गुन्हे वृत्त
दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींना अटक
पिंपरी : सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना भोसरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई भोसरीतील नवीन भोसरी रुग्णालयासमोरील बैलगाडा घाटाजवळ करण्यात आली.
कुणाल डाके (वय २२, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी), फैय्याज अली सय्यद (वय २०, रा. आदर्शनगर, मोशी), गणेश भोसले (वय २१, रा. लांडगे नगर, भोसरी), साहिल भिलारे (वय २०) आणि विजय झेंडे (वय १९, दोघेही रा. शिवशंभो कॉलनी, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी कमरेला कोयता, खिशात मिरची पावडर आणि मास्क घेऊन थांबले होते. ते धावडे वस्ती येथील एका सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून पाच जणांना अटक केली.
खंडणी प्रकरणी चौघांना अटक
पिंपरी : चिंचवड येथे लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक उतरविण्याच्या कामावर एका टोळक्याने शंभर रुपये प्रती टन खंडणीची मागणी केली. खंडणी दिली नाही तर जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
नईम शेख (रा. आदर्शनगर, मोशी, मूळ- बीड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आकाश कुदळे (वय ३१, रा. दळवीनगर, चिंचवड), पालेखान इराणी (वय ३७, रा. साईबाबानगर, चिंचवड), नीलेश कुदळे (वय २१) आणि सोन्या कोकरे (दोघेही रा. दळवीनगर, चिंचवड) यांना अटक केली आहे.
फिर्यादी त्यांच्या गाडीतील ५० टन लोखंडी सळई उतरवत असताना आरोपींनी ‘‘आम्ही या भागातील भाई असून तुम्हाला येथे गाडी खाली करायची असेल तर १०० रुपये प्रती टन प्रमाणे पैसे द्यावे लागतील.’’ अशी धमकी दिली. एका आरोपीने हातात कोयता घेऊन पाच हजार रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या फोनमधून ऑनलाइन अडीच हजाराची खंडणी घेतली.
गुंतवणुकीच्या नावाखाली ४१ लाखांची फसवणूक
पिंपरी : शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून बाणेर येथील एका नागरिकाची ४१ लाखांची फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी राजेशकुमार दास (रा. बाणेर) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीला अज्ञात व्यक्तीने शेअर बाजारात अकाऊंट उघडण्यासाठी फोनमध्ये संकेतस्थळ पाठवले. फिर्यादीने संकेतस्थळावर जाऊन वैयक्तिक माहिती भरली. त्यानंतर फिर्यादीला यूएसडीटीमध्ये एकूण ४१ लाख १९ हजार ४१४ रुपये गुंतवण्यास सांगितले. मात्र, कोणताही परतावा न देता त्याची फसवणूक केली.
खंडणीसाठी धमकी; एकाला अटक
पिंपरी : वाकडमधील काळाखडक येथे खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
अमित माने (रा. नेहरू नगर, पिंपरी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुर्गाप्पा देवकर (वय ३७, काळखडक, वाकड) याला अटक केली आहे. मी मागील तीन वर्षांपासून येथे काम करत आहे. हा माझा भाग आहे, मला पैसे दिल्याशिवाय तुम्हाला येथे काम करता येणार नाही, अशी धमकी आरोपीने दिली. तसेच फिर्यादीची नोंदीत माथाडी टोळी असताना देखील तेथे काम करायचे असल्यास ११० रुपये प्रती टन याप्रमाणे एकूण दोन हजार ५३० रुपयांची खंडणी मागितली. त्याने ऑनलाइन दीड हजार रुपये घेतले आणि नंतर पंचासमक्ष एक हजार रुपये घेतले. दरम्यान, आरोपीने एका संघटनेची छापलेली दोन हजार ५३० रुपयांची
पावती स्वतःच्या नावाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

