उत्पन्नाच्या दाखल्याला विलंब; म्हाडाचा अर्ज कसा भरायचा?
पिंपरी, ता. २२ : म्हाडाच्या सदनिकांसाठी अर्ज करण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक उत्पन्नाचा दाखला मिळण्यास उशीर होत आहे. कागदपत्रे न मिळाल्यास सदनिकांची संधी हुकेल, अशी भीती नागरिकांमध्ये आहे. पंधरा दिवस झाले तरी दाखले मिळत नाहीत. सातत्याने हेलपाटे मारावे लागत आहेत. संबंधित अधिकारी उपस्थित नसतात. त्यामुळे तक्रार नेमकी कोणाकडे करायची? असेही नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत.
पुणे म्हाडामधील सदनिकांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ आहे. अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज आणि ऑनलाइन रक्कम भरणे याच तारखेपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या उत्पन्नाचा आणि रहिवासी दाखला काढण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र, पिंपरी-चिंचवड अप्पर तहसिल कार्यालय येथील सेतू या ठिकाणी नागरिक गर्दी करत आहेत. दाखल्यांची संख्या वाढल्याने वाटप करण्यास उशीर होत आहे. अनेकांना १५ दिवस उलटूनही दाखले मिळालेले नाहीत. केवळ टोकन प्राप्त झाले आहे. मात्र, अंतिम मंजुरी मिळण्यास विलंब होत आहे.
दरम्यान, प्रत्येकवेळी नागरिकांना सेतू कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. मात्र, दाखला न मिळताच परतावे लागत आहे. नायब तहसीलदार यांच्यामार्फत उत्पन्न दाखल्याचे वाटप केले जाते. मात्र, त्यादेखील अनेकदा अनुपस्थित असतात, अशी तक्रार नागरिक करत आहेत. त्यामुळे म्हाडाच्या सदनिकांची अंतिम मुदत संपेपर्यंत दाखले मिळतील का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील स्थिती
- म्हाडाअंतर्गत एकूण प्रकल्प : १७
- एकूण सदनिका : ४१५
- येथे आहेत प्रकल्प : चऱ्होली, किवळे, वाकड, ताथवडे, चिखली, रावेत, मोशी, बोऱ्हाडेवाडी, पुनावळे, वडमुखवाडी
- किमती : १३ लाखांपासून ते २५ लाख
‘‘आमच्या नातेवाइकांना उत्पन्नाचा दाखला हवा आहे. मात्र, त्यांना दाखला मिळत नाही. उशीर का होत आहे याबाबत देखील व्यवस्थित सांगितले जात नाही. अधिकारी भेटत नसल्याने कोणाला विचारायचे हे कळत नाही. दाखला मिळाला नाही तर म्हाडासाठी अर्ज कसा करायचा.
- निर्मला पवार
‘‘नागरिकांना अर्ज केला की त्वरित दाखले हवे असतात. मात्र, काही त्रुटी असतील तर उशीर लागत आहे. अन्यथा पंधरा दिवसांच्या मुदतीत दाखले वाटप सुरळीत होत आहे. सध्या शंभर अर्ज रोज येत आहेत. सिस्टीमवर काही अडचण आलीच तर अडथळे येतात, अन्यथा नाही.
- मनिषा माने, नायब तहसीलदार
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

