अकरावी ऑनलाइन प्रक्रियेत आतापर्यंत ६५ टक्के प्रवेश
पिंपरी, ता. १७ ः दहावीचा निकाल लागून दोन महिने उलटले तरी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अनेक अडथळ्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. आतापर्यंत एकूण ६५ टक्के प्रवेश झाले असून शहरातील हजारो जागा रिक्त असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया तत्काळ बंद करून पारंपरिक पद्धतीने प्रवेश द्यावेत, अशी मागणी पालक व कनिष्ठ महाविद्यालय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
राज्याच्या शिक्षण विभागाने केंद्रीभूत पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविली. अखेरच्या फेरीनंतरही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे, आणखी एक विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ६२ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. प्रक्रिया ऑनलाइन नसती; तर ग्रामीण भागांमध्ये १६ जूनपासूनच वर्ग भरले असते.
शासनाकडून पालकांची लूट ?
सायबर कॅफेमधील अपुऱ्या माहितीमुळे अनेक अर्ज चुकीचे भरले गेले. परिणामी, शेकडो विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळूनही विनाअनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेश मिळाला. त्यामुळे, पालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या संदर्भात पालक व कनिष्ठ महाविद्यालय संघटनांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला कडाडून विरोध केला असतानाही राज्य शासनाने माघार घेतली नाही. विद्यार्थ्यांना मनस्ताप, पालकांची कोट्यवधी रुपयांची लूट करून शासनाला नेमके काय साध्य करायचे आहे?, असा थेट सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
‘‘दहावीचा निकाल लागून दोन महिने झाले तरी अकरावीच्या प्रवेशाचा घोळ अजून सुरू आहे. आतापर्यंत एकूण ६२ टक्के प्रवेश झाले आहेत. ऑनलाइन नसते; तर ग्रामीण भागांमध्ये जूनपासूनच वर्ग भरले असते. कोणाच्या तरी अट्टहासाने राज्याला वेठीस धरले आहे. ग्रामीण भागांतील मुलांचे अजूनही प्रवेश झालेले नाहीत. ती मुले अनिश्चिततेच्या सावटाखाली आहेत. त्यांचा भ्रम निरास झाला आहे.’’
- महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष, राज्य मुख्याध्यापक महामंडळ
यंदापासून इयत्ता अकरावीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात राबविण्यात आली. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा स्वयं अर्थसाहाय्य (सेल्फ फायनान्स) महाविद्यालये व तुकड्यांची संख्या वाढल्यामुळे एकूण प्रवेश क्षमतेच्या कमी प्रवेश झालेले दिसत आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरुवातीला समजण्यास शिक्षकांसह पालक व विद्यार्थ्यांना थोडा वेळ लागला. परंतु आता ही प्रक्रिया सर्वांना समजलेली आहे. त्यामुळे, जे विद्यार्थी प्रवेश मागत आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत. अपवादात्मक परिस्थितीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना शाखा, माध्यम किंवा महाविद्यालय बदल करावयाचा आहे, अशाच विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. बाकी सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश संबंधित महाविद्यालयांच्या उपलब्ध जागेप्रमाणे पूर्ण झालेले आहेत. प्रवेश प्रक्रियेमध्ये आता कोणत्याही प्रकारची गडबड किंवा गोंधळ नाही.
- प्राचार्य विक्रम काळे, सदस्य, कॅप कमिटी, अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समिती, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.