

पिंपरी : एकाने चिकन विक्री करणाऱ्या दुकानदाराला मारहाण करून त्यांच्याकडील रोकड लुटली. तसेच परिसरात दहशत निर्माण करून दुकानातील अंडी पळवली. ही घटना काळेवाडीतील गुरुकृपा कॉलनी येथे घडली. या प्रकरणी रूपचंद समीर शेख (रा. गुरुकृपा कॉलनी, काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयुष आनंद वाकोडे (रा. थेरगाव) याला अटक केली आहे. फिर्यादी यांचे गुरुकृपा कॉलनीत चिकन विक्रीचे दुकान आहे. आरोपी त्यांच्या दुकानात आला. त्याने रूपचंद यांना मारहाण करीत कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादीच्या खिशातील दीड हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. दुकानातील पाचशे रुपयांची अंडी फोडून नुकसान केले. तसेच अडीचशे रुपयांची अंडी आरोपी घेऊन गेला.
कंपनीच्या गोपनीयतेचा भंग; कर्मचाऱ्यावर गुन्हा
पिंपरी : कंपनीने घालून दिलेल्या गोपनीयतेच्या अटी शर्तींचा भंग करून कंपनीचा डाटा चोरी करून फसवणूक केल्याप्रकरणी एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार बाणेर येथील एका कंपनीत घडला. अभिक अनंता घोष (रा. चेंबूर, मुंबई, मूळ- पश्चिम बंगाल) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी कंपनीच्या अधिकारी महिलेने बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी घोष हा किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या कंपनीत काम करत होता. कंपनीने त्याला अधिकृत ई-मेल आयडी दिला आहे. दरम्यान, त्याने कंपनीच्या डिझाइन्स आणि ड्रॉइंगचा डाटा चोरी केला. कंपनीच्या गोपनीयतेच्या अटी-शर्तींचा भंग करून फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
फसवणूकप्रकरणी डिलिव्हरी बॉयला अटक
पिंपरी : ऑनलाइनद्वारे वस्तू विकणाऱ्या एका कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्याने बनावट ऑर्डर देऊन ऑर्डर देण्यासाठी नेलेल्या वस्तूंच्या पाकिटामध्ये दुसऱ्या वस्तू ठेवून ते पार्सल पुन्हा कंपनीस पाठवून कंपनीची एक लाख २१ हजार १३२ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार पुनावळे येथे घडला. तुकेश बाबासाहेब राक्षे (रा. वक्रतुंड सोसायटी, आकुर्डी) असे अटक केलेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. याप्रकरणी कंपनीच्या एनफोर्समेंट ऑफिसरने रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हा या कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. त्याने बनावट कस्टमरच्या नावे स्वतः ऑर्डर बुक केली. त्या ऑर्डरमधील वस्तू डिलिव्हरीसाठी घेऊन जाऊन त्यामधील मूळ वस्तू काढून दुसऱ्या वेगळ्या वस्तू पार्सलच्या पाकिटमध्ये बंद केल्या. त्यानंतर ते पार्सल पुन्हा कंपनीत परत करून कंपनीची एक लाख २१ हजार १३२ रुपयांची फसवणूक केली.
तीन पिस्तूल, दोन तलवार जप्त
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांनी निगडी, बावधन आणि चिंचवड येथे केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवाईत तीन पिस्तूल, तीन काडतुसे आणि दोन तलवार जप्त केल्या आहेत. तसेच तिघांना अटक केली आहे. आकुर्डीतील खंडोबा मंदिरासमोरून गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने राज अशोक कांबळे (रा. खंडोबामाळ, आकुर्डी) याला अटक केली आहे. त्याच्याकडून २१ हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल व दोन तलवार जप्त केल्या.
दरम्यान, बावधनमधील जाधव वस्ती येथे बावधन पोलिसांनी केलेल्या कारवाईत आकाश नामदेव पवार (रा. जाधववस्ती, बावधन) याला अटक केली. त्याच्याकडून ५१ हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले.
तसेच, चिंचवड पोलिसांनी वाल्हेकरवाडी येथे केलेल्या कारवाईत हुसेन उर्फ पंजा रमजान बागवान (रा. ताथवडे) याला अटक केली. त्याच्याकडून ५४ हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि दोन काडतूस जप्त केली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.