
पिंपरी, ता. १८ : पिंपरी चिंचवड शहरातील कचरा संकलनाची वाहने खिळखिळी झाली आहेत. त्यातील अनेक ‘अनफिट’ आहेत. काहींना नंबरप्लेटही नाही. तरीही धोकादायक पद्धतीने कचरा वाहतूक केली जात असल्याचे चित्र शहरात आहे. या प्रकाराने प्रदूषणही वाढत आहे. अशा प्रकारांतून पालिका प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात निवासी संकुले, औद्योगिक कारखाने, व्यावसायिक आस्थापना, रुग्णालये, दवाखाने आणि भाजी बाजारांसह विविध स्रोतांतून दररोज सुमारे १,४०० ते १,५०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. जैविक, अजैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हा कचरा घंटागाडीद्वारे संकलन केंद्रावर आणला जातो. तेथून तो वेगळा करून मालवाहू डंपर आणि कॉम्पॅक्टर वाहनांद्वारे मोशीतील कचरा डेपो येथे आणला जातो. पण, यासाठी वापरली जाणारी बहुतांश वाहने ही २० वर्षांहून अधिक जुनी आहेत; तर काही वाहने तब्बल ४० ते ४५ वर्षे जुनी आहेत. वाहन मालकांकडून दर पाच वर्षांनी ‘फिटनेस’ तपासणी करून वर्षानुवर्षे हीच वाहने वापरली जात आहेत. आयुर्मान संपले असतानाही वाहनांचा वापर होत असल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रशासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मात्र, पालिकेच्या वापरातच प्रदूषण करणाऱ्या जुन्या वाहनांचा वापर होत असल्याने प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पालिकेचे वाहन म्हणून दुर्लक्ष
सर्वसामान्य नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यावर वाहतूक पोलिस कारवाई करतात. मात्र, महापालिकेची कचरा वाहतूक करणारी वाहने खिळखिळी झालेली असताना पोलिस कारवाई करत नाहीत. पालिकेची वाहने आहेत म्हणून तर या वाहनांकडे दुर्लक्ष केले जात नाही ना? वाहन भंगार झाले असताना त्यांचे ‘पासिंग’ आरटीओकडून होतेच कसे? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरात धोकादायक पद्धतीने कचरा वाहतूक सुरू आहे. याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास कारवाई करण्याचे अधिकार आम्हाला नसून आरोग्य अधिकाऱ्यांना असल्याचे उत्तर देतात. आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर ठिकाण विचारतात. ठिकाण दिले की तुमची तक्रार क्षेत्रीय कार्यालयाला पाठविले असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.
- बी. एस. पाटील, नागरिक
घरगुती घनकचऱ्यावर दृष्टीक्षेप
संकलन केंद्र : २८
संकलन क्षेत्र : ८
वाहने : ५२०
वाहन प्रकार : वाहन संख्या
छोटा हत्ती मॅंझिमो/पीआयजीओ/ टाटा एसीई : ३४२
डंपर प्लेसर : ४
बीआरसी : २
हॉटेल वेस्ट ट्रक कॉम्पॅक्टर : २
कॉम्पॅक्टर : ८२
टिपर ट्रक : ६४
ग्रीन वेस्ट कॉम्पॅक्टर : ३
कॅप्सूल ट्रान्सफर : ४
हायवा : १
यांत्रिक रस्ते सफाई : १६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.