि अतिरिक्त चालण्याचा कंटाळा यामुळे नागरिक थेट महामार्ग ओलांडतात. ५० मीटरचा रस्ता ओलांडण्यासाठी १५० मीटर चालावे लागते, याची अनेकांना खंत असते. पण, अशी घाईघाईत उचललेली पावले पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरतात.
- बापूसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, रस्ते स्थापत्य विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.