
पिपंरी, ता. १८ ः शहरातील रस्त्यांची झालेली चाळण, अर्धवट राहिलेली कामे आणि जागोजागी टाकण्यात आलेले रम्बलर वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. त्यातही बऱ्याच रस्त्यांवर प्लॅस्टिकचे रम्बलर बसविण्यात आले होते. आता, हे तुटून फक्त खिळे शिल्लक राहिले आहेत. हे खिळे धोकादायक ठरत असून, वाहने पंक्चर होऊन अपघाताची शक्यता आहे.
रस्ते अपघातातील मृत्यू हा चिंतेचा विषय झाला असून, दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढताना दिसून येत आहे. बहुतांश वेळा अतिवेगाने वाहने चालविल्यामुळे वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे दिसून येत आहे. अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग किंवा शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहनांची गती कमी करण्यासाठी रम्बलर टाकले आहेत. तसेच तीव्र उतार, रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ आदी वर्दळीच्या ठिकाणांच्या अगोदर वाहनांची गती कमी करण्यासाठी रम्बलर टाकले आहेत. काही रस्त्यांवर थर्मोप्लास्ट रम्बलर तर, काही ठिकाणी प्लॅस्टिकचे रम्बलर बसविण्यात आले आहेत. पण, यातील बहुतांश ठिकाणचे थर्मोप्लास्टचे रम्बलर एक ते दोन महिन्यांतच झिजले आहेत. त्यामुळे आता केवळ पांढरे पट्टे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे कामाच्या दर्जावर चिन्ह उपस्थित होत आहे. तसेच, रम्बलर निघून गेले असल्याने वाहनेही अतिवेगाने धावत आहेत. प्लॅस्टिकचे रम्बलरही तुटले असून, ते बसविण्यासाठी वापरलेले लोखंडी खिळे शिल्लक राहिले आहेत. हे खिळे संबंधित विभागाने काढणे अपेक्षित होते. पण, अजूनही रस्त्यांवर हे खिळे दिसून येत आहेत. वाहनचालक अचानक खिळे दिसल्यामुळे वाहनांचा वेग कमी करतात. त्यामुळे मागून वेगाने येणारी वाहने धडकून अपघात होण्याचा धोका आहे. तसेच, हे खिळे वाहनांचे चाके पंक्चर होण्यास कारणीभूत ठरत असून, मोठा अपघात होण्याचा धोका आहे. प्रशासनाने तत्काळ रस्त्यांवरील थर्मोप्लास्ट रम्बलर दुरुस्त करावेत व त्यासाठी लावलेले खिळे काढून टाकण्याची मागणी होत आहे.
धोकादायक गतिरोधकांमुळे नागरिक त्रस्त
शहरातील वाढते अपघात रोखण्यासाठी अवजड वाहनांवर बंदीसह विविध उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच वाहनांची गती कमी करण्यासाठी रस्त्यांवर गतिरोधक उभारण्यात आले आहेत. पण, गतिरोधके (स्पीडब्रेकर्स) ही इंडियन रोड्स काँग्रेसच्या (आयआरसी) मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे आणि बांधणीच्या निकषांप्रमाणे नसल्याचे दिसून येते. असमान व अधिक उंचीच्या गतिरोधकांमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे आणि मणके, कंबर, मानदुखीच्या तक्रारी येत आहेत. बहुतांश गतिरोधकांवर काळ्या-पांढऱ्या रंगांच्या पट्ट्यांनी रंगवले नसल्यामुळे गतिरोधक दिसत नाहीत. परिणामी, वाहने गतिरोधकावरून उंच उडून खाली येत असल्याने अपघात होत आहेत. पालिका प्रशासन शहरातील धोकादायक गतिरोधकांचा सर्व्हे करून ते कधी काढून टाकणार? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
‘‘रस्त्यावर काही ठिकाणी प्लॅस्टिकचे रम्बलर टाकले होते. ते तुटले असून खिळे शिल्लक राहिले आहेत. हे खिळे धोकादायक असून प्रशासनाने तत्काळ काढून टाकावेत.
- राजेश जाधव, नागरिक
‘‘शहरातील सर्व रस्त्यांवर रम्बलर लावणे सुरू आहे. काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वळणावरच रम्बलर लावले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. त्याचा दर्जा खराब असल्यामुळे ते निघून जात आहेत. प्रशासनाने चांगल्या दर्जाचे रम्बलर बसवावेत.
- गजानन चंदेगावे, नागरिक
‘‘शहरातील काही रस्त्यांवर पावसाळ्यापूर्वी रम्बलर टाकले होते. पण, पावसामुळे काही ठिकाणचे निघून गेल्याच्या तक्रारी आहेत. पावसाळा संपला की दुरुस्त केले जातील. तसेच, रम्बलरसाठी लावलेले खिळे काढून टाकण्यात येतील.
- देवन्ना गट्टूवार, सहशहर अभियंता, पीसीएमसी
नियम काय आहे?
- इंडियन रोड्स काँग्रेसच्या कोड १९९८-९९ नुसार गतिरोधक केवळ
०.१० मीटर (४ इंच) उंच आणि त्याच्या दोन्ही बाजूला उतार ३.७ मीटर (१२ फुट) इतका रुंद असायला हवा
- गतिरोधक येण्यापूर्वी ४० मीटर अंतरावर ६० सेंटिमीटर आकाराचे फलक असणे आवश्यक
- गतिरोधकाच्या अगोदर पाच मीटरवर थर्मोप्लॅस्ट रंगाने रम्बलर स्ट्रीप करणे आवश्यक
- गतिरोधके काळ्या-पांढऱ्या रंगांच्या पट्ट्यांनी रंगवलेले असावेत
- गतिरोधक रात्रीच्या अंधारातही लक्षात येण्यासाठी त्यावर चमकदार पट्ट्या असाव्यात
- प्रत्येक गतिरोधकाच्या ठिकाणी पुरेशी प्रकाशयोजना असणे आवश्यक
- रस्त्याची जेवढी रुंदी असेल तेवढ्या रुंदीवर रम्ब्लर स्ट्रीपच्या सुरुवातीला कॅट्स आय (पिवळ्या रंगाचे) लावणे आवश्यक
- वाहने गतिरोधकावरून पदपथांवर जाऊ नये यासाठी पदपथांच्या कडेने आणि गतिरोधकाच्या बाजूला प्लॅस्टिकचे बोलार्डस लावण्यात यावेत
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.