एखाद्याचा राग आलाय ? पण, थोडा संयम ठेवा...

एखाद्याचा राग आलाय ? पण, थोडा संयम ठेवा...

Published on

पिंपरी, ता. १३ : समोरच्या व्यक्तीचा कितीही राग आला, कितीही गंभीर कारण असले तरी त्या व्यक्तीचा जीव घेणे हा त्यावर पर्याय नाही. मात्र, क्षणिक राग तसेच किरकोळ कारणांसह जुने भांडण अशा कारणांवरून एखाद्याचा जीव घेण्याच्या घटना घडत आहेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत चालू वर्षात आतापर्यंत घडलेल्या ४६ घटनांपैकी निम्म्यापेक्षा अधिक घटना क्षुल्लक व क्षणिक रागातून घडल्या आहेत.

अविचाराने कुटुंब उद्ध्वस्त
एखादा व्यक्ती राग व खुन्नसमध्ये नको ते पाऊल उचलतो. मात्र, आपण काय करतोय याचे भान त्याला नसते. त्यातूनच गंभीर घटना घडते. क्षणिक राग, तरुणांमधील भांडणे, टोळीचे वर्चस्व, पैशांचा व्यवहार, चारित्र्यावरील संशय, प्रेम प्रकरण या कारणांवरून खून होण्याचे प्रमाण अधिक आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत मागील काही दिवसांत अशा घटना घडल्या आहेत. रागातून, खुन्नसमधून जीव घेतल्याचे आरोपीला समाधान वाटत असले तरी आपल्या कृत्यामुळे संबंधित व्यक्तीचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते.

मागील महिन्यातील काही घटना
१९ ऑगस्ट
तळवडेत हॉटेलचे बिल देण्याच्या कारणावरून वाद, तरुणाचा खून
२० ऑगस्ट
मोशी येथे दारू विकत आणण्यावरुन वादात, तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार
२५ ऑगस्ट
डुडुळगाव येथे चोरीच्या संशयातून एका सतरा वर्षीय युवकाचा खून
२९ ऑगस्ट
नातेवाईक तरुणीशी प्रेम संबंधाचा संशय, पिंपळे गुरव येथे तरुणाचा दोरीने गळा आवळून खून

प्रमुख कारणे
- रागावर नियंत्रण न ठेवणे
- संवादाऐवजी हिंसाचाराचा अवलंब
- दारू, व्यसनाधीनता, समाजातील ताणतणाव
- अहंकार, मीच बरोबर हा दुराग्रह
- भावनिक परिपक्वतेचा अभाव
- सोशल मीडियावरील हिंसक दृश्ये पाहून आक्रमकतेला प्रोत्साहन
- सहनशीलता आणि संयम कमी असणे


परिणाम काय ?
- कुटुंब उद्ध्वस्त होणे
- समाजात भीतीचे वातावरण
- मुलांवर मानसिक आघात
- कायदेशीर प्रक्रियेला तोंड, शिक्षेला सामोरे जाणे
- समाजातील सौहार्द आणि विश्वास कमी होणे
- अपराधी भावना, पश्चात्ताप, नैराश्य ही चक्र निर्माण होतात

उपाय कोणते ?
- कुटुंबातील मतभेद संवादातून सोडवणे
- मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे
- भावनांचे सकारात्मक मार्गाने प्रकटीकरण, व्यायाम, कला, ध्यान
- पोलिस व कायदा यंत्रणेत जलद कार्यवाही व कडक शिक्षा
- मन शांत करण्यासाठी ध्यान, योग, व्यायाम
- राग व्यक्त करण्यासाठी लेखन, कला, संगीत असे मार्ग वापरणे
- भावनांवर नियंत्रण शिकवणारी कौटुंबिक व सामाजिक जाणीव

आणखी काय करता येईल ?
- राग व्यवस्थापन कार्यशाळा
- संवाद कौशल्य विकसित करणे
- वाद वाढण्याआधी थांबण्याची सवय
- शाळा-महाविद्यालयात मानसशास्त्रीय मार्गदर्शन
- सामूहिक जागरूकता मोहीम

क्षणिक राग हा आयुष्यभराचा पश्चात्ताप ठरतो. लहानसहान कारणांवरून जीवघेणे प्रकार घडणे ही भावनिक अपरिपक्वतेची लक्षणे आहेत. आपल्या भावना व्यक्त करताना मारहाण किंवा हिंसा हा मार्ग नाही. संवाद, समजूत, सहनशीलता यांना प्राधान्य दिले पाहिजे. पालकांनी मुलांना लहानपणापासूनच रागावर नियंत्रण ठेवणे,
समजून घेणे आणि समस्या सोडविण्याचे कौशल्य शिकवले पाहिजे. वाद संवादातून सुटतो. हिंसेतून नाही. संयम हीच खरी ताकद आहे.
- वंदना मांढरे, समुपदेशिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com