नदीत ढकलून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न
पिंपरी : एका तरुणाला दारू पाजून जिवे मारण्याच्या उद्देशाने नदीच्या पुलावरून नदीपात्रात फेकले. ही घटना मोशीजवळील इंद्रायणी नदीच्या जुन्या पुलावर घडली. याप्रकरणी सिद्धार्थ भानुदास बोडके (वय ३७, रा. मोशी, मूळ- लातूर) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोहन तुकाराम जाधव (वय ३४, रा. मोशी) याला अटक केली आहे. आरोपीने फिर्यादीला दारू पिण्यासाठी बोलावले. त्याच्या रिक्षात बसवून ‘आज तुला जिवंत सोडत नाही’ असे म्हणत त्याला मोशी येथे एका हॉटेलात नेऊन दारू पाजली. त्यानंतर त्याने फिर्यादीसोबत शिवीगाळ करीत वाद घातला. त्यानंतर आरोपीने त्याला रिक्षात बसवून इंद्रायणी नदीच्या जुन्या पुलावर आणले. तिथे पुन्हा वाद घालून रिक्षातून बाहेर ओढून हाताने मारहाण करून रॉड मारू लागला. रॉडचा फटका फिर्यादीच्या हाताला लागला. त्यानंतर आरोपीने जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीला उचलून पुलावरून इंद्रायणी नदीपात्रात फेकले.
मोबाईल हिसकाविल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : तरुणाच्या हातातून मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या एकाला संत तुकारामनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर घडली. तुषार सुभाष कांबळे (वय २४, रा. निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विशाल सुनील गायकवाड (रा. चिखली) यांनी संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या बहिणीसाठी आणि तिच्या मुलासाठी जेवण आणण्यासाठी रुग्णालयाबाहेर गेले होते. जेवण घेऊन परत येत असताना ते मोबाईलवर बोलत होते. त्याचवेळी आरोपीने त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेत तेथून पळून काढला.
तडीपार गुंडाकडून तीन किलो गांजा जप्त
पिंपरी : पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या एका गुंडांकडून तीन किलो गांजा जप्त करून त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई सोमाटणे फाटा ते परंदवडी रस्त्यावर करण्यात आली. अक्षय घनश्याम भालेराव (वय ३१, जाधव वस्ती, रावेत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. भालेराव याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २ नोव्हेंबर २०२४ रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तरीही तो हद्दीत आला. याबाबत गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाला माहिती मिळाली असता सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक लाख ५६ हजार १५० रुपये किमतीचा तीन किलो १२३ ग्राम गांजा सापडला. आरोपीने हा गांजा धुळे येथून आणल्याचे सांगितले.
---