आमची सोसायटी, आमचा उपक्रम - महिंद्रा सेंट्रालीस, पिंपरी

आमची सोसायटी, आमचा उपक्रम - महिंद्रा सेंट्रालीस, पिंपरी

Published on

आमची सोसायटी, आमचा उपक्रम
महिंद्रा सेंट्रालीस, पिंपरी

मच्छिंद्र कदम ः सकाळ वृत्तसेवा
चिंचवड, ता.१३ ः पुणे - मुंबई जुन्या महामार्गालगत पिंपरी मेट्रो स्थानक व पीसीएमसी प्रशासकीय इमारतीच्या शेजारी शहराच्या मध्यवर्ती व मोक्याच्या ठिकाणी वसलेली महिंद्रा सेंट्रालीस सोसायटी ‍खऱ्या अर्थाने ‘द हर्ट ऑफ पिंपरी’ ठरत आहे. परंपरा, संस्कृती, एकोपा आणि बंधुभाव या मूल्यांना जपत सोसायटीतील रहिवासी समाज जीवन अधिक समृद्ध करत आहेत.
हिरवळ व वृक्षांच्या सानिध्यात चोहोबाजूंनी चार एकरांवर विस्तीर्ण जागेमध्ये महिंद्रा सेंट्रालीस सोसायटी वसलेली आहे. रहिवाशांसाठी ती आधुनिकता व निसर्गाचा संगम ठरत आहे. या सोसायटीत सुमारे ४०० कुटुंबे व जवळपास २ हजार रहिवासी गुण्यागोविंदाने नांदत आहेत. ज्येष्ठांना सोसायटीमध्ये विशेष आदर, सन्मान दिला जातो.
त्यांचा स्वतंत्र संघ कार्यरत असून वेळोवेळी विरंगुळ्याचे कार्यक्रम सोसायटीत आयोजित केले जातात.

आरोग्य, खेळांसाठी सुविधा
लहान मुलांसाठी खेळणी, प्रस्तरारोहण, टेबल टेनिस, क्रिकेट, टेनिस कोर्ट, बहुद्देशीय सभागृह, अद्ययावत जलतरण तलाव उपलब्ध आहेत. फिटनेससाठी एसी जिम, योगा केंद्र व प्रशिक्षक यामुळे रहिवासी दैनंदिन फिटनेस राखत असतात. प्रत्येक सदनिकेत स्वतंत्र आरक्षित वाहनतळाची व्यवस्था असून व्हिझिटर पार्किंगची सोय देखील करण्यात आली आहे. उन्हाळ्यात मुलांसाठी जलतरण प्रशिक्षण, योगा, कराटे, संस्कार वर्ग असे उपक्रम आयोजित केले जातात.

आठवडे बाजाराची सोय
रहिवाशांच्या सोयीकरिता इलेक्ट्रिकल वाहने चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात आलेली आहे. भविष्यात सामाईक जागे करिता आवश्यक विजेसाठी सौर उर्जा निर्मितीचा प्रकल्प उभारणे व ग्रीन मीटर योजना राबविण्याचा व्यवस्थापन समितीचा मानस आहे. ताजी फळे व भाजीपाला उपलब्ध व्हावा म्हणून आठवडे बाजाराचा उपक्रम दर सोमवारी सोसायटी आवारात राबविण्यात येतो.

पर्यावरणपूरक उपक्रम
सोसायटीत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘एसटीपी’ असून त्यातून तयार झालेले पाणी उद्यान व झाडांना वापरले जाते. सोसायटीमध्ये ओला-सुका कचरा वेगळा करून कंपोस्टिंग युनिटमध्ये प्रक्रिया करून खत निर्मिती केली जाते. त्याचा वापर उद्यानातील वृक्ष संवर्धनासाठी होतो. पोडियमवर जॉगिंग ट्रॅक व टेरेस गार्डन आहे. सांडपाणी पुनर्वापर व ओला कचरा व्यवस्थापन केले जात असल्याने महापालिकेकडून सर्व सदस्यांना मिळकत करात सवलत मिळते.

एकतेची भावना
प्रशस्त एसी क्लब हाऊस असून त्याचा वापर सोसायटीतील संस्कृतिक कार्यक्रम, बैठक इ. करिता केला जातो. सर्व ज्येष्ठ नागरिक महिना अखेरीला वाढदिवस व उपक्रम साजरे करतात. प्रतिवर्षी उत्साहात व आनंदात गणेशोत्सव, दहीहंडी, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, होळी, धूलिवंदन, शिवजयंती, आषाढी वारी, कोजागरी पौर्णिमा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद, नाताळ इत्यादी विविध धर्मांचे सण साजरे केले जातात. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांकरिता क्रीडा स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात येते.

उत्कृष्ट सुरक्षा व्यवस्थापन
सोसायटी आवारात २४ तास सुरक्षा रक्षक तैनात असतात. सोसायटी सदस्यांसाठी आरएफआयडीद्वारे स्वयंचलित बॅरिकेड्‍सद्वारे व इतरांसाठी सोसायटी सर्टिफाइड ॲपद्वारे परवानगी दिल्यानंतरच प्रवेश दिला जातो. तसेच दोन्ही प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही प्रणाली कार्यान्वित आहे. प्रत्येक सदनिकेत स्वतंत्र बंदिस्त वाहिनीद्वारे घरगुती वापराकरिता गॅस पुरवठा केला जातो. आपत्कालीन स्थिती करिता अद्ययावत अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित असून रहिवाशांसाठी वेळोवेळी प्रशिक्षणाची सोय करण्यात येते. दैनंदिन कारभारासाठी प्रशिक्षित व्यवस्थापक व तांत्रिक कर्मचारी कायम कार्यरत असतात.

महिंद्रा सेंट्रालीस सोसायटीमध्ये ४०० कुटुंबे एकत्रित गुण्यागोविंदाने राहत असल्याने खऱ्या अर्थाने सोसायटी ही आमच्यासाठी एक परिवारच आहे.
- राजेंद्र साळुंखे, अध्यक्ष, महिंद्रा सेंट्रालीस, पिंपरी

चांगल्या प्रतीच्या दर्जेदार सोई सुविधा देऊन सुरक्षित पोषक वातावरण सोसायटीतील सभासदांना देण्याकरिता व्यवस्थापन समिती नेहमीच कटिबद्ध आहे.
- सचिन सानप, उपाध्यक्ष

सोसायटीतील दैनंदिन व्यवस्थापनाकरिता स्वतंत्र, उच्चशिक्षित अनुभवी व्यवस्थापकाची नेमणूक केलेली आहे. तसेच एसटीपी पंपिंग स्टेशन, जलतरण तलाव, जिम व इतर व्यवस्थापनाकरिता स्वतंत्र प्रशिक्षित व तांत्रिक मनुष्यबळ असलेल्या यंत्रणा कार्यरत आहेत.
- अक्षय जाधव, सचिव

संस्थेचा दैनंदिन कारभार अत्यंत पारदर्शकपणे होण्याकरिता ‘एसओपी’ प्रमाणे सर्व प्रक्रिया राबवून वेंडरची नेमणूक केली जाते. राष्ट्रीयकृत बँकेतून डिजिटल पेमेंट व चेकद्वारे सर्व व्यवहार केले जातात. लेखा परीक्षणासंदर्भात नवनिर्वाचित व्यवस्थापन समितीकडून सातत्याने पाठपुरावा केला जात असतो.
- नागेश गाडे, कोषाध्यक्ष

CWD25A01872, CWD25A01873, CWD25A01874

Marathi News Esakal
www.esakal.com