पिंपरी चिंचवडकरांना अनुभवता येणार रंगानुभूती

पिंपरी चिंचवडकरांना अनुभवता येणार रंगानुभूती

Published on

पिंपरी, ता. १६ ः पिंपरी चिंचवड महापालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी व पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला रंगानुभूती ः पूर्वरंग ते उत्तररंग नाट्य प्रयोग कला महोत्सव १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान निगडी प्राधिकरणातील ग.दि. माडगूळकर सभागृह येथे होणार आहे. या महोत्सवाचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक व पैस रंगमंचचे संस्थापक प्रभाकर पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्‍घाटनानंतर लगेचच श्री. इदागुणजी महागणपती यक्षगान मंडळी केरेमाने यांचे पंचपटी कथानाट्याचे सादरीकरण केले जाणार आहे.
तत्पूर्वी १९ सप्टेंबरला सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत पैस करंडक अंतर्गत शालेय नाट्यछटा व एकपात्री अभिनय स्पर्धा होईल. तसेच खुल्या गटाच्या मूकनाट्य, लघुनाटिका स्पर्धा होतील. सकाळी साडेनऊ वाजता संस्कार भारती व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहयोगाने आयोजित चित्रकला प्रदर्शन तसेच रंगदर्शन यांचे उद्‍घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होईल. १० ते १२ या वेळात यक्षगान मंडळींची यक्षगानावर प्रयोगकला अभ्यासवर्ग - कार्यशाळा होईल. त्यानंतर महापालिकेच्या संगीत अकादमीचा पूर्वरंग हा कार्यक्रम होईल.
शनिवारी (ता. २०) सायंकाळी पाच वाजता, पिंपरी चिंचवड परिसरात नाट्यकलेसह सांस्कृतिक क्षेत्रात योगदान असणाऱ्या संस्थांचा `प्रयोगकला सन्मान’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. सायंकाळी ‘कलगीतुरा’ या नाटकाचे सादरीकरण व चर्चासत्र होईल. दरम्यान, सकाळी सात ते अकरा या वेळाच नाट्यगृह परिसरात महाविद्यालयीन व खुल्या पथनाट्य स्पर्धा होतील. त्यानंतर बारा वाजता मुख्य रंगमंचावर जयपूर राजस्थान येथील रंग मस्ताने संस्थेचे ‘महारथी’ या फिजिकल थिएटर माध्यमातून हिंदी नाटकाचे सादरीकरण व चर्चासत्र होईल.
रविवारी (ता. २१) सायंकाळी पाच वाजता, एफटीआयचे माजी विभाग प्रमुख प्रा. समर नखाते यांचा ‘रंगानुभूति: सन्मान’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. यानंतर ‘ठकीशी संवाद’ या मराठी नाटकाचे सादरीकरण आणि त्यावर चर्चासत्र होईल. त्यापूर्वी सकाळी दहा वाजता ‘फिजिकल थिएटर’ आयोजित अभ्यासवर्ग - कार्यशाळा होईल. दुपारी साडेबारा वाजता ‘एकलनाट्य कावडकथा - माया’ या हिंदी भाषेतील नाटकाचे सादरीकरण व चर्चासत्र होईल. दुपारी दोन वाजता वंदना घांगुर्डे यांची श्रीकांत चौगुले हे प्रकट मुलाखत घेतील. या तीन दिवसीय महोत्सवाला प्रवेश विनामूल्य आहे. मात्र, प्रवेशिका आवश्यक आहे. विनामूल्य प्रवेशिकांसाठी प्रियांका राजे यांना ८६००९००३९० क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com