गुन्हे वृत्त
पीएमपीएमएल बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) भरधाव बसने धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात वाकड येथील जगताप डेअरी पुलाखाली बुधवारी (ता. १९) रात्री पावणे बाराच्या सुमारास घडला.
अकीर हमीजुद्दीन शेख (वय २५) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचे मामेभाऊ छंन्नात अली शेख (रा. ताथवडे, मूळ- पश्चिम बंगाल) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी किशोर महादेव मोरे (रा. माण डेपो फेज-२, हिंजवडी) याला अटक केली आहे. अकीर शेख हे रस्त्याने जात असताना जगताप डेअरी पुलाखालील रस्त्याने भरधाव आलेल्या पीएमपीएमएलच्या बसने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
-------------------
टँकरला धडकून ट्रक चालकाचा मृत्यू
पिंपरी : महामार्गावर धोकादायकरीत्या उभ्या केलेल्या रसायनांच्या टँकरला पाठीमागून धडकल्याने ट्रक चालकाचा मृत्यू झाला. पुनावळे येथे गुरुवारी (ता. २०) पहाटे चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मेजो एम. एम. (वय ४२, रा. अम्ब्लुर, जि. त्रिशुल, केरळ) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा आतेभाऊ संतोष गोपी तोट्टापायी यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी याकूब अली दस्तगीर शेख (रा. बिमाईल, ता. गुलबर्गा, कर्नाटक) याला अटक केली. याकूबने त्याच्या ताब्यातील टँकर कोणतीही खबरदारी न घेता उभा केला होता.
---------------------------------
तरुणाला मारहाण; तिघांवर गुन्हा
पिंपरी : मावळ तालुक्यातील वारंगवाडी येथे एका तरुणाला दगड तसेच व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सौरभ अनिलकुंभार सिंग (रा. नायरा पीजी हॉस्टेल, वारंगवाडी, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मयूर लष्करे, शुभम शेडगे आणि त्यांच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल झाला. सौरभ पाणी घेऊन परत येत होते. त्यावेळी तिथे आलेल्या मयूरने त्यांच्या डोक्यात दगड मारला. इतर दोघांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
---------------------------------------------

