पिंपरीतील सोसायटीचे
चार सदस्य अपात्र

पिंपरीतील सोसायटीचे चार सदस्य अपात्र

Published on

पिंपरी, ता. २९ : द ज्‍वेल ऑफ पिंपरी प्रिमायसेस सहकारी संस्‍थेच्या व्यवस्थापन समितीतील चार सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. सहकारी संस्था पुणे शहर ३ विभागाचे उपनिबंधक नागनाथ कंजेरी यांनी ही कारवाई केली आहे. यासंदर्भातील आदेश १२ डिसेंबरला पारित करण्यात आला आहे. संबंधित सदस्यांवर कारवाई करण्याबाबत संस्थेनेच अर्ज सादर केला होता. त्या अनुषंगाने चौकशी करून उपनिबंधकांनी हा निर्णय घेतला. अपात्र ठरविण्यात आलेल्या सदस्यांमध्ये अरुण विश्‍वनाथ रिंगणे, विजयकुमार जगन्‍नाथ बामणे, ज्योती संदेश चव्हाण आणि सुनीता चंद्रशेखर मुसमाडे यांचा समावेश आहे. यापैकी रिंगणे हे माजी खजिनदार होते. उपनिबंधक कार्यालयाच्या तपासणीत हे सर्व सदस्य थकबाकीदार असल्याचे स्पष्ट झाले. संस्थेच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण अहवालात थकबाकीदार सदस्यांची सविस्तर यादी नमूद करण्यात आली होती. त्या यादीत वरील चार सदस्यांची गेल्या सुमारे १८ महिन्यांपासून थकबाकी असल्याचे निदर्शनास आले. सहकारी संस्थेच्या नियमांनुसार व्यवस्थापन समितीतील सदस्यांनी आर्थिक शिस्त पाळणे आणि संस्थेप्रती जबाबदारीने वागणे अपेक्षित असते, मात्र दीर्घकाळ थकबाकी कायम राहिल्यामुळे संबंधित सदस्य संस्थेच्या कारभारासाठी आवश्यक असलेली जबाबदारी पार पाडण्यास अपात्र ठरत असल्याचा निष्कर्ष उपनिबंधकांनी काढला. या पार्श्वभूमीवर सहकारी कायद्याच्या तरतुदीनुसार चारही सदस्यांना व्यवस्थापन समितीच्या सदस्यत्वासाठी अपात्र घोषित करण्याची कार्यवाही करण्यात आली.
-----

Marathi News Esakal
www.esakal.com