कार-मुक्त दिन
एक संधी पुण्याची कोंडी फोडण्याची
भारतामधील वाहतूक कोंडीची तीव्रता जगात सर्वाधिक आहे. अनेक शहरांतील हवे गुणवत्ताही ढासळली आहे. हे चित्र बदलण्यासाठी जागतिक कार-मुक्त दिनी संकल्प करण्याची आणि तो तडीस नेण्याची एक संधी आहे. याविषयी केलेली मांडणी.
- रणजित गाडगीळ
जागतिक कार-मुक्त दिन २२ सप्टेंबरला साजरा केला जातो. गाड्यांच्या निर्मितीत जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या दृष्टीने हा दिवस तितकासा महत्त्वाचा नसेलही कदाचित, पण वास्तव आपल्यासमोर आहे आणि रोज आपण ते अनुभवतोय: जितक्या कार अधिक, तितके प्रश्न अधिक. त्यातील एक सर्वात दृश्य प्रश्न म्हणजे वाहतूक कोंडी. याबाबतीत आज जगात ही समस्या भारतात सर्वाधिक तीव्र आहे.
प्रदूषण पातळीही वाढत आहे. आजघडीला देशात हवा गुणवत्तेच्या राष्ट्रीय मापदंडांची पूर्तता होणारी तब्बल १३२ शहरे आहेत. प्रदूषणाचे आरोग्यावर गंभीर परिणाम होताहेत. रस्ते अपघातांमध्ये भारत जगात अग्रेसर देश आहे. आता हवामान बदलाचे संकट समोर आहे आणि जीवाश्म इंधनांच्या ज्वलनाने त्यात आणखी भर पडते आहे. ऑटोमोबाइल उद्योगाचे फायदे आहेत, परंतु याची फार मोठी किंमतही आपण मोजतो आहोत.
वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे शहरांची वाताहात होत चालली आहे. ती सोडवण्यासाठी रस्ते रुंदीकरण, उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे बांधकाम केले जाते, त्यात मौल्यवान जमीन आणि सार्वजनिक निधीचा मोठा हिस्सा खर्ची पडतो. कित्येक वृक्ष, हरित आवरण, पुरातन इमारती नामशेष होतात. लोकांना जास्त कार नको, तर सुरळीत चालणारी वाहतूक हवी आहे. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यक्षम असायला हवी, पायी चालण्यायोग्य रस्ते आणि सायकल मार्ग सज्ज हवेत. स्वयंचलित वाहनांचा वावर मर्यादित करण्यासाठी जास्त पार्किंग शुल्क व कार-मुक्त क्षेत्र अशा उपायांचाही अवलंब व्हायला हवा.
अशा बदलांची सुरवात करण्यासाठी पुण्यासारखे दुसरे योग्य शहर नाही. वाहतूक कोंडी, प्रदूषण, अपघात अशा सगळ्या समस्यांनी शहराला घेरले आहे. सार्वजनिक बस वाहतुकीच्या दैनंदिन १० लाख फेऱ्या होतात, तर मेट्रो व्यवस्थाही रूळत चालली आहे. पायी चालण्याच्या पायाभूत सुविधाही काही प्रमाणात सुधारल्या आहेत, पण एकेकाळी ‘सायकलींचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याचा २०१७ मध्ये मंजूर झालेला सर्वंकष सायकल आराखडा अजूनही कागदावरच आहे.
जुने पुणे वा पुण्याचा मध्यवर्ती भाग म्हणजे पेशवेकालीन अरुंद गल्ल्या आणि विविध प्रकारच्या दुकानांचे जिवंत रस्ते. कार-मुक्त क्षेत्र करण्यासाठी हा भाग अगदी योग्य आहे. मेट्रो असल्यामुळे ते शक्यही आहे. गणेशोत्सवात हा भाग वाहनमुक्त केला जातो, त्यामुळे तसे कायमस्वरूपी करणे फारसे कठीण नाही. जो भाग कारच्या वाहतुकीसाठी बनलेलाच नाही तिथे कार वाहतुकीला मुभा देऊन भुयारी मार्ग आणि बहुमजली पार्किंग अशी बांधकामे करणे खर्चिक आहे आणि ते व्यवहार्यही नाही. त्यापेक्षा हा भाग केवळ पायी चालणे आणि सायकलसाठी मर्यादित ठेवावा आणि सार्वजनिक वाहतूक व पार्क-अँड-राईड सुविधा उपलब्ध कराव्यात. अशा बदलांमुळे या भागाचा नागरिकांना हवाहवासा कायापालट होऊन जाईल.
असे बदल नकोसे वाटणाऱ्या इथल्या व्यावसायिकांनी इतर देशातल्या उदाहरणांवरून धडा घेतला पाहिजे. लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क या नामांकित शहरांनी कार-मुक्त क्षेत्रांचा अवलंब करून भरभराट केली आहे. पुणे विकास आराखड्यामध्ये अशा प्रकारे बदल प्रस्तावित आहेत, म्हणजेच हे काही केवळ ‘विदेशी खूळ’ नाही, तर काळाची गरज आहे. या जागतिक कार-मुक्त दिनी आपल्या विस्मरणात गेलेली गोष्ट पुन्हा आठवूया - आपली शहरे कारसाठी नव्हे तर लोकांसाठी वसवली गेली आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा, शुद्ध हवा, चांगले जीवनमान याला प्राधान्य मिळणे आवश्यक आहे.
(लेखक परिसर संस्थेचे कार्यक्रम संचालक आहेत.)
---------
या लेखात मांडलेल्या कल्पनांवर अधिक सखोल चर्चेसाठी परिसर आणि पर्यावरण शिक्षण केंद्र या संस्थांनी मिळून भारत इतिहास संशोधन मंडळ, सदाशिव पेठ येथे आज संध्या ५ वाजता प्रदर्शन व चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.