ऐन सणासुदीत फुल उत्पादक ‘कोमेजले’
पिंपरी,ता. ९ ः प्लॅस्टिकच्या फुलांवरील बंदी कागदावरच राहिल्याने यंदा गणेशोत्सवामध्ये फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर घटली. प्लॅस्टिकची फुले बाजारात आल्याने झालेली घट, त्यामुळे घसरलेले फुलांचे भाव; तर दुसरीकडे पावसाळा लवकर झाल्याने उत्पादनावर झालेला परिणाम या कारणांमुळे सणासुदीच्या काळातही फूल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
यंदा मे महिन्यातच सुरू झालेला पावसाळा, सततचे ढगाळ वातावरण, कमी काळात पडलेला जास्त पाऊस याचा यंदा फुलांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. अनेक फूल उत्पादकांनी हवामानाचा अंदाज घेऊन त्यानुसार फुलशेती केली. तरी देखील त्यांचे उत्पादन २५ ते ३० टक्क्यांनी घटले. तर इतर शेतकऱ्यांना त्याही पेक्षा अधिक नुकसानीला सामोरे जावे लागले. दरवर्षी गौरी - गणपतीच्या काळात सुमारे २० ते २२ लाख फुले बाजारात येतात. मात्र, यंदा केवळ १५ लाख फुलांचे उत्पादन झाले.
प्लास्टिककडे ग्राहकांचा कल
यंदा पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याचा अध्यादेश न आल्याने सणाचा काळ सुरू होण्याच्या आधीपासूनच शहरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकची फुले दाखल झाली. खऱ्या फुलांपेक्षा स्वस्त, हुबेहुब आणि जास्त काळ टिकणारी असल्याने नागरिकांनीही खऱ्या फुलांकडे पाठ फिरवत प्लास्टिकच्या फुलांची खरेदी केली. त्यामुळे गुलाब, शेवंती, अस्टर, गुलछडी, ऑर्किड या सर्वच फुलांची मागणी ऐन सणासुदीच्या काळात घटली. परिणामी, घाऊक बाजारातील दरही कोसळले. गेल्या वर्षी प्रतिनग १२ ते १४ रुपयांना विकले जाणारे गुलाब यंदा केवळ आठ रुपयांना विकले गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांना फायदा
घाऊक बाजारात शेतकऱ्यांकडून कमी दरात फुलांची खरेदी झाली. मात्र, दुसरीकडे ऐन गौरी गणपतीच्या काळात किरकोळ बाजारात खऱ्या फुलांचे दर वाढलेले चित्र दिसले. पावसाचे कारण देत किरकोळ व्यापाऱ्यांनी एक गुलाबासाठी तब्बल २५ ते ३० रुपये एवढी किंमत आकारली. त्यामुळे ग्राहकांसाठी खऱ्या फुलांचे दर वाढले असले तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
यंदा राज्यात मॉन्सून लवकर दाखल झाला. त्याचा फुलशेतीवर प्रतिकूल परिणाम झाला. दरवर्षी जिथे २० ते २२ लाख फुलांचे उत्पादन होते. तिथे यंदा गणपती उत्सवात १५ लाख फुले मावळातून विक्रीसाठी गेली. एवढी कमी आवक होऊनही फुलांना योग्य भाव मिळाला नाही. महाराष्ट्रानंतर उत्तर भारतात फुलांची मोठी विक्री होते. मात्र, तिकडूनही यंदा मागणी नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. प्लास्टिकची फुले ऐन सणासुदीच्या काळात बाजारात दाखल झाल्याने त्याचाही फटका यंदा फूल विक्रीला बसला आहे.
- मुकूंद ठकार, अध्यक्ष, पवना फूल उत्पादक संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.