रिक्षा चालकांना बसतोय दंडाचा भुर्दंड

रिक्षा चालकांना बसतोय दंडाचा भुर्दंड

Published on

सोमाटणे, ता. १९ ः वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आयटीएमएस प्रणाली सुरू करण्यात आली. यासाठी जुन्या उर्से टोलनाक्याजवळील रिक्षा थांब्यानजीक दोन्ही प्रवेश मार्गाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. या कॅमेऱ्यांमुळे रिक्षा चालकांच्या अडचणी वाढल्या असून प्रवाशांना घेण्यासाठी द्रुतगती मार्गाजवळ जाताच पंधराशे ते दोन हजार रुपये दंडाचा भुर्दंड बसत आहे.
पुणे-मुंबई महामार्गाकडून द्रुतगती मार्गाकडे जा-ये करण्यासाठी रिक्षा हा महत्त्वाचा दुवा आहे. रिक्षा सेवेमुळे रात्री उशिरा द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका येथे उतरून प्रवाशांना रिक्षाच्या साह्याने जुन्या पुणे-मुंबई मार्गाकडे जा-ये करता येते. रिक्षाची ही सेवा अडीच दशकापासून सुरळीत सुरु होती. परंतु यावर्षी एप्रिल महिन्यात जुन्या उर्से टोलनाक्याचे स्थलांतर झाले. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकावर कारवाईसाठी आयटीएमएस प्राणाली सुरु झाली. त्यामुळे रिक्षाचालकांना दंडाचा फटका बसायला लागला. दिवसभर कष्ट करून पाचशे रुपये तर महिन्याला कसेबसे पंधरा हजार रुपये मिळवणाऱ्या रिक्षा चालकांना महिन्यातून चार ते पाच वेळा दंड बसल्यास त्यांची महिन्याची कमाई दंडातच वजावट होऊ लागल्याने घरखर्च कसा भागवायचा ही समस्या निर्माण झाली आहे. त्यातच काही रिक्षा चालकांना दंड भरण्यासाठी पिंपरी-चिंचवड परिवहन विभागात तर काहींना मालाड(मुंबई) येथील परिवहन कार्यालयाचा आदेश येतो. मालाड येथे दंड भरण्यासाठी जाताना पाचशे ते सातशे रुपयाचा प्रवास खर्चाचा आणखी भुर्दंड होतो. या प्रकारामुळे अनेकांनी द्रुतगती मार्गालगत न जाता दूरवर थांबून प्रवासी वाहतूक सुरू कली.या प्रकारामुळे द्रुतगती मार्गावर बसमधून उतरणाऱ्या प्रवाशांना पायपीट करत रिक्षा जवळ यावे लागते. रिक्षा चालकांची ही समस्या सोडवण्यासाठी रिक्षा थांब्याजवळील सीसीटीव्ही कॅमेरे अन्यत्र हालवावे यासाठी आमदार सुनील शेळके यांनी लक्ष घालावे अशी मागणी सामाजित कार्यकर्ते रिक्षा संघटनेचे प्रमुख दिलीप डोळस यांनी केली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com