बीआरटी बसथांब्यांना कचऱ्याचा विळखा

बीआरटी बसथांब्यांना कचऱ्याचा विळखा

Published on

पिंपरी, ता. २३ : शहरातील बीआरटी बस थांबे आणि प्रवेशद्वारावर ठेवलेल्या कचराकुंड्यांचा वापर शेजारील चायनीज स्टॉल्स, विक्रेते आणि पथारीवाले बेधडकपणे गैरवापर करतात. त्यांच्याकडून उरलेल्या खाद्यपदार्थांसह इतर ओला कचरा टाकला जातो. त्यामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर सुरु झाला आहे.
त्यातच पालिकेच्या दुर्लक्षामुळे कचरा नियमित उचलला जात नसल्यामुळे परिसरात घाण पसरली आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. भटकी कुत्री बीआरटी मार्गात येऊन पीएमपी बस तसेच बेकायदेशीरपणे घुसणाऱ्या खासगी वाहनांचा अपघात होण्याचाही धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने शहरातील नागरिकांना गतिमान प्रवास करता यावा म्हणून दापोडी-निगडी, सांगवी-रावेत, दिघी-चऱ्होली आणि काळेवाडी फाटा ते दहू-आळंदी या चार मार्गांवर बीआरटी कॉरिडॉर निर्माण केला आहे. दर दहा मिनिटांनी पीएमपी बस धावण्याचे वेळापत्रक आहे. या मार्गांमुळे प्रवाशांची सोय झाली असली तरी इतर समस्या निर्माण झाल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे बीआरटी मार्गातील अस्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर झाला असून संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडून स्वच्छता मोहीम सातत्याने राबविली जात नाही, असे नागरिकांचे आरोप आहेत. परिणामी प्रवाशांना घाणीत बसची वाट पाहावी लागते.
---------

थांब्यावर मद्यपींचा उपद्रव
रात्री अपरात्री बीआरीटी बस थांब्यावर अनेक मद्यपी येतात. ते मद्य, पाण्या बाटल्या, तसेच चकण्याची पाकिटे तेथेच टाकतात. त्यामुळे प्रामुख्याने महिला प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------

बीआरटी बस मार्गातील बसथांबे

बीआरटी मार्ग / बसथांबे
निगडी ते दापोडी / १८
सांगवी ते रावेत / १७
काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता / १५
----------

सकाळी घंटागाडी उशिरा येत असल्यामुळे कामावर जाताना महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना कचरा टाकण्याची सोय व्हावी यासाठी महापालिकेने बीआरटी बस थांब्यात कचराकुंड्यांची सोय केली आहे. त्याचा गैरवापर केला जात आहे. प्रवाशांकडून कमी आणि परिसरातील खाद्यपदार्थांचे हॉटेल्स, स्टॉल्सधारक मध्यरात्री ओला कचरा आणून टाकतात. त्याचा आम्हाला रोज त्रास सहन करावा लागतो.
- किरण साळवे, प्रवासी
-----------

बीआरटी बस थांब्याबाहेरील आणि थांब्यातील दोन्ही कचराकुंड्या सकाळी भरलेल्या असतात. कुत्री कचरा उचकटतात. त्यामुळे कचरा पसरतो. सकाळी साडेसात वाजता बससाठी आल्यानंतर मद्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची पाकिटे पडलेली असतात. सफाई कामगार कोणी येत नसल्यामुळे कचरा दिवसभर पडून राहतो.
- निर्मला पांचाळ, प्रवासी

----------

पिंपरी चिंचवड हे कचराकुंडीमुक्त शहर आहे. बीआरटी बस थांबा परिसरातील कचराकुंड्या प्रवाशांसाठी आहेत. इतर लोकांकडून त्याचा उपयोग होत असेल तर ते चुकीचे आहे. त्यांचा शोध घेऊन संबंधित खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. याशिवाय त्यांच्यावर फौजदारी गुन्हेही दाखल केले जातील.
- प्रदीप ठेंगल, उपायुक्त, आरोग्य विभाग, महापालिका
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com