पीएम ई-विद्या वाहिन्यांची शाळा, शिक्षकांवर जबाबदारी
पिंपरी, ता. २२ ः केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने महाराष्ट्र राज्यासाठी एकूण पाच पीएम ई-विद्या वाहिन्या उपलब्ध केल्या आहेत. त्या चॅनेल पालकांपर्यंत पोचवण्याची आणि सबस्क्राइब करून घेण्याची जबाबदारी शाळा व शिक्षकांना देण्यात आली आहे.
या सर्व वाहिन्या डीडी-फ्री डिश व्यतिरिक्त यूट्यूब वर लाइव्ह उपलब्ध आहेत. प्रत्येक वाहिनीवर रोज सहा तासांचे कार्यक्रम प्रक्षेपित होतात. हे कार्यक्रम २४ तासांत तीन वेळा पुनर्प्रक्षेपित होतात. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना ते सोयीच्या वेळेस पाहणे शक्य होणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (महाराष्ट्र) पुढाकाराने आणि केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने राज्यात प्रक्षेपण सुरू आले आहे. केंद्र सरकारच्या ‘वन क्लास वन टीव्ही चॅनेल’ या अभिनव संकल्पनेनुसार देशभरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. इयत्ता पहिली व सहावीच्या वर्गांसाठी पीएम-ई-विद्या ११३, दुसरी व सातवीसाठी पीएम-ई-विद्या ११४, तिसरी व आठवीसाठी पीएम-ई-विद्या ११५, चौथी व नववीसाठी पीएम-ई-विद्या ११६ आणि पाचवी व दहावीसाठी पीएम-ई-विद्या ११७ या वाहिन्यांवर दर्जेदार आशयाचे कार्यक्रम प्रक्षेपित केले जात आहेत. या उपक्रमासाठी राज्य स्तरावर तसेच वाहिनीनिहाय शैक्षणिक आणि तांत्रिक समन्वय रचना उभारण्यात आली आहे. प्रक्षेपणाची गुणवत्ता सुनिश्चित करणे, वेळापत्रक अद्ययावत ठेवणे आणि कार्यक्रम शाळा व पालकांपर्यंत प्रभावीपणे पोचविणे या जबाबदाऱ्या समन्वयक मंडळाकडे आहेत.
याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालक राहुल रेखावार यांनी सर्व शिक्षक, अधिकारी तसेच पालकांना आवाहन केले आहे, या सर्व शैक्षणिक वाहिन्या यूट्यूब वर सबस्क्राइब कराव्यात. यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ मिळेल. या प्रक्षेपणाचे मासिक वेळापत्रक आणि वाहिन्यांचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी यूट्यूब लिंक परिषदेच्या संकेतस्थळावर (www.maa.ac.in) पीएम-ई-विद्या वाहिन्या या टॅब अंतर्गत उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.
---
विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक प्रभावी शिक्षण देता येईल यासाठी पीएम विद्याच्या माध्यमातून काही वाहिन्या उपलब्ध करून दिल्या आहेत. हे प्रक्षेपण नियमितपणे पाहण्यासाठी सबस्क्राइब केले असेल तर पुढे त्याची नोटिफिकेशन येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इयत्तेनुसार वाहिनी सबस्क्राइब करणे अपेक्षित आहे.
-महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष, राज्य मुख्याध्यापक महामंडळ
----
लोगो
51876