शैक्षणिक प्रगतीत महापालिका ‘उत्तीर्ण’
पिंपरी, ता. १८ ः महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी यशाची उत्तुंग भरारी घेत आहेत. राष्ट्रीय विज्ञान उपक्रम असतील, भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) भेट, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, शाळांना मिळालेले ‘आयएसओ’ मानांकन, इंग्रजी माध्यमातून शिक्षण, दहावीसह विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश, विद्यार्थ्यांचे समुपदेशन, नाविन्यपूर्ण उपक्रम, सुरक्षित वातावरण आदी कारणांमुळे महापालिका शाळांमध्ये मुलांना दाखल करण्याकडे पालकांचा कल वाढल्याचे दिसत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १३४ शाळा आहेत. त्यामध्ये गेल्या चार वर्षांपासून विद्यार्थी संख्या सातत्याने वाढत असल्याचे यू-डायस (युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशन) प्रणाली अर्थात एकीकृत जिल्हा माहिती प्रणालीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रमही राबविले जात आहेत. शिवाय, महापालिकेच्या २११ बालवाड्यांमधील सहा हजारांपेक्षा जास्त मुलांसाठी बालसुलभ वर्गखोल्या आहेत. त्यांचाही परिणाम पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यात होत आहे.
क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या (क्यूसीआय) मूल्यमापनानुसार....
- प्रारंभिक पातळीवरील विद्यार्थ्यांचे प्रमाण २०२३-२४ मध्ये २८ टक्के होते, ते २०२४-२५ मध्ये १३ टक्क्यांवर आले
- उच्च पातळीवर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ०.५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांपर्यंत वाढले
- प्राथमिक वर्गांच्या निकालांमध्ये लक्षणीय सुधारणा
- दुसरीतील प्रारंभिक पातळीवरील विद्यार्थी ३० टक्क्यांवरून सात टक्क्यांपर्यंत कमी झाले
- प्रगत विद्यार्थ्यांचे प्रमाण शून्य टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर पोहोचले
मूल्यमापनात काय आढळले...
- प्रारंभिक साक्षरता, अंकगणित व इतर कौशल्यांमध्ये २० ते २४ टक्के सुधारणा
- ‘स्पंदन’ कार्यक्रमातून सामाजिक-भावनिक शिक्षण व जीवन कौशल्यांवर भर
- ‘इंग्रजी ॲज सेकंड लँग्वेज’ उपक्रमांतर्गत २७ हजारांवर विद्यार्थ्यांकडून इंग्रजीचा आत्मविश्वासाने वापर
- ‘द आर्ट बॉक्स’ प्रदर्शन व ‘जल्लोष शिक्षणाचा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन विस्तारण्यास मदत
- भारत दर्शन दौऱ्यातून गुणवंत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक अनुभव
- सुरक्षेसाठी एनसीपीसीआर व एनसीईआरटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार शाळा सुरक्षा लेखापरीक्षण
- ‘पोलिस काका’, ‘दामिनी स्क्वॉड’, मुस्कान फाउंडेशन व ‘अर्पण’च्या माध्यमातून बालसंरक्षण प्रशिक्षण
- शाळांमध्ये २३ समुपदेशक असून शाळा व्यवस्थापन समित्यांद्वारे सुरक्षा व बालसंरक्षणावर काटेकोरपणे लक्ष
महापालिका शाळांची विद्यार्थी संख्या
शैक्षणिक वर्ष / विद्यार्थी संख्या
२०२२-२३ / ४८,१५३
२०२३-२४ / ५०,५८१
२०२४-२५ / ५०,७४९
२०२५-२६ / ५४,४१८
मुलींचे (विद्यार्थिनी) प्रमाण वाढतेय
शैक्षणिक वर्ष / विद्यार्थिनी
२०२२-२३ / २४,७८८
२०२३-२४ /२५,९०२
२०२४-२५ / २५,९२२
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये मुलींच्या प्रवेश संख्येत उल्लेखनीय वाढ झाली आहे. त्यामधून पालकांचा महापालिका शाळांवरील सुरक्षा व गुणवत्तेवरील विश्वास दिसून येतो. ‘क्युसीआय’च्या फ्रेमवर्कमधून शैक्षणिक निकाल सुधारण्याचा उपक्रम यशस्वी ठरत आहे. विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे प्रगतीची गती कायम ठेवण्यात येईल.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका
शालेय साहित्याच्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजे ‘डीबीटी’, डिजीटल वर्गखोल्या, वाचनालय, कला शिक्षक, ‘क्युसीआय’ मूल्यमापन, प्रत्यक्ष उपक्रम यासह विविध सुधारणा शाळांमध्ये केल्या आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. पालकांनाही महापालिकेच्या शाळांतील दर्जेदार शैक्षणिक सुविधांची माहिती दिली जात असल्याने विद्यार्थी संख्या वाढत आहे.
- प्रदीप जांभळे - पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
आमच्या शाळेतील विद्यार्थांची संख्या वाढली आहे. ८७४ पैकी ४५८ मुली आहेत. अधिकाधिक पालक आत्मविश्वासाने आमच्या शाळेची निवड करीत आहेत. पीएम श्री योजनेमुळे खासगी शाळांसारख्या सुविधा मिळाल्या आहेत. त्यामध्ये ‘रोबोटिक्स व इनोव्हेशन लॅब’चाही समावेश आहे. ‘सक्षम’ उपक्रमामुळे आमचे विद्यार्थी अधिक सुसज्ज झाले आहेत.
- स्नेहल मोरे, मुख्याध्यापिका, पीएम श्री पीसीएमसी पब्लिक स्कूल, म्हेत्रेवाडी, चिखली
आमच्या शाळेत ज्युनिअर केजीच्या ८० जागा सोडत पद्धतीने भरल्या जातात. २०२४-२५ मध्ये १०५ मुलगे आणि ७७ मुलींचे अर्ज आले होते. यंदा अर्जांची संख्या २० टक्क्यांनी वाढली आहे. प्रवेश स्तराबरोबरच इतर वर्गात पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी पालक आग्रही असतात. अनेक पालकांनी खासगी शाळांऐवजी आमच्या शाळेला प्राधान्य दिले आहे.
- परिजात प्रकाश, मुख्याध्यापक, छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल, कासारवाडी
माझ्या मुलाला आठवीत असताना महापालिकेच्या शाळेत दाखल केले होते. तेथूनच त्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून दहावी उत्तीर्ण झाला आहे. गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्तीही त्याला मिळाली होती. त्यामुळे, तो पुढील शिक्षण घेऊ शकत आहे. आता तो बारावीत आहे. माझी मुलगी महापालिका शाळेतच शिक्षण घेत आहे.
- एक महिला पालक, थेरगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.