नोकऱ्यांचे प्रमाण तळाला, आयटी अभियंते गळाला

नोकऱ्यांचे प्रमाण तळाला, आयटी अभियंते गळाला

Published on

पिंपरी, ता. ५ ः आमच्याकडे इतके लाख रुपये भरा, तुम्हाला प्रशिक्षण मिळेल, मग नोकरी सुद्धा लावू, अशी आश्वासने देऊन हिंजवडीतील एका कंपनीने शेकडो आयटी अभियंत्यांना लाखो रुपयांना गंडा घातला. एका आयटी अभियंत्याने फिर्याद दाखल करण्याचे धाडस दाखविल्याने या प्रकाराला वाचा फुटली. यात तब्बल चारशे पेक्षा जास्त तरुणांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय घडामोडींमुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्या कमी झाल्या असून असुरक्षितता वाढीस लागल्याचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत.
उघडकीस आलेल्या एका प्रकरणात उमेदवारांना दोन महिने मानधनही देण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या सबबी सांगून चार महिने कोणताही मोबदला देण्यात आला नाही. आता संबंधित कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे.
असुरक्षिततेची भावना
या प्रकरणाची व्याप्ती पाहता आयटी क्षेत्रात नोकऱ्या घटल्याने तरुण अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडत आहेत. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार हेरून पैसे उकळण्याचे प्रकार सर्रास होत असल्याचे फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज या संघटनेने सांगितले आहे. कोरोना काळानंतर बहुतांश कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर भरती (मास रिक्रुटमेंट) बंद केली आहे. त्यामुळे कॅम्पसमधून निवड झाली नाही तर आयटी अभियंत्यांना नोकरी शोधण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अशातच दोन वर्षे उलटूनही नोकरी मिळाली नाही तर आलेली संधी काहीही करून मिळविण्याची उमेदवारांची धडपड सुरू असते. अशाच उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पैसे मागितले जातात आणि त्यांची फसवणूक केली जाते.

ऑनलाइन पोर्टलचा आधार
अनेक उमेदवार नोकरी शोधण्यासाठी ऑनलाइन पोर्टलचा आधार घेतात. त्यावरूनच उमेदवारांची माहिती आयती मिळते. कोरोना काळामध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मुलाखती ऑनलाइन घेतल्या जातात. प्रशिक्षणाचे आश्‍वासन मिळाल्याने उमेदवार कंपन्यांवर विश्‍वास ठेवतात. ग्रामीण भागातील तरुणांना शहरात येऊन कंपनीची शहानिशा करणे शक्य होत नसल्याने बऱ्याचदा अशाच उमेदवारांना जाळ्यात अडकविले जाते.
---
हे लक्षात ठेवा
- कोणतीही कंपनी नोकरी देण्याआधी प्रशिक्षणाच्या नावाखाली पैसे घेत असेल तर लगेच विश्‍वास ठेऊ नका
- अर्ज करण्यापूर्वी कंपनीची माहिती तपासून घ्या
- कंपनीची अधिकृत वेबसाइट, कार्यालयाचा पत्ता, ऑनलाइन व सोशल मीडियावरील कंपनीबद्दलच्या प्रतिक्रिया तपासा
- कोणतीही कंपनी कमी प्रयत्नात जास्त पगाराची किंवा आकर्षक पॅकेजची ऑफर देत असेल तर त्यावर लगेच विश्वास ठेवू नका.
- कंपनीत सध्या काम करणाऱ्या किंवा पूर्वी काम केलेल्या लोकांशी संपर्क साधून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करा
- कंपनीला मिळालेले प्रकल्प, कंपनीचे उत्पन्न, ग्राहक आदी बाबींची माहिती मिळवा
---

प्लेसमेंटसाठी किंवा प्रशिक्षणासाठी कोणी पैसे देत मागत असेल तर तिथेच उमेदवाराने खातरजमा केली पाहिजे. जिथे पैशांची मागणी होते तिथे संशयास नेहमीच वाव असतो. अशा संस्थेबाबत चौकशी करणे गरजेचे असते.
- निखिल वाळके, उपायुक्त, कामगार विभाग
---
नोकरीच्या संधी मिळवून देणाऱ्या प्लेसमेंटकडे नोंदणी करण्यासाठी अमुक एक रक्कम भरणे हा वेगळा भाग आहे. मात्र जेव्हा नोकरीला लावण्यासाठी लाखो रुपये मागितले जातात तेव्हाच उमेदवाराने नकार देणे अपेक्षित आहे. शंका आल्यास लगेचच पोलिसांकडे तक्रार करावी.
- बालाजी पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
---
कोरोना कालावधीनंतर आयटी क्षेत्रात फ्रेशर्सला नोकरीच्या संधी कमी झालेल्या आहेत. मास रिक्रुटमेंटही कमी झाल्या आहेत. परिणामी सध्या असंख्य आयटी अभियंत्यांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. फ्रेशर्सवर नोकरी मिळविण्याचा जास्त दबाव असल्याने अशा उमेदवारांची प्रोफाइल ऑनलाइन पोर्टलवरून निवडली जाते. त्यांनाच जाळ्यात ओढले जाते.
- पवनजीत माने, अध्यक्ष, फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com