

पिंपरी, ता. २३ : शहराच्या भूगर्भात सुमारे दोन हजार ८२६ किलोमीटरच्या जलवाहिन्या आहेत. यात पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यामुळे कोणती जलवाहिनी कोणाची यावरून एकमेकांकडे बोट दाखवले जात आहे. भविष्यात वाद टाळण्यासाठी आता समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पिंपरी चिंचवड शहराचा वेळोवेळी विस्तार झाला आहे. लगतची गावे तीन टप्प्यांत समाविष्ट करण्यात आली. वाढती लोकसंख्येमुळे पाण्याची मागणीही वाढली आहे. पिंपरी चिंचवड शहराला आंद्रा, पवना या धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी पवना धरणातून दररोज सरासरी ५३९ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा केला जातो. सध्या दररोज सरासरी ४०४ दशलक्ष लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. यासाठी निगडी आणि चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. सध्या आंद्रा धरणाचे पाणी इंद्रायणी नदीपात्राद्वारे चिखली जलशुद्धीकरण केंद्रात येते. तेथून चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, दिघी, बोपखेल, भोसरी आणि प्राधिकरण या परिसरांत पाणीपुरवठा होणार आहे. तर, निगडी केंद्रातून उर्वरित शहरात पाणीपुरवठा केला जातो. यासाठी समाविष्ट गावांसह शहरात एकूण २९९ किमी अंतराच्या मुख्य आणि २,३६० किलोमीटरच्या वितरण जलवाहिन्या आहेत.
यातील बहुतांश जलवाहिन्या पंचवीस ते तीस वर्षांपूर्वीच्या आहेत. बहुतांश ठिकाणी एकाच मार्गावरुन पिंपरी चिंचवड, पुणे महापालिका आणि एमआयडीसी किंवा दोन्ही महापालिकांच्या जलवाहिन्या समांतर गेल्या आहेत. या तीनही यंत्रणांच्या जलवाहिन्यांचा एकत्रित नकाशा नसल्यामुळे कोणती जलवाहिनी कोणाची, यावरुन संभ्रम आहे. रस्त्यांची किंवा दुरुस्तीची कामे करताना जलवाहिनी फुटल्यानंतरच जलवाहिनी कोणाची हे लक्षात येते. आता भामा-आसखेड धरणातून पाणी आणले जाणार आहे. यासाठी चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. मुळे नव्याने जलवाहिन्या टाकताना तरी या यंत्रनांमध्ये समन्वयाची आवश्यकता आहे.
एमआयडीसीची १५० किमीची जलवाहिनी
पुणे हद्दीत औंध परिसर आणि चिंचवड, भोसरी परिसरात एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी पवना धरणातून ९० दशलक्ष लिटर उचलले जाते. यातील सुमारे ६० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा दररोज पिंपरी, चिंचवड, भोसरी औद्योगिक परिसरात केला जातो. तर महापालिकेस दररोज ३० दशलक्ष लिटर पाणी दिले जाते. यासाठी एमआयडीसीने चिंचवडमार्गे रावेत ते भोसरी, देहूरोड ते दापोडी आणि रावेत ते औंध मार्गावर सुमारे १५० किलोमीटर लांबीच्या मुख्य आणि वितरण जलवाहिन्या टाकल्या आहेत.
पुणे महापालिकेची १७ किलोमीटर जलवाहिनी
पुणे महापालिकेकडून रावेत बंधाऱ्यातून २७ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा केला जातो. ते पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन खराडी, वाघोली, लोहगाव परिसरात पाणीपुरवठा केला जातो. यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून रावेत ते चिखली आणि चिखली ते दिघीपर्यंत सुमारे १७ किलोमीटर मुख्य जलवाहिनी टाकली आहे.
जलवाहिन्या किलोमीटरमध्ये
आस्थापना - मुख्य जलवाहिनी - वितरण जलवाहिनी
पिंपरी चिंचवड महापालिका - २९९ - २,३६०
पुणे महापालिका - १७ - ०
एमआयडीसी - १५० - ०
पुणे महापालिका हद्दीत पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे २८ वर्षांपूर्वी जलवाहिनी टाकली आहे. पुणे महापालिकेची पिंपरी हद्दीतून जाणाऱ्या जलवाहिनी एअर व्हॉल्ववर आता क्रमांक टाकले जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात आमची जलवाहिनी लगेच लक्षात येईल.
- एकनाथ गाडेकर, कार्यकारी अभियंता, पुणे महापालिका
PNE25V70285
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.