क्राइमच्या बातम्या
कंपनीचा आयडी वापरून
मैत्रिणीकडून पाच लाखांचा अपहार
पिंपरी ः एका महिलेच्या बँक खात्यातील पाच लाख रुपये तिच्याच मैत्रिणीने वैयक्तिक कारणांसाठी वापरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना यावर्षी जानेवारी महिन्यात धन्वंतरी क्लिनिक, चऱ्होली येथे घडली. आरोपी महिलेने तिच्या कंपनीचा आयडी वापरून मैत्रिणीच्या नावे परस्पर खरेदी केली. या प्रकरणात दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन महिला आणि अभिजित राजन कानगुडे (रा. मनीष ऑर्चिड, चऱ्होली) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने व्यवसायाबाबत चर्चा करण्यासाठी आरोपी महिलेला तिचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड दिले होते. आरोपीने त्या माहितीचा उपयोग करून कोणताही करार केला नाही आणि करार करण्यास टाळाटाळ केली. आरोपीने पीडित महिलेकडून व्यवसायासाठी सात आणि आठ जानेवारी रोजी घेतलेले पाच लाख रुपये तिच्या वैयक्तिक कामासाठी वापरले. त्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी क्यूनेट कंपनीसोबत केलेल्या खरेदीचा संबंध व्यवहाराशी जोडला. दिघी पोलिस याचा तपास करत आहेत.
शांत बसण्यास सांगितल्याने एकास मारहाण
पिंपरी ः चित्रपटगृहात शांत बसण्याची विनंती केल्यामुळे एका तरुणावर हल्ला करण्यात आला. ही घटना चिंचवड येथील थिएटरमध्ये घडली. या प्रकरणात अभिषेक प्रफुल्ल देशपांडे (२९, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अकीब जावेद निसार पटेल आणि त्याची पत्नी (वल्लभनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक, त्याची पत्नी आणि बहिणीसोबत चित्रपट पाहत असताना त्याच्या मागील सीटवर बसलेल्या आरोपीला त्याने ‘स्टोरी आधी सांगू नका’ आणि ‘शांत बसा’ अशी विनंती केली. यामुळे चिडून आरोपीने अभिषेकची कॉलर पकडून त्याला मारहाण केली आणि खाली पाडले. आरोपीने त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे त्याच्या डाव्या हाताला, चेहऱ्याला आणि पोटाला दुखापत झाली. अभिषेकची पत्नी भांडण सोडवण्यासाठी पुढे आली, तेव्हा आरोपी आणि त्याच्या पत्नीने तिलाही मारहाण केली आणि दोघांना शिवीगाळ केली.
जुन्या भांडणाच्या वादातून दगडाने मारहाण
पिंपरी ः जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणाच्या डोक्यात दगड मारून त्याला जखमी करण्यात आले. ही घटना रविवारी (ता. ७) रात्री बकाजी कॉर्नर, बावधन येथे घडली. या प्रकरणी कार्तिक दगडे यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साईराज दगडे आणि विशाल भुंडे (बावधन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्तिक आणि त्याचा मित्र हर्षल भुंडे अफरोज यांच्यासोबत घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली आणि मारहाण केली. अफरोज भांडण सोडविण्याचा प्रयत्न करत असताना विशाल भुंडेने रस्त्यावरील दगड उचलून कार्तिकच्या डोक्यात मारला. साईराज दगडेने हर्षलच्या उजव्या हातावर दगड मारून त्याला किरकोळ जखमी केले. त्यानंतर विशालने अफरोजच्या डोक्यात दगड मारून त्याला जखमी केले.
टेम्पो चालकाच्या दुर्लक्षामुळे दोन महिलांचा मृत्यू
पिंपरी ः टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणामुळे सतरा वर्षीय तरुणी आणि ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सहा सप्टेंबर रोजी रात्री भोसरी येथे गृहलक्ष्मी कॉलनीकडून सदगुरुनगर कमानकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. कादंबरी काशिनाथ गादेकर (वय १७) आणि प्रतिभा कृष्णा आंबटवार (वय ३२) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी काशिनाथ गादेकर यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हनुमंत वाडेकर (वय ३६, शिरोली, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी हनुमंत वाडेकर त्याच्या ताब्यात असलेला साऊंड सिस्टीम टेम्पो वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वेगाने चालवत होता. त्याने फिर्यादीची मुलगी कादंबरी आणि मेव्हण्याची पत्नी प्रतिभा आंबटवार यांना जोरात धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळी न थांबता पळून जात असताना लोकांनी त्याला पकडले.
भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक
पिंपरी ः वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत एका अनोळखी चारचाकी चालकाने दुचाकीला धडक दिली. ही घटना काळेवाडी
फाटा ते रहाटणी फाटा या दरम्यान बीआरटीमध्ये घडली. या प्रकरणी प्रमोद राजेंद्र माने (वय ३६, रहाटणी) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोटारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किवळे येथे गोवंश तस्करी करणाऱ्यांवर गुन्हा
कत्तलखान्यात घेऊन जाण्यासाठी दोन जर्सी गायींची दाटीवाटीने वाहतूक करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी किवळे येथील समीर लॉन्सजवळ करण्यात आली.या प्रकरणी पोलिस हवालदार गणेश कदम यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रसाद जाधव (वय ३६, रहाटणी) आणि बाळा पवार (चांदखेड, मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.