क्राइमच्या घडामोळी

क्राइमच्या घडामोळी

Published on

काडीपेटी न दिल्याने एकावर खुनीहल्ला
पिंपरी : काडीपेटी मागण्याचे निमित्त करून दोन अनोळखी व्यक्तींनी मजुरावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर रोख रक्कम ३३ हजार पाचशे रुपये आणि मोबाइल पळविला. ही घटना चाकण बसस्थानक नाणेकरवाडी येथे मंगळवारी (ता.१९) रात्री घडली. या प्रकरणी सुरेश शांताराम चव्हाण (३२, पारध, यवतमाळ) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने तपास करत अक्षय सुभाष पवार (२६, खराबवाडी, खेड. मूळ रा. नाशिक) याला अटक केली आहे.

बनावट सोने तारण ठेवून सोसायटीची फसवणूक
पिंपरी : क्रेडिट सोसायटीमध्ये बनावट सोने तारण ठेवून कर्ज मिळवले. या कर्जाची रक्कम परस्पर दुसऱ्या फायनान्स कंपनीचे कर्ज भरण्यासाठी वापरली. सोने बनावट असल्याचे उघड झाल्यावर उर्वरित रक्कम न भरता आरोपी पळून गेला. ही घटना ९ सप्टेंबर रोजी युनायटेड अर्बन को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मोरवाडी येथे उघडकीस आली. या प्रकरणी संत तुकारामनगर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या बाबत राजेशकुमार मधुसुदन भोई (४५, मोरवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक गांधिले (२५, लांडेवाडी, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने संबंधित सोसायटीमध्ये सोने तारण कर्जाची मागणी केली.सोसायटीने कर्जाची रक्कम थेट बजाज फायनान्सकडे पाठवली. त्यावेळी तारण ठेवलेले दागिने तपासले असता ते बनावट आढळले. सोसायटीने विचारणा केल्यावर सोने बनावट असल्याचे आरोपीने कबूल केले आणि दोन दिवसांत कर्ज फेडण्याची लेखी हमी दिली. त्यानंतर पोलिस चौकशीसाठी बोलावले असता तो हजर राहिला नाही. त्याने ५ लाख ५४ हजार रुपये ऑनलाइन परतफेड केली. उर्वरित ७ लाख ६ हजार ६०१ रुपये न भरता त्याने पोबारा केला.

मालवाहू वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू
पिंपरी : मालवाहू वाहनाने मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही महिला दुचाकी चालकाकडे लिफ्ट मागून प्रवास करत होती. शिक्रापूर चाकणरोड, साबळेवाडीमध्ये हा अपघात घडला. सिंधुबाई पांडुरंग शेळके (६५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी रामनाथ नवनाथ घोडके (४८, शिक्रापूर) यांनी चाकण पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. या प्रकरणी संबंधित वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रावेत येथे दुचाकीच्या धडकेत ट्रॅफिक वॉर्डन जखमी
पिंपरी : ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीची ट्रॅफिक वॉर्डनला धडक बसली. ही घटना मंगळवारी (ता.१८) सकाळी मस्के वस्ती चौक, रावेत येथे घडली. या अपघातात सिद्धार्थ युवराज कांबळे (३२, निगडी) असे जखमी झालेल्या ट्रॅफिक वॉर्डनचे नाव आहे. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल नितीन लोंढे यांनी रावेत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ते मस्के वस्ती येथे वाहतूक नियंत्रण करत होते. त्यावेळी ट्रिपल सीट आणि वेगाने येणाऱ्या बुलेट क्र. एमएच १४-एमडी ७५४८ चालकाला शिट्टीद्वारे थांबण्याचा इशारा करण्यात आला. मात्र, आरोपींनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आणि दुचाकीची धडक सिद्धार्थ कांबळे यांना बसली. त्यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मदत न करता तिघेही आरोपी पसार झाले. यानंतर रावेत पोलिसांनी या बुलेटचालक आणि अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुनावळे परिसरात स्पा सेंटरवर छापा
पिंपरी : देहविक्री व्यवसाय चालविणाऱ्या स्‍पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी गजानननगर येथील ४१ वर्षीय महिलेविरोधात रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला मूळची नरखेड, सोलापूर येथील आहे. पोलिस हवालदार नीलम संतोष बुचडे (३७) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी महिलेने पुनावळे येथील एका आयुर्वेद स्पा सेंटरमध्ये पैसे मिळतील म्हणून दोन महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे समोर आले. तपासादरम्यान आरोपी महिला पसार झाली आहे.

गांजा बाळगल्‍याप्रकरणी महिलेवर गुन्‍हा
पिंपरी : अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून २ किलो ८७० ग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई खंडोबा माळ, आकुर्डी येथे करण्‍यात आली. पोलिसांनी या प्रकरणी जमतानी खडी मशीन झोपडपट्टी येथील ५५ वर्षीय महिलेविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिस कॉन्स्टेबल सदानंद रुद्राक्षे यांनी निगडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. तिने हा गांजा सतीश पवार नावाच्या व्यक्तीकडून आणल्याचे सांगितले. याचा अधिक तपास निगडी पोलिस करत आहेत.

बनावट मद्यनिर्मितीचे साहित्य जप्त
पिंपरी : बनावट मद्य निर्मितीसाठीचेदोन हजार लिटर गुळमिश्रीत कच्चे रसायन जप्त करण्यात आले. या प्रकरणी एका महिलेवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. मावळ तालुक्‍यातील सुदवडी गावात ही कारवाई झाली. या प्रकरणी देहूजवळील येलवाडी येथील महिलेविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. पोलिस कॉन्स्टेबल अनंत रावण (४५) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com