चऱ्होलीतील ‘आवास’; गैरसोईंनी त्रास

चऱ्होलीतील ‘आवास’; गैरसोईंनी त्रास

Published on

पिंपरी, ता. ३ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने चऱ्होली कोतवालवाडी येथे पंतप्रधान आवास योजना (शहरी) अंतर्गत गृहप्रकल्प उभारला. पण, तेथे प्राथमिक सुविधांसाठी नागरिकांना झगडावे लागत आहे. येथील अनेक समस्यांवर रहिवाशांनी बोट ठेवले आहे. यात प्रामुख्याने स्वच्छता, पाणीपुरवठा, इतर सुविधांसाठी संघर्ष करण्याची वेळ आल्याचे नागरिक सांगत आहेत.

जानेवारी २०२४ मध्ये उभारलेला हा प्रकल्प रहिवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. १४ मजली असलेल्या सात इमारतींमध्ये १,४०० पेक्षा जास्त सदनिका लाभार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. पण, तेथे मूलभूत सुविधांच्या अभावामुळे रहिवासी मनस्ताप सहन करत आहेत, अशी कैफियत येथील रहिवाशांनी मांडली. येथे तीनपैकी केवळ एकच प्रवेशद्वार वापरात आहे. उर्वरित दोन प्रवेशद्वारांचे बांधकाम अर्धवट आहे. तसेच कॉमन हॉल, गार्डन व मुलांसाठी खेळणी आजतागायत पूर्ण करण्यात आलेली नाहीत
उपलब्ध सुविधा वापरता येत नाहीत, असे रहिवाशांनी सांगितले. विशेष म्हणजे, इमारतींतील कोणत्याही जिन्याला भिंतीलगत रेलिंग बसवलेले नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
अपघात होण्याचीही शक्यता कायम आहे. परिसरातील गटारे व्यवस्थित न बसविल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचते.
साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन डेंगी, मलेरिया अशा आजारांचा धोका असल्याची येथील रहिवासी सांगत आहेत.

पाणीपुरवठ्याची समस्या
- महापालिकेकडून पाणीपुरवठा एक दिवसाआड केला जातो.
- पुरवठा अपुरा आणि अनियमित असल्यामुळे अनेकदा टॅंकरचा आधार घ्यावा लागतो.
- सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद असल्याने निचऱ्याची समस्या वाढली असून परिसरात अस्वच्छता पसरते.

गळती आणि निकृष्ट दर्जाचे काम
अनेक सदनिकांच्या भिंतींमध्ये व स्लॅबमध्ये गळती (लीकेज) आहे
यामुळे पावसाळ्यात पाणी घरात शिरून रहिवाशांचे मोठे नुकसान होते
व्यावसायिक गाळे बांधून तयार असूनही आजतागायत हस्तांतरित केले गेले नाहीत

कचरा व्यवस्थापन ठप्प
कचरा संकलन करणारी गाडी नियमित येत नाही
त्यामुळे इमारतींमध्ये साचलेला कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावला जात नाही
भटक्या श्वानांमुळे हा कचरा सर्वत्र पसरतो व दुर्गंधी पसरते

नागरिकांच्या मागण्या
- नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करावा
- सांडपाणी प्रक्रिया केंद्र तातडीने सुरू करावे
- कचरा व्यवस्थापन नियमित करावे
- अर्धवट गेट, कॉमन हॉल, गार्डन व खेळणी यांची कामे पूर्ण करावीत
- जिन्यांना रेलिंग बसवून सुरक्षा द्यावी
- लीकेजची समस्या कायमस्वरूपी सोडवावी

पंतप्रधान आवास योजना ही गोरगरिबांसाठी घरकुल उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र, चऱ्होलीतील प्रकल्पात मूलभूत सोयींचा अभाव असल्याने नागरिकांच्या अपेक्षांना धक्का बसला आहे. नागरिकांचा प्रश्न असा आहे की घर मिळाले, पण जगण्यासाठी आवश्यक सुविधा मिळणार कधी?
- हरिदास शिंदे, दिव्यांग लाभार्थी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com