आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांवर परिणामाची शक्यता
पिंपरी, ता. २० ः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतातून परदेशात जाणाऱ्या आयटी अभियंत्याच्या संख्येवर बरेच निर्बंध येऊ शकतात, तसेच सध्या अमेरिकेत असलेल्यांचा व्हिसा नूतनीकरणाचा अतिरिक्त भार कंपन्यांवर पडू शकतो. त्यामुळे एच १- बी व्हिसा घेऊन परदेशात नोकरीनिमित्त किंवा प्रोजेक्टसाठी गेलेल्या आयटी अभियंत्यांना मायदेशी परतावे लागेल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
आता भारतातील कंपन्या अमेरिकेत तंत्रज्ञ पाठविण्यात मोठी कपात करू शकतात. अगदीच गरज असेल तर विविध तंत्रज्ञान अवगत असलेले तंत्रज्ञ पाठविले जाऊ शकतात. त्यामुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांवरही काही प्रमाणात परिणाम होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
ऑन साइट ऑफ शोअर रेशो
भारतीय आयटी कंपन्या जेव्हा अमेरिकी कंपन्यांना सेवा देतात तेव्हा करारानुसार त्यांच्या काही कर्मचाऱ्यांना तिथे जाऊन काम करावे लागते. याला ‘ऑन साइट ऑफ शोअर रेशो’ असे म्हटले जाते. भारतात आयटी क्षेत्र वाढत असताना हे प्रमाण ७०ः३० असे होते. म्हणजेच भारतीय कंपनीचे ७० टक्के कर्मचारी भारतातून तर ३० टक्के कर्मचारी अमेरिकेतून काम करीत. नियम बदलत गेले तसे हे प्रमाण वाढले. सध्या ते ९०ः१० च्या आसपास आहे. ग्राहकांच्या गरजा समजून देणे, तांत्रिक त्रुटी दूर करणे, भारतातील सहकाऱ्यांशी संपर्क ठेवणे ही कामे परदेशातील कर्मचाऱ्यांना करावी लागतात. त्यामुळे भारतीय कंपन्यांना आपले कर्मचारी अमेरिकेत पाठवणे हे अनिवार्य असते. त्यामुळे वाढीव शुल्काचा कंपन्यांना आर्थिक फटका बसेल.
नॅसकॉमचे प्रसिद्धिपत्रक
भारतातील टीसीएस, विप्रो, इन्फोसिस अशा मोठ्या कंपन्यांमधून दरवर्षी हजारो अभियंते अमेरिकेत नोकरीसाठी जातात. त्यांच्यावर निर्बंध आल्यास किंवा तेथील कर्मचाऱ्यांना परतावे लागल्यास अमेरिकेच्या इनोव्हेशन इकोसिस्टिमला फटका बसू शकतो, असे नॅसकॉम संघटनेने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. जागतिक आणि भारतीय कंपन्यांमध्ये एच१-बी व्हिसावर काम करणाऱ्या भारतीय नागरिकांवरही परिणाम होईल. ऑनसाइट प्रकल्पांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. भारताच्या तंत्रज्ञान सेवा कंपन्यांनाही फटका बसेल मात्र भारतातील कंपन्या या परिस्थितीशी जुळवून घेतील, असेही नमूद करण्यात आले.
---
नॅसकॉमचे मुद्दे
- एच१-बी व्हिसा धोरणाच्या बदलावर लक्ष
- भारतीय कंपन्यांकडून गेल्या काही वर्षांत ऑफ शोअर भरतीत वाढ
- व्हिसावर भारतीय कंपन्या कमी प्रमाणात अवलंबून
- भारतीय कंपन्यांकडून अमेरिकेतील आवश्यक नियमांचे पालन
- अमेरिकेतील स्थानिक अर्थव्यवस्थेत भारतीयाचे भरीव योगदान
- व्हिसा धोरणातील बदलानंतर अंमलबजावणीला वेळ अत्यंत कमी
- असा बदल स्वीकारण्यासाठी संबंधितांना योग्य कालावधी देणे आवश्यक
- कुशल मनुष्यबळ अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे
---
आयटी क्षेत्रावर याचा थोडा परिणाम होईल. अमेरिकेत जाणाऱ्यांची संख्या रोडावेल. काही लोकांना परत भारतात यावे लागेल. त्यामुळे भारतातील नोकरभरतीवरही परिणाम होऊ शकतो. त्यांच्या बदल्यात तिथे कुशल मनुष्यबळ मिळेलच असे नाही. कंपन्यांवर याचा ताण येऊ शकतो, मात्र, यातून चांगले होण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. कुशल मनुष्यबळ भारतात परत येईल. भारतातील गुंतवणूक वाढेल. भारतात उत्तम आयटी स्टार्ट अप उभे राहतील. हा बदल तात्पुरता आहे. यातूनही आयटी क्षेत्र पर्याय काढेल.
- डॉ. शीतलकुमार रवंदळे, अध्यक्ष, महाराष्ट्र ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट असोसिएशन
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.