अंतिम प्रभाग रचनेकडे इच्छुकांचे लक्ष

अंतिम प्रभाग रचनेकडे इच्छुकांचे लक्ष

Published on

पिंपरी, ता. १५ ः महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचनांवर गेल्या आठवड्यात सुनावणी झाली. आजअखेर (ता. १५) प्रभागरचना अंतिम करून ती २२ सप्टेंबरपर्यंत नगरविकास विभागाला सादर केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाची अंतिम मंजुरी तीन ते सहा ऑक्टोबर या कालावधीत जाहीर होणार आहे. त्यामुळे हरकती व सूचनांनुसार प्रभाग रचनेत बदल होणार की नाही, तसेच अंतिम प्रभाग रचनेकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी माजी नगरसदस्यांसह नव्या इच्छुकांनीही आपापल्या भागात फलक लावून जाहिरातबाजी सुरू केली आहे. गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे व गृहनिर्माण सोसायट्यांच्या गणेश मंडळांना भेटी देऊन, आरती व विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमांना हजेरी लावून ‘आपण महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक’ असल्याचे अनेकांनी अधोरेखित केले आहे.
निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर ३१८ हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यावर गेल्या बुधवारी (ता. १० सप्टेंबर) सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव तसेच प्राधिकृत अधिकारी प्रवीण दराडे यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली आहे. त्यास उपस्थित राहून इच्छुक हरकतदारांनी भूमिकाही मांडली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर प्रत्येक हरकतीवर निर्णय घेऊन १६ ते २२ सप्टेंबर या कालावधीत अंतिम प्रभाग रचना सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

नऊ प्रभागांबाबत हरकत नाही
प्रारूप प्रभाग रचनेनुसार नऊ प्रभागांबाबत हरकती आल्या नाहीत. प्रभाग पाच (भोसरी गवळीनगर, चक्रपाणी वसाहत), प्रभाग १३ (निगडी यमुनानगर), प्रभाग १५ (आकुर्डी प्राधिकरण), १६ (रावेत किवळे मामुर्डी), १७ (दळवीनगर बिजलीनगर वाल्हेकरवाडी), १८ (चिंचवडगाव), २५ (पुनावळे वाकड ताथवडे), २७ (रहाटणी काळेवाडी फाटा), २८ (पिंपळे सौदागर) यांबाबत एकही हरकत आली नाही. सात प्रभागांबाबत प्रत्येकी एक, चार प्रभागांबाबत प्रत्येकी दोन, दोन प्रभागांबाबत प्रत्येकी तीन हरकती प्राप्त झाल्या होत्या.
प्रभाग क्रमांक एक मध्ये ८६ आणि १२ अर्जदारांच्या हरकती एकसारख्या होत्या. प्रभाग १० मध्ये ५२, ३८ आणि २२ अर्जदारांच्या हरकती एकसारख्या होत्या. प्रभाग २० मध्ये २९ अर्जदारांच्या हरकती एकसारख्या होत्या.
---

सर्वाधिक हरकती ः प्रभाग क्रमांक ः नाव
११५ ः १० ः मोरवाडी-दत्तनगर-संभाजीनगर
९८ ः १ ः चिखली-जाधववाडी
३१ ः २० ः संत तुकारामनगर-वल्लभनगर
१५ ः ७ ः भोसरी गावठाण-सॅंडविक कॉलनी
----

Marathi News Esakal
www.esakal.com