कच्चा माल दरवाढीने उद्योग अडचणीत
पिंपरी, ता. २३ : कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि पुरवठा साखळीत अडथळ्यांचा पिंपरी चिंचवड औद्योगिक पट्ट्यातील सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) मोठा फटका सहन करावा लागत आहे. स्टील, प्लॅस्टिक, इलेक्ट्रॉनिक घटकांसह इतर कच्च्या साहित्यांचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च सरासरी ते २५ टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे छोट्या उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे उद्योजक सांगत आहेत.
उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात अनेक सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग सुरू आहेत. मधल्या काळात कच्च्या मालाचे दर स्थिर राहिल्यामुळे उत्पादन खर्च मर्यादित होता. त्यामुळे उत्पादित वस्तूंच्या विक्रीमागे पुरेसा नफा कमवणे सहज शक्य होत होते. पण, अलिकडे या किंमती सातत्याने वाढत आहेत. पिंपरी, चिंचवड, भोसरी, वाकड, नाशिक फाटा, निगडी, आकुर्डी या परिसरातील अनेक उद्योगांना आश्यक सामग्री वेळेत न मिळाल्याने ऑर्डर वेळेवर पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. वाढलेल्या खर्चामुळे उत्पादनांच्या दरात वाढ करावी, की नफा कमी करून बाजारात पाय रोवून उभे राहावे, याबाबत या उद्योजकांनत संभ्रम निर्माण झाला आहे. मोठ्या उद्योगांच्या तुलनेत भांडवली क्षमता कमी असल्याने त्यांना आर्थिक ताण जाणवू लागला आहे.
या पार्श्वभूमीवर व्याजदर सवलत, कच्चामाल खरेदीसाठी विशेष धोरण आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी शहरातील उद्योग संघटनांनी राज्य सरकारकडे केली आहे. वेळेत मदत मिळाली नाही, तर या उद्योगांवर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जागतिकीकरणामुळे औद्योगिक क्षेत्रात टिकण्यासाठी स्पर्धा करावी लागत आहे. ऑनलाइन ऑर्डर घेण्याचे प्रमाण वाढल्यामुळे प्रत्यक्ष ऑर्डर घेण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. वाढलेले प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर, नित्यनियमाने होणारे भारनियमन आणि कच्च्या मालाचे वाढलेले दर यामुळे उत्पादन खर्च लक्षणीय वाढला आहे. यामुळे उद्योग टिकवणे फार कठीण झाले आहे.
- नंदकिशोर जगदाळे, उद्योजक
औद्योगिक स्पर्धेत टिकण्यासाठी उद्योग चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ ही केवळ घोषणा असून प्रत्यक्षात शासनाच्या योजना उद्योजकांपर्यंत पोहोचत नाहीत. यावर केंद्र व राज्य सरकारने आणि स्थानिक स्वराज्य संस्थेने योग्य ती उपाययोजना करावी, अन्यथा उद्योग स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
- गोविंद पानसरे, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवड
केंद्र सरकारच्या काही योजना
- उद्योगांना स्टिल, अॅल्युमिनियम, पॉलिमर, रसायने, कागद आदी कच्चा माल क्रेडिटवर देणे
- ९० दिवसांपर्यंत क्रेडिट सुविधा देणे
- कच्चा माल खरेदीसाठी देयक अडकल्यास ते लवकर मिळावे, यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म देणे
- बँकांकडून बिलावर सवलत सुविधा देणे
- कच्चा माल खरेदीसंबंधित विविध सबसिडी, कर्ज सुलभता, व्याज सवलत लाभ देणे
- आवश्यक भांडवल कर्जरूपाने उपलब्ध देणे
- कच्चामाल किंवा प्रक्रिया साहित्य सरकारी विभागांना पुरवताना पारदर्शक खरेदी प्रक्रिया राबविणे
राज्याच्या काही योजना
- कच्चा माल खरेदी केंद्रे स्थापन करणे.
- स्टील, प्लॅस्टिक, इलेक्ट्रॉनिक्स घटक आणि औद्योगिक साहित्य कमी भावात उपलब्ध करणे.
- औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कच्चा माल पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी सुविधा देणे
- लॉजिस्टिक, गोदाम, साठवणूक सुविधा देणे
- कच्चा माल खरेदीसाठी भांडवल कर्ज उपलब्ध करुन देणे
- अनुदान २५ ते ३५ टक्क्यांपर्यंत देणे
- उद्योगांसाठी कच्चा माल, परवाने, पुरवठा, उपययोजन यांसाठी एक खिडकी योजनेचा लाभ देणे
- कच्चा माल खरेदीसाठी मुदत कर्ज (टर्म लोन) आणि वर्किंग कॅपिटल लोन (व्यवसायाच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी घेतलेले अल्प मुदतीचे कर्ज) देणे
- व्याजदर सवलत आणि कर्ज मंजुरी जलद करणे
PNE25V70288
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

