नोंदणीकृत पोस्ट सेवा होणार वेगवान

नोंदणीकृत पोस्ट सेवा होणार वेगवान

Published on

पिंपरी, ता. ९ : ‘‘नोंदणीकृत टपाल (रजिस्टर्ड पोस्ट) सेवा एक सप्टेंबरपासून बंद होणार’’ अशी अफवा पसरली होती. मात्र, ‘‘ही सेवा बंद न होता ती अधिक जलद आणि कार्यक्षम करण्यासाठी सुधारणा करण्यात येणार आहेत. त्‍यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये,’’ असे आवाहन चिंचवड टपाल कार्यालयाचे जनसंपर्क निरीक्षक नितीन बने यांनी केले आहे.

स्मार्ट पोस्ट आणि नोंदणीकृत पोस्ट या दोन्हींमध्ये डिलिव्हरी पद्धतीत महत्त्वाचा फरक आहे. स्मार्ट पोस्टमधून पत्र थेट दिले जाते. तर, नोंदणीकृत पोस्टमधील पार्सल किंवा पत्र फक्त नोंदणी केलेल्या व्यक्तीलाच दिले जाते. तसेच पत्र स्वीकारल्याची पावती देण्यात येते. त्यामुळेच ही सेवा नागरिकांच्या दृष्टीने विश्वासार्ह मानली जाते. आता नव्या निर्णयानुसार नोंदणीकृत पोस्ट सेवेसाठी हवाई मार्गाचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे डिलिव्हरी कालावधी कमी होऊन सेवा अधिक जलद व सोयीस्कर होणार आहे. हवाई वाहतुकीमुळे पत्रे व पार्सल निश्चित वेळेत गंतव्यस्थळी पोचवता येतील. ग्राहकांना पत्र स्वीकारण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध असतील.
सामान्य डिलिव्हरी अंतर्गत पत्र कोणालाही देता येईल, तर प्राधान्य डिलिव्हरीमध्ये फक्त नोंदणी केलेल्या व्यक्तीलाच पत्र दिले जाईल आणि पावती घेण्यात येईल. या सुविधेमुळे व्यवहारिक आणि कायदेशीर पत्रव्यवहार अधिक सुरक्षित पद्धतीने होणार आहे, अशी माहिती टपाल विभागातर्फे देण्यात आली आहे.


रजिस्टर्ड पोस्ट अत्यंत विश्वासार्ह सेवा आहे. ती बंद न करता त्यामध्ये सुधारणा केल्या जात आहेत. ग्राहकांना अधिक विश्वास, सुरक्षितता आणि वेळेत सेवा मिळावी, यासाठी ही सुधारणा केली जात आहे.
- नितीन बने, टपाल जनसंपर्क निरीक्षक

Marathi News Esakal
www.esakal.com