उद्योगनगरीत नवे राजकीय समीकरण

उद्योगनगरीत नवे राजकीय समीकरण

Published on

पिंपरी, ता. २१ ः आगामी महापालिका निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष स्‍वबळाचा नारा देत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही पिंपरी-चिंचवडमध्ये नवे राजकीय समीकरण जुळवत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गेले दोन दिवस शहराच्या दौऱ्यावर आहेत. जनसंवाद आणि ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ असे त्यांचे उपक्रम नव्या समीकरणाचीच जुळवाजुळव करणारे होते.
पालकमंत्रीही असलेल्या पवार यांनी शनिवारी (ता. २०) काळेवाडीत जनसंवाद उपक्रम घेतला. रविवारी (ता. २१) त्यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघात १३ ठिकाणी थेट स्‍थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, समाजसेवक आणि नागरिकांशी संवाद साधला. यामागे कार्यकर्त्यांचा उत्‍साह वाढविण्याचा उद्देश असल्‍याचीही चर्चा आहे. आगामी काळात शहरातील राजकीय समीकरणांवर या दौऱ्याचा परिणाम होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पवार यांचा रविवारचा दौरा महत्त्वपूर्ण ठरला. यात त्‍यांनी थेट संवाद साधून प्रलंबित विकासकामांचा व तातडीच्या प्रश्नांचा आढावा घेतला. सकाळी आठ वाजता दापोडी प्रभागातून या उपक्रमाची सुरवात झाली.

असा दौरा, असे संवाद
- दापोडी ः नजीर मुजावर एसएमएस कॉलनी येथे लोकप्रतिनिधींशी संवाद
- फुगेवाडी ः विठ्ठल मंदिरासमोर स्थानिक प्रतिनिधींची भेट, कराटे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी व स्थानिक नागरिकांशी संवाद, विद्यार्थ्यांच्या मते, नागरिकांच्या समस्‍या जाणून घेतल्या
- कासारवाडी ः मंत्री रेसिडेन्‍सी येथे माजी नगरसेवक शाम लांडे यांच्‍या निवासस्‍थानी भेट, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची पक्ष संघटनेविषयीच्या भावना, मते जाणून घेतली, कासारवाडी मेट्रो स्टेशनला भेट देऊन प्रशासकीय स्तरावर समस्‍या सोडविण्याचे आश्‍वासन
- संत तुकारामनगर ः जगद्‍गुरू श्री तुकाराम महाराज मंदिरात दर्शन, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, इतर नागरी समस्या सोडविण्याचे आश्‍वासन
- महात्मा फुलेनगर ः महादेव मंदिरात दर्शन, सर्वच समाजघटकांतील शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी प्रार्थना केल्‍याचे नमूद केले
- सावित्रीबाई फुले भाजी मंडई ः विक्रेत्यांच्‍या प्रश्‍नांबाबत चर्चा
- रमाबाई नगर ः माजी सभापतींच्‍या कार्यालयाला भेट दिली
- चिंचवड ः गावडेनगर येथे ‘चाय पे चर्चा’, कार्यकर्त्यांसोबत राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर संवाद
- पिंपरी ः नाणेकर चाळ परिसरात नागरिकांचीच निवेदने स्‍वीकारली. मिलिंदनगर येथे पदाधिकाऱ्यांच्‍या कार्यालयांना भेटी
---
पक्षाची पकड वाढविण्यावर भर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील विकासकामांचा आढावा घेण्याबरोबरच आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी तळागाळापर्यंत पक्षाची पकड वाढविण्यावर भर दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. युती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी असला तरी महापालिका निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे उपक्रमासाठी नव्हे तर कार्यकर्त्यांबरोबरील जवळीक वाढवण्याचा प्रयत्न म्हणून दौऱ्याकडे पाहिले जात आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com