औद्योगिकनगरीकडून क्रीडा नगरीकडे वाटचाल
वर्धापनदिन पुरवणी ः क्रीडा लेख
---
औद्योगिकनगरीकडून
क्रीडानगरीकडे वाटचाल
जुन्या खेळाडूंनी त्यांच्या काळी मार्गदर्शक, प्रशिक्षक, सुख-सोयी, सवलती नसताना सुद्धा आवड म्हणून खेळ जपला. त्याचा पुढील पिढीला फायदा झाला. आज भारत्तोलन म्हणजे वेटलिफ्टिंग, शरीरसौष्ठव, गिर्यारोहण, नौकानयन, किकबॉक्सिंग, सायकलिंग, क्रिकेट सारख्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन राष्ट्रीय पातळीवर जाण्याची तरुणांची धडपड कौतुकास्पद आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर चमकत आहेत. त्यांच्यासाठी कष्ट घेणाऱ्या क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा संस्था-संघटना, महापालिकेचे हे यश आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड औद्योगिकनगरी आता क्रीडानगरी म्हणूनही नावाजली जाईल, यात शंका नाही.
- प्रदीप वाघ, चिंचवड
सा धारणपणे ५०-६० वर्षांपूर्वी आमच्या चिंचवडला ग्रामपंचायत होती. आजूबाजूला पवनेच्या पाण्यावर डोलणारी हिरवीगार शेती. गावाजवळच एल्प्रो, एसकेएफ, टेल्कोची फाउंड्री, गरवारे कंपनी, त्याच्या बाजूला एचए, उत्तरेला रस्टन ग्रीव्हज व बजाज, फोर्स मोटर्स या कंपन्या. थोड्या दूरवर खडकीला ॲम्युनिशन फॅक्टरी. या सर्व कारखान्यांमधील कामगार वर्ग, पुण्यात नोकरी करणारे सरकारी कर्मचारीही आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, भोसरी येथे गावात असलेल्या चाळींमधून राहायचे. रोज आठ ते दहा तास काम करून सांयकाळी घरी आल्यावर मनोरंजनासाठी गावात असलेल्या मैदानावर व्हॉलिबॉल, कबड्डी, खो-खो, कुस्तीसारखे खेळ सुरू होत. तसे कुस्ती खेळ पिंपरी चिंचवड, भोसरी वगैरे गावांमध्ये पहिल्यापासूनच लोकप्रिय होताच; त्यात आणखीन वाढ झाली. या सर्व परिसरामध्ये अजूनही तालमी आहेत. गेली ७०-७५ वर्षे या तालमीतून मल्लांना, पैलवानांना मार्गदर्शन करणाऱ्या वस्तादांनी राज्य, राष्ट्रीय स्तरावर मैदान गाजविणारे, राज्य-राष्ट्रीय पातळीवर मोठा मानाचा किताब मिळविणारे अनेक मल्ल घडविले. अजूनही घडवत आहेत. सकाळी चिंचवडगावात मोरया गणपती शेजारी असलेल्या पवनेवर गेले की लाल मातीने माखलेला पैलवान गडी नदीत सूर मारताना दिसत. गोटीबंद पिळदार शरीराची ती पैलवान मंडळी पाहिली की आपणही तशी शरीरयष्टी कमवावी असे वाटे.
विदेशी खेळांचे युग
महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या तरुणांमुळे १९७० पासून अनेक विदेशी खेळ कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिंटन, रिंग टेनिस, बॉक्सिंग, क्रिकेट, जुडो, कराटे वगैरे खेळाने चंचू प्रवेश केला. कालांतराने पिंपरी चिंचवडमध्ये व आजूबाजूच्या परिसरात कारखानदारी वाढू लागली. ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपालिका व नंतर महापालिकेत झाले. औद्योगिकीकरणामुळे वस्ती व लोकसंख्या वाढू लागली. त्यांचे रूपांतर औद्योगिकनगरीमध्ये होऊ लागले. पिंपरी, चिंचवड, रहाटणी, सांगवी, वाकड, भोसरी, पिंपळे निलख, मोशी, तळवडे, निगडी, आळंदी, चिखली, देहू, हिंजवडी, कासारवाडी या गावांतील अंतर संपून एक मोठे शहर बनण्यास सुरुवात झाली आणि पिंपरी चिंचवडची औद्योगिकनगरीकडे वाटचाल सुरू झाली. पिंपरी चिंचवडबरोबर चाकण, तळेगाव या भागांतही मोठमोठे कारखाने उभे राहू लागले. तेथे कामाची संधी उपलब्ध होताच देशातील विविध भागांतील नागरिक इथे वास्तव्यास आले. त्यांनाही नोकरीशिवाय क्रीडा क्षेत्राची गरज वाटू लागली.
क्रीडा सुविधांचा विकास
पिंपरी चिंचवडमध्ये आज औद्योगिक क्षेत्राबरोबर आयटी क्षेत्र वाढले आहे. तेथील कर्मचारी वर्ग लाखाच्यावर आहे; त्यातील ७० टक्के कर्मचारी पिंपरी चिंचवड परिसरात राहतात. त्यांनाही आपले छंद जोपासण्यासाठी, नित्य व्यायामासाठी, खेळांच्या मैदानांची इन डोअर कोर्टची गरज आहे. ही गरज पूर्ण होण्यासाठीच येथील अनेक जुन्या खेळाडूंनी, क्रीडा प्रेमी, क्रीडा रसिकांनी येथे विविध खेळांसाठी चिखली, रावेत, हिंजवडी, देहू, भोसरी वगैरे परिसरामध्ये क्रीडांगणे विकसित केलेली आहेत. पूर्वी आम्हास कोणताही खेळ किंवा खेळाच्या निवड स्पर्धेत भाग घ्यायचा असेल; तर पुण्यात जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. रोज कंपनीत शिफ्टमध्ये आठ ते दहा तास काम करून पुण्यात जाऊन सराव करून येणे मोठ्या जिकिरीचे व खर्चाचे काम होते. पण, खेळाच्या प्रेमापाई आम्ही तेही करत होतो. पिंपरी चिंचवडमध्ये जवळजवळ ४० ते ५० क्रिकेट ॲकॅडमी सुरू
आहेत; यातून अनेक गुणवान खेळाडू पुढे येताना दिसतात. पिंपरी चिंचवड परिसरात जवळजवळ २० ते २५ क्रिकेटची हिरवीगार क्रीडांगणे आहेत. तेथे वर्षभर शालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटांसाठी स्पर्धा चालू असतात. पुण्यातील अनेक मोठ्या स्पर्धांची ठिकाणे आता पिंपरी चिंचवडमध्येच आहेत. क्रिकेटच्या मैदानाबरोबर बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिसची मोठी कोर्ट (इनडोअर) आता येथे बांधण्यात आलेली आहेत. क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बॉक्सिंग, शरीरसौष्ठव, ज्युडो, कराटे, रोलबॉल, स्केटिंग याचबरोबर फुटबॉल, बास्केटबॉल, कॅरम, हॉकी, बुद्धिबळ, कबड्डी, खो-खो व कॅरम या खेळांसाठी प्रशिक्षण वर्ग येथील उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात चालवले जातात; त्यास इच्छुक खेळाडूंचा मोठा प्रतिसाद लाभतो. कबड्डी, खो-खो, कुस्ती, कॅरम स्पर्धांसाठी ही मोठी पारितोषिके असतात. त्यास मोठा प्रतिसाद मिळतो असे दिसून येते.
पालकांकडून प्रोत्साहन
खेळाची आवड असलेल्या मुलामुलींना आपल्या आवडीप्रमाणे खेळाची निवड करून आपला छंद जोपासता येत आहे. खेळाप्रमाणे त्यांच्या त्या खेळातील तज्ज्ञ प्रशिक्षक त्यांना मिळतात. आज येथील पालक वर्ग आपल्या मुलांनी किंवा मुलींनी उत्तम खेळाडू बनावे, त्यांचे मन शरीर कणखर व्हावे यासाठी नित्यनियमाने त्यांना प्रशिक्षण शिबिरात नेतात व परत आणतात. त्यांच्या स्पर्धेच्या वेळी उपस्थित राहतात. त्यांना प्रोत्साहित करतात. मुलांच्या खेळातील दोष कमी कसे होतील, याविषयी प्रशिक्षकांशी चर्चा करतात. मागील १० ते १५ वर्षांत आपण थोडे डोकावून पाहिले, तर आपल्याला असे दिसून येते की दरवर्षी किमान दहा खेळांमध्ये तरी पिंपरी चिंचवडमधील किमान खेळाडू राज्य, राष्ट्रीय पातळीवर खेळलेले दिसतात.
क्रीडा धोरणाने चालना
पिंपरी चिंचवड परिसरात क्रीडाक्षेत्र, क्रीडा प्रेम वाढविण्यास पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्वतःचे उत्तमरीत्या आखलेले क्रीडा धोरण व त्यांनी ते राबविण्यासाठी घेतलेले कष्ट कारणीभूत आहेत. गेली अनेक वर्षे महापालिका विविध माध्यमांतून क्रीडा संघटनांना आर्थिक, क्रीडा साहित्य, क्रीडांगणासाठी मदत करते. बॅडमिंटन, जिम यांचे हॉल बांधून त्यांनी व्यायामपटूंचीही सोय केली आहे. याचा फायदा अनेक संघटनांना झाला असून, त्याद्वारे अनेक खेळाडू आज राष्ट्रीय राज्यस्तरीय पातळीवर पोहोचले आहेत. महापालिकेनेही अनेक वॉर्डांमध्ये जलतरण तलाव बांधून नागरिकांची मोठी सोय केलेली आहे. क्रीडा संस्थांना देणगी देऊन त्यांची योग्य उभारणी करून त्यांच्याकडून योग्य कामगिरी करून घेणे, वेगवेगळ्या वयोगटांतील शालेय मुला-मुलींसाठी विविध खेळाच्या स्पर्धा प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे वगैरे माध्यमातून त्यांनी गुणवत्तेचा शोध घेतला व त्यांना आपला खेळ उंचावण्याची संधी दिली. त्यांच्यामुळेच अनेक क्रीडा संघटना- संस्थांना आधार मिळाला. त्या क्रीडा संस्था अजूनही क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.
कंपन्यांचेही योगदान
गेली ४० ते ५० वर्षे येथील अनेक लहान मोठ्या कंपन्यांनी कंपन्यांमध्ये क्रीडा अधिकारी नेमून तसेच कामगारांना क्रीडा साहित्य पुरवून वेगवेगळ्या स्पर्धांमधून खेळण्यास संधी मिळवून दिली. टाटा मोटर्स, बजाज ऑटो यांनी तर स्वतःची क्रीडांगणे निर्माण केली. तेथे अनेक सुविधा पुरवल्या. आज त्यांची क्रीडांगणे पुण्यातील उत्तम क्रीडांगणे म्हणून नावाजली जातात. क्रिकेट शिवाय फुटबॉल, बास्केटबॉल, ॲथलेटिक्स, वेटलिफ्टिंग या खेळांसाठीही त्यांनी संकुले उभी केली. त्यावर राष्ट्रीय स्पर्धाही भरविणे शक्य आहे. त्याचा फायदा त्या कंपन्यांतील कामगारांना व कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो. चिखली, हिंजवडी, पुसाणे, कासारसाई, देहू, रावेत वगैरे ठिकाणची मैदाने तर सकाळ-संध्याकाळ बाळगोपाळांनी भरून गेलेली असतात. उत्कृष्ट खेळ कसा शिकायचा याचे शिक्षण ते प्रशिक्षकाकडून मन लावून घेतात. त्यांना तेथे पाहताना मनाला अतिशय आनंद होतो. सांगवीच्या पीडब्ल्यूडीच्या मैदानावर शेकडो खेळाडू रोज सकाळ-संध्याकाळ सराव करताना दिसतात, असे चित्र नेहमी पाहण्यास मिळते.
खेळाचा दर्जा उंचाविण्याकडे लक्ष
सध्या सांगवी-दापोडीपासून ते रावेतपर्यंत, हिंजवडी ते कासारसाई ते भोसरी, दिघीपर्यंत अनेक ठिकाणी बंदिस्त (क्लोज्ड नेट) सरावाची सोय झालेली आहे. तेथे सकाळ संध्याकाळ क्रिकेट, बास्केटबॉल, व्हॉलिबॉलचा सराव करताना तरुण मंडळी दिसतात. ही एक जमेची गोष्ट आहे. यात दहा वर्षांपासून ते तरुण प्रौढांपर्यंतच्या खेळाडूंचा तसेच पुरुष व महिला खेळाडूंचा समावेश असतो. अनेक मोठ्या टाऊनशिपमधूनही ‘क्लोज्ड नेट’ बनविण्यात आले आहेत. छोट्या जलतरणपटूंसाठी छोटे जलतरण तलावही आहेत. जेणेकरून मुलेमुली, स्त्री-पुरुष दोघांनाही त्याचा लाभ घेता येईल. पिंपरी चिंचवड परिसरापासून बालेवाडी व गहुंजे स्टेडियमही जवळच आहेत. या दोन्ही क्रीडानगरींचा उपयोग येथील नागरिकांना घेता येतो. अत्याधुनिक सुविधांचा लाभ घेऊन आपल्या खेळाचा दर्जा उंचावता येतो, हा त्याचा एक मोठा फायदा आहे. त्याचबरोबर तेथे होणारे सामने व स्पर्धा पाहून आपणास ही स्पर्धा खेळण्यासाठी आपल्या खेळाचा दर्जा उंचावणे गरजेचे आहे, हे त्यांना त्यांच्या मनात रुजते ही एक चांगली बाब आहे.
क्रीडा संघटनांची स्थापना
रोलबॉल, स्केटिंग, बुद्धिबळ, कॅरम यांच्याही असोसिएशन येथे स्थापन झाल्या असून, त्याद्वारे प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात. गेली अनेक वर्षे राज्य, राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा धोरणामुळे येथील शाळांनी ही विविध खेळांना उत्तेजन देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी खास प्रशिक्षकांची ही नेमणूक त्यांनी केली आहे. त्याचा परिपाक म्हणून आज शालेय स्पर्धांमधून मुले-मुली जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्वल करताना दिसून येत आहेत. पुरुष खेळाडूंच्या बरोबरीने महिला खेळाडूही जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर चमकताना दिसतात. मागील काही वर्षांत मुलींनी क्रिकेट, बॉक्सिंग, तिरंदाजी, ॲथलेटिक्स, ज्युडो, कराटे, गिर्यारोहण, नौकानयन, किकबॉक्सिंग, सायकलिंग वगैरे खेळात राष्ट्रीय संघात स्थान मिळवले आहे. हे यश त्यांच्याबरोबर त्यांच्या प्रशिक्षकांचे देखील आहे, हेही आपणास मान्य करावे लागते.
क्रीडा प्रसाराचा मार्ग
पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील कामगार व कर्मचारी यांच्यासाठी औद्योगिक क्रीडा संघटना गेली ६० वर्षे काम करून कामगार व कर्मचाऱ्यांना, त्यांच्यातील क्रीडा गुणांना वाव मिळवून देण्याची, क्रीडा क्षेत्र गाजवण्याची संधी मिळवून देत आहे. औद्योगिक क्रीडा संघटना, इतर अनेक क्रीडा संस्था, खासगी क्लब व क्रीडा कार्यकर्ते येथील क्रीडा क्षेत्रात मन लावून कार्य करत आहेत. खेळाडूंना घडवत आहेत. त्यांच्या भवितव्यासाठी धडपडत आहेत. जेणेकरून पिंपरी चिंचवड औद्योगिकनगरीचे नाव आता क्रीडानगरी म्हणून क्रीडा जगताच्या नकाशावर चमकू लागेल. पिंपरी चिंचवड परिसराचे नाव उज्ज्वल होईल, यात मुळीच शंका नाही. याचबरोबर विविध खेळांचे प्रौढांचे संघ सुद्धा देशांतर्गत व देशाबाहेर दौरे करून एका वेगळ्या संकल्पनेचा प्रसार करत आहेत. लहान मुले-मुली व तरुणांचे संघ परदेश दौरा करून तेथील खेळपट्टी व क्रीडांगणाचा अनुभव घेत आहेत. या दौऱ्याद्वारे त्यांना त्यांच्या खेळाचा दर्जा उंचावण्याची ही मोठी संधी मिळते. आम्हा जुन्या खेळाडूंना असे वाटते की येथील वेगवेगळ्या खेळांतील अनुभवाचा उपयोग महापालिका, क्लब, लायन्स, रोटरी क्लबने सुद्धा करून घ्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

