प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून 
आरएमसी प्लॅंटची पडताळणी

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आरएमसी प्लॅंटची पडताळणी

Published on

पिंपरी, ता. २४ ः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या नियमावलीचे पालन आरएमसी प्लॅंटकडून केले जात आहे का, याबाबतची पडताळणी करण्यासाठी जिल्ह्याभरातील जवळपास २५० प्लॅंटची तपासणी मंडळाकडून केली जात आहे. नवीन नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याचा आदेश आरएमसी प्लॅंटचालकांना देण्यात आला आहे.
आरएमसी प्लॅंटमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ऑक्टोबर महिन्यात नवीन नियमावली लागू केली होती. यामध्ये आरएमसी प्लॅंट पूर्णपणे अच्छादित असावेत, नवीन व जुन्या आरएमसी प्लॅंटनी बॅंकेची हमी सादर करावी, बांधकाम प्रकल्पाच्या आत उभारण्यात आलेले आरएमसी प्लॅंट प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाल्यावर १ महिन्याच्या बंद करण्यात यावेत, अशा अटी या नियमावलीत नव्याने समाविष्ट करण्यात आल्या होत्या. गेल्या महिन्यात या नियमांचे परिपत्रक काढण्यात आले होते. या नियमांचे पालन महिनाभरातच करावे असेही या परिपत्रकात सांगण्यात आले होते.
नवीन नियमावलीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील आरएमसी प्लॅंटधारकांची गेल्या आठवड्यात बैठक घेतली होती. यात नवीन नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नवीन आरएमसी प्लॅंटला परवानगी बॅंक हमी सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तर याआधी परवानगी दिलेल्या आरएमसी प्लॅंटनेही लवकर बॅंक हमी सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वारंवार सूचना देऊनही या नियमावलीचे पालन न झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


गेल्या आठवड्यातच पुणे जिल्ह्यातील आरएमसी प्लॅंट चालकांसोबत आमची बैठक झाली. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातील प्लॅंटचालक आले होते. त्यांना आम्ही नवीन नियमावलीचे पालक करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. सध्या जिल्ह्यातील २५० प्लॅंटचे सर्वेक्षण करत आहोत. नियमांचे पालन न करणाऱ्या प्लॅंटवर कारवाई करण्यात येणार आहे.
-बाबासाहेब कुकडे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे

Marathi News Esakal
www.esakal.com