शहरात वाढतेय ‘आरएसव्ही’ आजाराचे प्रमाण
पिंपरी,ता. १५ ः पिंपरी चिंचवड शहरात सध्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. सर्दी, खोकला,ताप यामुळे नागरिक हैराण झाले असून दवाखान्यांच्या बाह्यरुग्ण विभागांमध्ये या रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे. यामध्ये ‘आरएसव्ही’ या संसर्गजन्य आजाराचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे. साध्या सर्दी , खोकला ताप यासारख्याच असलेल्या रुग्णांमध्ये विशेषतः लहान मुलांमध्ये गंभीर परिणाम दिसून येत आहेत. सततचा पाऊस, कमी सूर्यप्रकाश, वातावरणात वाढलेली आर्द्रता यामुळे या आजाराचा प्रादूर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
काय आहे आरएसव्ही ?
आरएसव्ही अर्थात रेस्पिरेटरी सेन्सिटिअल व्हायरस हा श्वसनाचा आजार आहे. या आजाराची सुरवात नाक गळणे, अचानक खूप जास्त ताप याने होते. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला या आजाराची लागण होण्याचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याने सर्वच वयोगटांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढले आहे. मोठ्यांच्या तुलनेत या आजाराची लक्षणे लहान मुलांमध्येही आजार बळावत आहे. मुलांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने कफ झाल्यास त्यांना न्यूमोनिया होण्याचा धोका उद्भवण्याची भीती असते. त्यामुळे सर्दी खोकला असेल तरी वेळेत उपचार करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
लक्षणे
-अचानक १०० फॅरनहाइट पेक्षा अधिक ताप येणे
- सर्दी व सतत वाहणारे नाक
- दोन ते तीन आठवडे राहणारा खोकला
- ५ ते ७ दिवस राहणारा ताप
काय काळजी घ्यावी
- बाहेर जाताना मास्क वापरावा
- मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये
- मोठ्यांनी आजारी असल्यास घराबाहेर पडणे टाळावे
- सतत हात धुवावेत
- शिंकताना किंवा खोकताना रुमालाचे तोंड झाकावे
- आजारी मुलांनी शाळेत पाठवू नये
- सर्दी ,खोकला झाल्यास वाफ द्यावी
- घरात स्वच्छता ठेवावी
- ओलसर हवामानामुळे घरात बुरशी होणार नाही याची काळजी घ्यावी
वायसीएमच्या ‘बालरोग विभागात’ गर्दी
संसर्गजन्य आजारांमुळे महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील बालरोग विभागात उपचारांसाठी भरती होणाऱ्या बालकांचे प्रमाण वाढले आहे. या विभागात ६० खाटा आहेत. तर अतिदक्षता विभागात सहा खाटा आहेत. मात्र, ही जागा अपुरी पडत आहे. तसेच बाह्यरुग्ण विभागातही रोज २०० ते २५० लहान मुले उपचारासाठी येत आहेत. त्यातील जवळपास ऐंशी टक्के मुले ‘आरएसव्ही’मुळे आजारी असल्याचे निदान होत आहे. यातील गंभीर लक्षणे असणाऱ्या मुलांना उपचारासाठी भरती करावे लागत आहे.
---
गेल्या महिनाभरापासून शहरात आरएसव्ही या आजाराचे प्रमाण वाढत आहे. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत या आजाराचा फैलाव वेगाने होत असल्याने रुग्ण संख्या वाढत आहे.सर्वच वयोगटात हा आजार दिसून येत असला तरी मोठ्यांमध्ये हा आजार सौम्य स्वरूपाचा असतो. मात्र, लहान मुलांमध्ये मात्र गंभीर परिणाम दिसून येत आहेत. वायसीएमच्या बालरोग विभागात या आजाराचे अनेक रुग्ण येत असून श्वसनाचा त्रास होणाऱ्या मुलांना उपचारांसाठी भरती करून घ्यावे लागत आहे. बाह्यरुग्ण विभागातही रुग्णांची संख्या वाढली आहे.
- डॉ. दीपाली अंबिके, विभाग प्रमुख, बालरोग विभाग, वायसीएम रुग्णालय
-----